बल्लारपूरमध्ये जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी शेतात जाऊन केली भात, कापसाच्या नुकसानीची पाहणी
दुष्काळी परिस्थितीमुळे बल्लारपूर तालुक्यातील पिकांच्या नुकसानीची जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी आष्टी रिठ आणि पळसगाव येथे पाहणी केली. एकूण पेरणी क्षेत्राच्या २० टक्के क्षेत्राची प्रत्यक्ष पडताळणी तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
चंद्रपूरचे जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी बल्लारपूर तालुक्यातील आष्टी रिठ आणि पळसगाव या गावांना आज भेट दिली. तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने पिकांच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी हा दौरा झाला. भात आणि कापसाच्या शेतात प्रत्यक्ष जाऊन त्यांनी पिकांची स्थिती पाहिली आणि बाधित शेतकऱ्यांशी थेट बोलून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या.
बल्लारपूर तालुक्यात पावसाने खंड दिल्यामुळे भात आणि कापूस या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी पंत यांनी आष्टी रिठ आणि पळसगाव येथील विजय बालाजी भोयर, रामदास भोयर, मुकुंदा मडावी आणि मारुती मडावी यांच्या शेतात जाऊन पिकांची पाहणी केली आणि त्यांच्याशी संवाद साधला.
पावसाअभावी पिकांवर काय परिणाम झाला, उत्पादनात किती घट होण्याची शक्यता आहे, शेतकऱ्यांपुढे कोणत्या अडचणी आहेत आणि प्रत्यक्षात किती नुकसान झाले आहे, याची सविस्तर माहिती त्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांच्याकडून घेतली. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे अचूक आणि वस्तुनिष्ठ मूल्यांकन होणे आवश्यक असून, त्यासाठी प्रत्यक्ष क्षेत्रीय पडताळणीची प्रक्रिया गतीने राबवावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.
दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन नुकसानीचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करण्यासाठी तालुक्यातील एकूण पेरणी क्षेत्राच्या २० टक्के क्षेत्राची ग्राउंड ट्रुथिंग, म्हणजेच प्रत्यक्ष क्षेत्रीय पडताळणी, तातडीने पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी दिले.
महसूल, कृषी आणि जिल्हा परिषद या तिन्ही यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असेही त्यांनी सांगितले. बल्लारपूर तालुक्यातील एकूण पेरणी क्षेत्राच्या २० टक्के क्षेत्राची प्रत्यक्ष पडताळणी करून पिकांच्या नुकसानीचा अहवाल विनाविलंब सादर करावा, असे त्यांनी म्हटले. या अहवालाच्या आधारे शासनाकडे आवश्यक प्रस्ताव तातडीने पाठवता येणार असल्याने ग्राउंड ट्रुथिंगच्या कामाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी पंत यांनी दिले.
या पाहणी दौऱ्यात बल्लारपूरचे उपविभागीय अधिकारी डॉ. अर्जुन पावरा, तहसीलदार रेणुका कोकाटे, गटविकास अधिकारी धनंजय साळवे, तालुका कृषी अधिकारी आकाश पवार, ग्राम महसूल अधिकारी, सहायक कृषी अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी तसेच संबंधित विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. विलास कुमरे, पळसगावच्या सरपंच संगिता सोयाम, वासुदेव मडावी यांच्यासह परिसरातील शेतकरीही यावेळी हजर होते.
पाहणीनंतर जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी विकसीत भारत ग्रामीण रोजगार आणि आजिविका हमी योजना (व्हीबीजी-राम-जी) आणि जिल्हा खनिज निधी अभिसरण अंतर्गत ग्राम पंचायत कोर्टीमक्ता येथे लागवड करण्यात आलेल्या केशर आंबा फळबागेच्या क्षेत्रालाही भेट दिली.