शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

चारा टंचाई टाळण्यासाठी धान कापणी हार्वेस्टरऐवजी माणसांकडून करा, जिल्हाधिकारी पंत यांचे निर्देश

चारा टंचाई टाळण्यासाठी धान कापणी हार्वेस्टरऐवजी माणसांकडून करा, जिल्हाधिकारी पंत यांचे निर्देश छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
नागरी PT24 टीम

चंद्रपूर जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीत जनावरांच्या चाऱ्याची टंचाई होऊ नये, म्हणून जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी आढावा बैठकीत आतापासून नियोजन करण्याचे निर्देश दिले.

चंद्रपूर जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पुढच्या काळात जनावरांना चाऱ्याची टंचाई भासू नये, म्हणून आतापासूनच नियोजन करणे गरजेचे आहे, असे निर्देश जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी दिले. संभाव्य चारा टंचाईच्या अनुषंगाने चारा उत्पादन आणि व्यवस्थापनाच्या नियोजनासाठी आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या.

धान कापणीनंतर शेतात उरणारे तणीस वाया जाऊ नये, याची काळजी घ्यावी आणि त्याचा जनावरांच्या चाऱ्यासाठी जास्तीत जास्त उपयोग करावा, असे त्यांनी सांगितले. त्यासाठी शेतकऱ्यांनी हार्वेस्टर यंत्राऐवजी शक्यतो मनुष्यबळाने धानाची कापणी करण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. चारा उत्पादन, संवर्धन आणि साठवणूक यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हार्वेस्टर यंत्राने कापणी केली तर मोठ्या प्रमाणात तणीस शेतातच राहते किंवा त्याचा चाऱ्यासाठी पुरेसा उपयोग होत नाही, असे जिल्हाधिकारी पंत म्हणाल्या. मात्र माणसांकडून कापणी केली तर तणीस नीट गोळा करता येते आणि जनावरांसाठी चारा म्हणून वापरता येते. म्हणूनच दोन्ही पद्धतींमधील फरक शेतकऱ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांमधून समजावून सांगावा, अशी सूचना त्यांनी केली.

जनजागृतीसाठी आधी प्रायोगिक तत्त्वावर पाच गावांची निवड करून उपक्रम राबवावेत, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर प्रत्येक तालुक्यातील किमान दहा गावांमध्ये कृषी, पशुसंवर्धन, महसूल, ग्रामविकास आणि वन विभागांचे अधिकारी व कर्मचारी यांनी एकत्रितपणे शेतकरी आणि पशुपालकांना मार्गदर्शन करावे, असेही त्यांनी नमूद केले.

उपलब्ध चाऱ्याची नासाडी टाळण्यासाठी कडबाकुट्टी यंत्रांचा अधिकाधिक वापर करण्यावर भर द्यावा, असे पंत यांनी सांगितले. विदर्भ-मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्पांतर्गत जास्तीत जास्त शेतकरी आणि पशुपालकांना विद्युतचलित कडबाकुट्टी यंत्रांचा लाभ मिळवून द्यावा, अशी सूचना त्यांनी केली.

कमी पाण्यात चारा तयार करण्यासाठी हायड्रोपोनिक पद्धतीने मका चारा निर्मितीला प्रोत्साहन द्यावे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. ज्या पशुपालकांकडे पाणी मर्यादित आहे, त्यांना या तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवून त्याचे फायदे समजावून सांगावेत. आधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षण आणि दृकश्राव्य माध्यमांच्या मदतीने चारा उत्पादनाबाबत शेतकऱ्यांमध्ये जागृती करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, उपजिल्हाधिकारी संजय पवार, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सुरेश कुंभरे, मृद व जलसंधारण अधिकारी नीलिमा मंडपे आणि विभागीय वन अधिकारी राजन तलमले उपस्थित होते. याशिवाय विविध विभागांचे अधिकारीही बैठकीत सहभागी झाले होते.

#नागपूर#शहर#PT24#Civic#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ