चंद्रपूरमध्ये चाऱ्याचा तुटवडा टाळण्यासाठी हातानेच धान कापणीचे आवाहन
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
दुष्काळसदृश परिस्थितीत जनावरांना चारा कमी पडू नये म्हणून जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी सर्व विभागांना आतापासून नियोजन करण्याचे निर्देश दिले.
चंद्रपूर जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पुढच्या काळात जनावरांना चाऱ्याची टंचाई जाणवू नये, यासाठी आतापासूनच व्यापक आणि प्रभावी नियोजन करायला हवे, असे जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी सांगितले. चारा उत्पादन, संवर्धन आणि साठवणूक या कामांत सर्व संबंधित विभागांनी एकमेकांशी समन्वय ठेवून काम करावे, असेही निर्देश त्यांनी दिले.
संभाव्य चारा टंचाईच्या अनुषंगाने चारा उत्पादन आणि व्यवस्थापनाच्या नियोजनासाठी आढावा बैठक झाली. त्या बैठकीत पंत बोलत होत्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, उपजिल्हाधिकारी संजय पवार, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सुरेश कुंभरे, मृद व जलसंधारण अधिकारी नीलिमा मंडपे आणि विभागीय वन अधिकारी राजन तलमले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी यावेळी हजर होते.
धान कापणीनंतर मिळणारे तणीस वाया जाणार नाही, याची काळजी घ्यावी आणि त्याचा जनावरांच्या चाऱ्यासाठी जास्तीत जास्त वापर करावा, असे जिल्हाधिकारी म्हणाल्या. त्यासाठी शेतकऱ्यांनी हार्वेस्टर यंत्राऐवजी शक्यतो माणसांकरवी धानाची कापणी करण्याला प्राधान्य द्यावे, असे त्यांनी सांगितले. हार्वेस्टरने कापणी केली तर मोठ्या प्रमाणात तणीस शेतातच पडून राहते किंवा चाऱ्यासाठी त्याचा पुरेसा उपयोग होत नाही. माणसांनी कापणी केल्यास तणीस नीट गोळा करून जनावरांसाठी चारा म्हणून वापरता येते, असे त्यांनी स्पष्ट केले. दोन्ही पद्धतींमधला फरक शेतकऱ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिके दाखवून समजावून सांगावा, अशी सूचना त्यांनी केली.
सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर पाच गावांची निवड करून तेथे जनजागृती उपक्रम राबवावेत, असे पंत यांनी सांगितले. त्यानंतर प्रत्येक तालुक्यातील किमान दहा गावांमध्ये कृषी, पशुसंवर्धन, महसूल, ग्रामविकास आणि वन विभागांचे अधिकारी व कर्मचारी यांनी मिळून शेतकरी आणि पशुपालकांना मार्गदर्शन करावे, असेही त्या म्हणाल्या.
आहे तो चारा वाया जाऊ नये म्हणून कडबाकुट्टी यंत्रांचा जास्तीत जास्त वापर व्हावा, यावर त्यांनी भर दिला. विदर्भ-मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्पांतर्गत जास्तीत जास्त शेतकरी आणि पशुपालकांना विद्युतचलित कडबाकुट्टी यंत्रांचा लाभ मिळवून द्यावा, असे त्यांनी सांगितले.
कमी पाण्यात चारा तयार करण्यासाठी हायड्रोपोनिक पद्धतीने मक्याचा चारा करण्याला प्रोत्साहन द्यावे, असेही जिल्हाधिकारी म्हणाल्या. ज्या पशुपालकांकडे पाणी मर्यादित आहे, त्यांना या तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवून त्याचे फायदे सांगावेत. आधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षण आणि दृकश्राव्य माध्यमांच्या मदतीने चारा उत्पादनाबाबत शेतकऱ्यांमध्ये जागृती करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.