पुण्यातील नाट्यगृहांची दुरुस्ती सुरू, नेहरू भवन १० नोव्हेंबरपर्यंत बंद
महापालिकेच्या सांस्कृतिक विभागाने नाट्यगृहांमधील सुविधा सुधारण्यासाठी देखभाल-दुरुस्तीची कामे सुरू केली आहेत. घोले रस्त्यावरील नेहरू सांस्कृतिक भवन १ नोव्हेंबरपासून बंद आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
पुणे महापालिकेच्या नाट्यगृहांमधील सुविधा सुधारण्यासाठी महापालिकेच्या सांस्कृतिक विभागाने देखभाल-दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत. घोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन दुरुस्तीच्या कामांसाठी १ नोव्हेंबरपासून बंद ठेवण्यात आले आहे. १० नोव्हेंबरपर्यंत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
नेहरू भवनात सभागृहातील खुर्च्यांची दुरुस्ती केली जात आहे. वातानुकूलन यंत्रणेची देखभाल सुरू आहे आणि छतातून होणारी गळती थांबवण्यासाठी वॉटरप्रूफिंगचे कामही हाती घेतले आहे. ही कामे १० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याने, तोपर्यंतच्या कालावधीत सभागृहात नाट्यप्रयोग किंवा इतर कार्यक्रम घेता येणार नाहीत.
नाट्यगृहांतील विविध सुविधांबद्दल कलाकार सतत तक्रारी करत होते. त्याचा त्रास कलाकारांबरोबरच प्रेक्षकांनाही सहन करावा लागत होता. त्यामुळे या सुविधांची नियमित देखभाल करण्याची आणि गरजेनुसार वेळेत दुरुस्ती करण्याची गरज बोलून दाखवली जात होती. या पार्श्वभूमीवर महापालिकेने दुरुस्तीच्या कामांना सुरुवात केली आहे. सध्या सुरू असलेल्या कामांमुळे नाट्यगृहांच्या सुविधांमध्ये किती सुधारणा होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महापालिकेच्या नाट्यगृह विभागाचे मुख्य व्यवस्थापक राजेश कामठे म्हणाले, "काही नाट्यगृहांमध्ये सध्या देखभाल-दुरुस्तीची कामे सुरू आहेत. पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवनातील दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. आगामी काळात अन्य नाट्यगृहांमध्येही आवश्यकतेनुसार कामे केली जातील. कलाकारांना योग्य सुविधा उपलब्ध करून देण्याला प्राधान्य दिले जात आहे."
बालगंधर्व रंगमंदिरातील स्वच्छतागृहे अस्वच्छ असल्याबद्दल कलाकार अनेक दिवसांपासून तक्रारी करत होते. त्याची दखल घेऊन स्वच्छतागृहांच्या नूतनीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. या कामासाठी संपूर्ण नाट्यगृह बंद ठेवलेले नाही. नाट्यप्रयोग आणि इतर कार्यक्रम सुरू ठेवूनच हे नूतनीकरण केले जात आहे.
औंध येथील पंडित भीमसेन जोशी कलामंदिरातही आवश्यक ती दुरुस्तीची कामे करण्यात आली आहेत.
कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात मोठ्या प्रमाणावर दुरुस्ती करण्याचे नियोजन आहे. खुर्च्या, ध्वनिव्यवस्था, रंगमंच आणि व्हीआयपी कक्ष यांच्याशी संबंधित दुरुस्तीची कामे प्रस्तावित आहेत. या कामांसाठी साधारण दोन महिने लागू शकतात. त्यामुळे ही कामे कधी सुरू करायची, कोणत्या कामांना आधी प्राधान्य द्यायचे आणि त्याचा नाट्यप्रयोग व इतर कार्यक्रमांवर किती परिणाम होईल, यावर चर्चा करून निर्णय घेतला जाणार असल्याचे कामठे यांनी सांगितले.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.