कराडजवळ पोलीस प्रशिक्षणार्थींची ट्रॅव्हल्स रस्त्यावर पलटी, १५ जण जखमी
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
धुळ्याहून कोल्हापूरकडे निघालेली ट्रॅव्हल्स पाडळी (हेळगाव) येथे गुरुवारी पहाटे उलटली. चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
धुळ्याहून कोल्हापूरच्या दिशेने पोलीस प्रशिक्षणार्थींना घेऊन निघालेली ट्रॅव्हल्स गुरुवारी पहाटे कराड तालुक्यातील पाडळी (हेळगाव) येथील खडकी नावाच्या शिवारात पलटी झाली. कराड-रहिमतपूर मार्गावर शरद जाधव यांच्या शेताजवळ हा अपघात झाला. या अपघातात १२ पोलीस प्रशिक्षणार्थी, ट्रॅव्हल्सचा चालक, सहचालक आणि क्लिनर असे एकूण १५ जण जखमी झाले आहेत. म्हणजेच जखमींमध्ये प्रशिक्षणार्थींसोबत ट्रॅव्हल्सवरील तिघांचाही समावेश आहे.
उसदरवाढीसाठी नागठाणे येथे शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर धुळे येथील २६ पोलीस प्रशिक्षणार्थींना घेऊन वैभव व राम टुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्सची एमएच ०९ जीई ९०४५ क्रमांकाची गाडी कोल्हापूरकडे रवाना झाली होती. प्रवासादरम्यान पाडळी-हेळगावच्या हद्दीत चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ट्रॅव्हल्स रस्त्यावर पलटी झाली.
या अपघातात जखमी झालेल्या १२ पोलीस प्रशिक्षणार्थींची नावे अशी : सुजीत बाळासो कदम, शिवम उत्तम निकम, रुशिकेश दत्तात्रय पाटील, दशरथ धोंडीराम यमकर, विनेश भगवान वायदंडे, पार्थ सुनील चौगुले, आकाश सुरेश घाडगे, तुषार पांडुरंग बर्गे, शुभम वसंत कुंभार, दिगंबर रंगराव चरापले, सागर सत्ताप्पा खामकर आणि शुभम रामचंद्र कोळी. ट्रॅव्हल्सचा चालक समाधान लक्ष्मण पाटील, सहचालक मुकुंदा रामलाल आणि क्लिनर गौरीशंकर सुभाष चौधरी हेही या अपघातात जखमी झाले.
सर्व जखमींना उपचारासाठी हेळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि कराडच्या वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस शिपाई अभिषेक शहाजी पाटील (वय २८, मूळ रहिवासी पाडळी खुर्द, ता. करवीर) यांनी मसूर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.
फिर्यादीत असे नमूद आहे की, चालक समाधान लक्ष्मण पाटील (रा. नंदाळे बु., ता. व जि. धुळे) याने गाडी हयगयीने आणि निष्काळजीपणे चालवली. रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून त्याने गाडी भरधाव वेगाने चालवल्यामुळे हा अपघात झाला, असे फिर्यादीत म्हटले आहे.
अपघाताची माहिती मिळताच मसूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अदिनाथ खरात आणि पोलीस उपनिरीक्षक एस. एस. भोसले यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास व्ही. बी. पोतेकर करीत आहेत.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.