शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
11:09  फ्लॅट द्या किंवा ३२.८७ लाख १५% व्याजासह परत करा; नांदगुडे पाटील डेव्हलपर्सला आयोगाचा आदेश 29 ऑक्ट | 17:13  पुणे पदवीधरमध्ये महाविकास आघाडी, शिक्षकमध्ये भाजप; महायुतीत पराभवावरून नाराजी 29 ऑक्ट | 16:31  मावळात डंपरच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू; संतप्त ग्रामस्थांचा तळेगाव एमआयडीसीत रास्ता रोको 12:09  पुण्यात डेंग्यू रोखण्यासाठी महापालिका सतर्क; एक हजारांहून अधिक बांधकामस्थळांना नोटिसा 11:24  गहुंजेतील लोढा बेलमाँडोमध्ये बंद फ्लॅटमध्ये मुग्धा देशमुख मृतावस्थेत, कुटुंबाला वाटत होते त्या लंडनला आहेत 10:41  गणवेशात दारू पिऊन गाडी फुटपाथवर चढवली, व्हिडीओ व्हायरल होताच पुण्यातील महिला पोलीस कर्मचारी निलंबित
सर्व थेट अपडेट

गहुंजेतील लोढा बेलमाँडोमध्ये बंद फ्लॅटमध्ये मुग्धा देशमुख मृतावस्थेत, कुटुंबाला वाटत होते त्या लंडनला आहेत

गहुंजेतील लोढा बेलमाँडोमध्ये बंद फ्लॅटमध्ये मुग्धा देशमुख मृतावस्थेत, कुटुंबाला वाटत होते त्या लंडनला आहेत छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
शिक्षण PT24 टीम

लंडनमध्ये शिकत असल्याचे कुटुंबाला वाटत असलेल्या मुग्धा देशमुख यांचा कुजलेला मृतदेह पोलिसांना सापडला. इमिग्रेशन नोंदीनुसार त्या ऑगस्टमध्येच ब्रिटन सोडून आल्या होत्या.

पुण्याजवळच्या गहुंजे भागातील लोढा बेलमाँडो या गृहसंकुलात एका बंद फ्लॅटमध्ये ३४ वर्षांच्या मुग्धा देशमुख यांचा मृतदेह सापडला. बुधवारी, २८ ऑक्टोबरच्या रात्री हा प्रकार समोर आला. मृतदेह बराच कुजलेला होता. आपली मुलगी लंडनमध्ये शिकतेय, असेच तिच्या घरच्यांना इतके दिवस वाटत होते.

मुग्धा या छत्रपती संभाजीनगर महापालिकेतून निवृत्त झालेले मुख्य अभियंता अविनाश देशमुख यांच्या कन्या. पतीचे निधन झाल्यानंतर त्या जुलै २०२५ मध्ये एमबीए करण्यासाठी लंडनला गेल्या होत्या. तिथे त्या एकट्याच राहायच्या आणि पार्ट-टाइम नोकरीही करायच्या, असे कुटुंबाचे म्हणणे आहे. आई-वडिलांशी त्यांचे व्हिडिओ कॉल आणि मेसेजवर नियमित बोलणे व्हायचे.

आईशी त्यांचे शेवटचे बोलणे २३ ऑक्टोबरला झाले. नोकरीची मुलाखत आहे, त्यामुळे घाईत आहे, असे त्यांनी तेव्हा सांगितले होते. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आई-वडिलांनी फोन केला, तर त्यांचा मोबाइल बंद लागला. नंतरही संपर्क झाला नाही आणि घरच्यांची काळजी वाढत गेली. अखेर वडिलांनी छत्रपती संभाजीनगरमधील उस्मानपुरा पोलीस स्टेशनमध्ये मुलगी हरवल्याची तक्रार नोंदवली.

उस्मानपुरा पोलिसांनी मुग्धा यांच्या बँक खात्यातले व्यवहार तपासले. त्यात स्विगी, झोमॅटो आणि ब्लिंकिट या डिलिव्हरी अॅप्सना पैसे दिल्याचे दिसले. ऑनलाइन फूड ऑर्डरच्या याच नोंदींवरून त्यांचा ठावठिकाणा लागला आणि पोलीस गहुंजेतील लोढा बेलमाँडोच्या पत्त्यावर पोहोचले.

बुधवारी रात्री छत्रपती संभाजीनगरहून आलेले पथक आणि पिंपरी-चिंचवड पोलीस त्या फ्लॅटवर गेले. दरवाजा आतून बंद होता आणि घरातून तीव्र दुर्गंधी येत होती. पोलिसांनी दरवाजा तोडला, तेव्हा बेडरूममध्ये मुग्धा यांचा मृतदेह पडलेला दिसला.

या प्रकरणात एक वेगळाच प्रश्न समोर आला आहे. लंडन पोलीस आणि इमिग्रेशन यंत्रणांच्या नोंदींनुसार मुग्धा ऑगस्ट २०२६ च्या अखेरीस युनायटेड किंगडम सोडून निघाल्या होत्या. म्हणजे जवळपास दोन महिने त्या भारतातच होत्या, पण घरच्यांना याची कल्पनाच नव्हती. प्राथमिक तपासानुसार त्यांनी गहुंजेतला हा फ्लॅट भाड्याने घेतला होता आणि कोणालाही न सांगता तिथे राहत होत्या.

पिंपरी-चिंचवडमधील शिरगाव पोलीस स्टेशनमध्ये अपघाती मृत्यूची नोंद झाली आहे. आत्महत्या आहे की घातपात, या दोन्हींसह सर्व शक्यता पोलीस तपासत आहेत. मृत्यू कशामुळे झाला, हे पोलिसांनी अजून सांगितलेले नाही. त्यांच्या मृत्यूमागे आणखी कोणाचा हात होता का, आणि घरच्यांना न सांगता त्यांनी पुण्यात राहण्याचा निर्णय का घेतला, याचाही शोध पोलीस घेत आहेत. मृत्यूचे नेमके कारण आणि त्याआधीच्या दिवसांतल्या हालचाली स्पष्ट होण्याची प्रतीक्षा आहे.

#पुणे#पढ़ाई#PT24#Education#Pune

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ