हिंजवडीत मेट्रोतून उतरल्यावर प्रवास सुसाट होणार; ४२६ कोटींच्या आराखड्याला मंजुरी
मेट्रो मार्गिका ३ च्या स्थानकांबाहेर १९.२ किलोमीटरचे २१ जोडरस्ते बांधले जाणार आहेत. पीएमआरडीए आणि एमआयडीसी ५०:५० टक्के खर्च उचलणार आहेत.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
हिंजवडी आयटी पार्कमधील बहुप्रतिक्षित मेट्रो मार्गिका ३ सुरू होण्याच्या मार्गावर असतानाच, मेट्रोतून उतरल्यानंतर प्रवाशांना कार्यालये आणि घरांपर्यंत पोहोचवणारा अंतर्गत प्रवास गतिमान करण्यासाठी प्रशासनाने पावले उचलली आहेत. मेट्रो प्रवाशांना 'लास्ट माईल कनेक्टिव्हिटी' मिळावी यासाठी राज्य शासनाने तब्बल ४२६ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी दिली आहे.
या आराखड्यांतर्गत पहिल्या टप्प्यातील ८ महत्त्वाच्या मेट्रो स्थानकांबाहेर सुमारे १९.२ किलोमीटर लांबीच्या २१ अंतर्गत जोडरस्त्यांचे जाळे विणले जाणार आहे. वर्षानुवर्षे वाहतूक कोंडीच्या विळख्यात अडकलेल्या हिंजवडीला यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) हा संपूर्ण प्रकल्प संयुक्त विद्यमाने राबवणार आहेत. या खर्चाचा ५०:५० टक्के भार दोन्ही यंत्रणा समान उचलणार आहेत.
डिसेंबर २०२६ अखेरपर्यंत ही सर्व कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, प्रत्यक्ष कामाला गती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या योजनेत १२ ते ३० मीटर रुंदीच्या रस्त्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे केवळ वाहनांचा विचार न करता, पर्यावरणपूरक प्रवासाला चालना देण्यासाठी पादचाऱ्यांसाठी पदपथ आणि सायकलस्वारांसाठी स्वतंत्र ट्रॅक उभारले जाणार आहेत.
पीएमआरडीएचे जनसंपर्क अधिकारी पुरुषोत्तम सांगळे म्हणाले, "मेट्रो मार्गिका-३ च्या स्थानकांभोवती प्रशस्त जोडरस्ते, सुरक्षित पदपथ आणि स्वतंत्र सायकल मार्ग उभारून एक सक्षम 'लास्ट माईल कनेक्टिव्हिटी' उभी केली जात आहे. पीएमआरडीए आणि एमआयडीसीच्या या संयुक्त पुढाकारामुळे हिंजवडी परिसरातील प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि शाश्वत होण्यास मदत होईल."
रस्त्यांच्या तपशिलावर नजर टाकली तर शिवाजी चौक परिसरातील ५ रस्त्यांची एकूण लांबी ४.९ किमी असून हा सर्वात मोठा भाग आहे. मेगापोलिस सर्कलभोवतीचा वर्तुळाकार रस्ता ४.०६ किमी लांबीचा आहे. क्वाड्रॉन सर्कल हा मुख्य आयटी पार्क परिसर असून तिथे ३ रस्ते मिळून ३.७ किमी लांबीचे होतात.
हिंजवडी स्टेशन परिसरात ३ रस्ते आहेत आणि त्यांची लांबी १.९ किमी आहे. पाल इंडिया स्टेशन परिसरात ३ रस्ते १.६ किमी लांबीचे आहेत. डोहलर स्टेशनजवळचा रस्ता १.५ किमी लांबीचा आणि ९८ मीटर रुंद आहे. विप्रो टेक्नॉलॉजीज रस्ता १.१ किमी लांबीचा असून तो आयटी कंपनीला जोडतो. इन्फोसिस फेज २ रस्ता ५०० मीटरचा अंतर्गत जोडणी रस्ता आहे.