अरोलीच्या 45 शेतकऱ्यांची सामूहिक चारा शेती; वर्षाला दीड ते दोन कोटींचा चारा विक्रीला
नागपूर जिल्ह्यातील अरोली गावातल्या 45 शेतकऱ्यांनी एकत्र येऊन चाऱ्याची शेती केली आणि दुष्काळसदृश परिस्थितीतही चारा टंचाईवर मात केली आहे.
राज्यातील मोठ्या भागात दुष्काळसदृश परिस्थिती आहे. येत्या काही महिन्यांत भीषण चारा टंचाई होण्याची शक्यता आहे. वर्षानुवर्षे सांभाळलेली जनावरे या संकटात कशी जगवायची, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. राज्यातील लाखो शेतकरी याच चिंतेत असताना नागपूर जिल्ह्यातील अरोली गावातल्या 45 शेतकऱ्यांनी वेगळाच मार्ग दाखवला आहे.
या शेतकऱ्यांनी सामूहिक शेतीच्या माध्यमातून स्वतःच्या चाऱ्याची गरज तर भागवलीच, पण वर्षाला दीड ते दोन कोटी रुपयांचा चारा ते विदर्भातील शेकडो डेअरी फार्म आणि हजारो दूध उत्पादक शेतकऱ्यांना पुरवत आहेत. चारा टंचाईच्या संकटावर मात करून आर्थिक सुबत्तेकडे नेणारे हे उदाहरण आता चर्चेत आहे. याला 'अरोली पॅटर्न' म्हटले जाते.
या पॅटर्नची सुरुवात 2017 मध्ये झाली. त्या वर्षी अरोलीतील 45 शेतकऱ्यांनी 'विश्वास सहकारी शेती विकास संघ' स्थापन केला आणि सामूहिक शेती सुरू केली. सर्वांनी मिळून सुमारे 200 एकर शेतजमिनीवर नेपियर आणि इतर चारा पिके लावली. सुरुवातीला चारा विकायचा कसा, याची अडचण आली. पण गेल्या काही वर्षांत चारा उत्पादन आणि विक्रीचे हे मॉडेल यशस्वी ठरले आहे.
आज हे शेतकरी स्वतःच्या गरजेपुरता चारा पिकवतातच. शिवाय विदर्भातील वेगवेगळ्या जिल्ह्यांत डेअरी फार्म चालवणाऱ्यांना आणि दुग्धोत्पादक शेतकऱ्यांना दर वर्षी दीड ते दोन कोटींचा चारा विकून त्यांना चांगला नफाही मिळत आहे.
ही सामूहिक शेती कशी चालते, तेही सरळ आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या जमिनीवर चारा पिकांच्या लागवडीसाठी लागणारे बियाणे आणि इतर साधने शेतकऱ्यांनीच स्थापन केलेला 'विश्वास सहकारी शेती संघ' देतो. शेतकऱ्याने फक्त पिकाची निगा राखायची आणि पाणी द्यायचे, एवढीच अपेक्षा आहे.
दर अडीच महिन्यांनी संघाचे मजूर येऊन नेपियर गवत कापतात. सर्व 45 शेतकऱ्यांच्या शेतांवर कापलेल्या गवताचे आणखी लहान तुकडे करण्यासाठी विशेष कटाई मशीन देण्यात आली आहे. तेच मजूर गवताचे लहान तुकडे करून त्याचे पॅकिंग करतात. पॅक केलेला चारा लगेच ग्राहकांच्या डेअरी फार्मपर्यंत किंवा गोठ्यापर्यंत ट्रकने पाठवला जातो.
ठरावीक कालावधीनंतर संघ शेतकऱ्यांच्या खात्यात त्यांच्या शेतात पिकलेल्या चाऱ्याचे पैसे जमा करतो. गेल्या काही वर्षांत विश्वास सहकारी शेती विकास संघाने कोट्यवधी रुपयांचा चारा विकून मोठा नफा कमावला आहे. दुष्काळासारख्या कठीण परिस्थितीत दुग्धोत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांसाठी संजीवनी ठरणारा चारा उपलब्ध करून दिला आहे.