सोमवार, 2 नोव्हेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

कारल्याची भाजी नको वाटते? १० मिनिटांत बनवा गरमागरम भाकरीसोबत खायला कारल्याची चटणी

कारल्याची भाजी नको वाटते? १० मिनिटांत बनवा गरमागरम भाकरीसोबत खायला कारल्याची चटणी छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
PT24 टीम

कारल्याची भाजी अनेकांना आवडत नाही, पण पोषक कारल्याची मसालेदार चटणी सोप्या पद्धतीने घरी झटपट बनवता येते.

लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना कारल्याची भाजी खायला अजिबात आवडत नाही. घरात कारल्याच्या भाजीचं नाव निघालं की मुलं तोंड वाकडं करून तिथून निघून जातात. अनेकांच्या घरात हे चित्र नेहमीचं असतं.

पण कारलं पोषक घटकांनी समृद्ध असतं. ते खाल्ल्यास शरीराला भरपूर फायदे होतात आणि आरोग्य सुधारायला मदत होते. म्हणूनच भाजी खायची इच्छा नसेल, तर कारल्याची चटणी करून बघता येते. ही चटणी सोप्या पद्धतीने घरी बनवता येते आणि तिची रेसिपी खाली सविस्तर दिली आहे.

हा पदार्थ १० मिनिटांत झटपट तयार होतो. जेवणात तोंडी लावायला ही चटणी बनवता येते. ही मसालेदार चटणी ३ ते ४ दिवस व्यवस्थित टिकून राहते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी ही चटकदार चटणी खूप जास्त गुणकारी ठरते. त्यामुळे रोजच्या जेवणात कारल्याच्या चटणीचा समावेश करावा, असं सांगितलं जातं.

आता चटणीसाठी काय काय लागतं ते पाहू. कारलं, पांढरे तीळ, शेंगदाणे, चणा डाळ, उडीद डाळ, लसूण, जिरं, धणे, कढीपत्ता, हिंग, आमचूर पावडर, मोहरीचं तेल आणि मीठ एवढं साहित्य लागेल.

कारल्याची चटणी बनवण्यासाठी सर्वात आधी कारल्याच्या आतल्या बिया काढून टाका आणि कारल्याच्या पातळ चकत्या करा. त्यावर मीठ घालून चकत्या हाताने कुसकरा आणि त्या बाजूला ठेवून द्या.

मग कढईत तेल गरम करा. त्यात चणा डाळ, उडीद डाळ आणि शेंगदाणे घालून मंद आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत भाजा. त्यानंतर त्यात पांढरे तीळ घालून तेही मंद आचेवर भाजून घ्या.

तिळानंतर त्यात जिरे, धणे, कढीपत्ता, हिंग आणि लसणाच्या पाकळ्या घाला. हे सगळं सोनेरी होईपर्यंत भाजा.

आता दुसरी कढई घ्या आणि त्यात तेल गरम करा. त्यात बारीक चकत्या केलेलं कारलं घालून मंद आचेवर भाजा. असं केल्यामुळे चटणीला खमंग चव येते.

भाजलेलं सगळं साहित्य थंड झालं की ते मिक्सरच्या भांड्यात ओता. त्यात आमचूर पावडर आणि चवीनुसार मीठ घालून चटणी वाटून घ्या.

चटणी आंबट नको असेल, तर आमचूर पावडर जास्त घालू नका. अशा प्रकारे सोप्या पद्धतीने बनवलेली खमंग कारल्याची चटणी तयार होते. ती गरमागरम भाकरीसोबत खायला घेता येते.

#नागपूर#PT24#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ