बदलापूर एमआयडीसीची रासायनिक सांडपाणी वाहिनी पुन्हा फुटली; उल्हासनदीत जलप्रदूषण, चौकशीची मागणी
सुमारे १२८ कोटी रुपये खर्चून नवीन वाहिनी टाकूनही ती सोमवारी पुन्हा फुटली. कुळगाव-बदलापूर नगर परिषदेचे नियोजन व विकास समिती सभापती संभाजी शिंदे यांनी स्वतंत्र चौकशीची मागणी केली आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
बदलापूर एमआयडीसीतील रासायनिक सांडपाणी वाहून नेणारी वाहिनी सोमवारी पुन्हा एकदा फुटली. ही वाहिनी एमआयडीसीतील रासायनिक सांडपाणी अंबरनाथपर्यंत घेऊन जाते. ती फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणावर रासायनिक सांडपाणी रस्त्यावर पसरले आणि नाल्यातही मिसळले.
एवढेच नाही, तर हे रासायनिक सांडपाणी बदलापुरातील अनेक इमारतींच्या पाण्याच्या टाक्यांमध्येही शिरले आहे. नाल्यावाटे ते उल्हासनदीच्या पाण्यातही मिसळले गेले आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण झाले आहे. याबद्दल कुळगाव-बदलापूर नगर परिषदेच्या नियोजन व विकास समितीचे सभापती संभाजी शिंदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शिंदे हे भाजपचे नगरसेवकही आहेत.
बदलापुरात गेली काही वर्षे ठराविक महिन्यांच्या अंतराने ही वाहिनी फुटत होती. शिंदे यांनी याबद्दल सातत्याने आवाज उठवला होता. त्यानंतर एमआयडीसी प्रशासनाने तिथे नवीन वाहिनी टाकण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार नवीन रासायनिक सांडपाणी वाहिनी टाकण्यात आली. त्यामुळे आता वाहिनी फुटण्याचे प्रकार थांबतील, अशी अपेक्षा होती. पण सोमवारी ती पुन्हा फुटली आणि रासायनिक सांडपाणी रस्त्यावर आले.
हे प्रकार रोखण्यासाठी एमआयडीसी प्रशासनाने सुमारे १२८ कोटी रुपये खर्च करून नवीन वाहिनीचे काम केले होते. तरीही वाहिनी फुटत राहिल्यामुळे कामाचा दर्जा आणि तांत्रिक नियोजन यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शिंदे यांच्या म्हणण्यानुसार, नवीन वाहिनीचे काम करताना स्टेनलेस स्टीलची वाहिनी टाकावी, अशी मागणी त्यांनी केली होती. पण एमआयडीसी प्रशासनाने एचडीपीई वाहिनी टाकली आणि तीच फुटली आहे. इतका मोठा खर्च होऊनही सांडपाणी वाहिनी वारंवार फुटत असल्याने कामाचा दर्जा, वापरलेले साहित्य आणि तांत्रिक नियोजन यांची स्वतंत्र चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
एमआयडीसी प्रशासनाच्या या हलगर्जीपणामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीतीही शिंदे यांनी व्यक्त केली. यापुढे असा प्रकार घडल्यास मोठे जनआंदोलन उभारू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.