शनिवार, 7 नोव्हेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

'व्हेंटिलेटर'चा सिक्वेल येतोय, दहा वर्षांनी पुन्हा दिसणार कामेरकर कुटुंब

'व्हेंटिलेटर'चा सिक्वेल येतोय, दहा वर्षांनी पुन्हा दिसणार कामेरकर कुटुंब छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
कल्चर PT24 टीम

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या 'व्हेंटिलेटर' चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा झाली आहे. 'व्हेंटिलेटर २'चं लेखन आणि दिग्दर्शन राजेश मापुस्कर करत आहेत.

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या 'व्हेंटिलेटर' चित्रपटाचा सिक्वेल येणार आहे. 'व्हेंटिलेटर २' असं त्याचं नाव असून पर्पल पेबल पिक्चर्स आणि मॅगीज पिक्चर्स यांनी नुकतीच त्याची घोषणा केली. दहा वर्षांनंतर कामेरकर कुटुंब पुन्हा प्रेक्षकांसमोर येणार आहे.

पहिल्या चित्रपटात गणेशोत्सवाच्या निमित्ताने कामेरकर कुटुंब एकत्र आलं होतं. त्यांनी प्रेक्षकांना हसवलं, भावूक केलं आणि नात्यांचे अनेक रंग दाखवले. ही कथा रुग्णालयाच्या परिसरात घडते. त्यातली प्रत्येक व्यक्तिरेखा, त्यांचे स्वभाव, आपापसातले गमतीशीर संवाद आणि भावनिक प्रसंग प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिले.

हीच गोष्ट पुढे नेण्यासाठी दिग्दर्शक राजेश मापुस्कर सज्ज झाले आहेत. 'व्हेंटिलेटर २'चं लेखन आणि दिग्दर्शनही त्यांनीच केलं आहे. प्रियंका चोप्रा जोनस, डॉ. मधु चोप्रा आणि राजेश मापुस्कर हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.

घोषणा मिश्किल शब्दांत करण्यात आली आहे. "'तेच सगळे कामेरकर, पुन्हा एकदा १० वर्षांनंतर... त्यांच्यातले काही गेले, काही राहिले... गेलेले हसतायत आणि राहिलेले...!'" असे ते शब्द आहेत. 'घ्या रे घ्या सारे घ्या...' ही खास अंदाजातली टॅगलाईनही दिली असून, त्यामुळे घोषणेला आणखी रंगत आली आहे. यावेळी कथा नेमकी काय असेल, पहिल्या चित्रपटातला नात्यांचा गोडवा, कौटुंबिक गमतीजमती आणि भावनिक क्षण पुन्हा अनुभवायला मिळणार का, याची प्रेक्षकांना आता उत्सुकता लागली आहे.

दिग्दर्शक राजेश मापुस्कर म्हणतात, 'व्हेंटिलेटर' चित्रपटासोबत माझ्या अनेक आठवणी आणि भावना जोडल्या आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांनी दिलेलं प्रेम आजही मनात ताजं आहे. दहा वर्षांनंतर पुन्हा एकदा त्याच विश्वात परतताना एक वेगळाच आनंद आणि जबाबदारीची जाणीव आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहोत.

निर्मात्या प्रियंका चोप्रा जोनस आणि डॉ. मधु चोप्रा म्हणतात, 'व्हेंटिलेटर'ला मिळालेलं प्रेम आमच्यासाठी नेहमीच खास राहिलं आहे. या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं. त्यामुळे या कथेचा पुढचा भाग घेऊन येणं हा आमच्यासाठी आनंदाचा आणि तितकाच महत्त्वाचा निर्णय आहे. दहा वर्षांनंतर पुन्हा एकदा या कुटुंबाला एकत्र आणताना पहिल्या भागाशी जोडलेल्या आठवणी आणि प्रेक्षकांच्या अपेक्षा या दोन्हींचा विचार केला आहे. यावेळीही प्रेक्षकांना हसवणारा, विचार करायला लावणारा आणि मनाला भिडणारा अनुभव देण्याचा आमचा प्रयत्न असेल.

चित्रपटाचं चित्रीकरण लवकरच सुरू होणार आहे. या नव्या पर्वाची पहिली झलक प्रेक्षकांसमोर आणण्यात आली आहे. आता दहा वर्षांनंतर कामेरकर कुटुंबात नेमकं काय घडणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

#नागपूर#कल्चर#PT24#Culture#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ