गुरुवार, 29 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

मावळात डंपरच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू; संतप्त ग्रामस्थांचा तळेगाव एमआयडीसीत रास्ता रोको

मावळात डंपरच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू; संतप्त ग्रामस्थांचा तळेगाव एमआयडीसीत रास्ता रोको छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
PT24 टीम

आठवडाभरात दोन ज्येष्ठ नागरिकांचा डंपरच्या धडकेत मृत्यू झाल्यानंतर ग्रामस्थ रस्त्यावर उतरले. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी २३ स्टोन क्रशर आणि ६ आरएमसी प्लांट बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या.

मावळ तालुक्यातील मंगरूळ, आंबी, गोळेवाडी, नवलाख उंब्रे आणि तळेगाव एमआयडीसी परिसरात अवजड वाहने बेफाम धावत आहेत. तिथे अपघात सातत्याने होत असल्याने लोकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला आहे. अवघ्या आठवडाभरात डंपरच्या धडकेत दोन ज्येष्ठ नागरिकांचा जीव गेला आणि ग्रामस्थांचा संताप अनावर झाला. त्यांनी तळेगाव एमआयडीसी रस्त्यावर उतरून रास्ता रोको केला. त्याची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी परिसरातील २३ स्टोन क्रशर आणि ६ आरएमसी (RMC) प्लांट बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार, २७ ऑक्टोबर रोजी मंगरूळ-नवलाख उंब्रे रस्त्यावरील शेटेवस्ती परिसरात भरधाव डंपरने धडक दिली. त्यात नाथा गोविंद पोटवडे (वय ६५) यांचा जागीच मृत्यू झाला. त्याआधी २२ ऑक्टोबर रोजी अशाच एका डंपरच्या धडकेत नानीबाई सोपान नखाते (वय ७५) या वृद्ध महिलेचाही मृत्यू झाला होता.

एका आठवड्यात दोन वृद्धांचे बळी गेल्याने परिसरात तीव्र असंतोष पसरला. अपघात झाला की पोलीस फक्त पंचनामे करतात, पण या अवजड वाहनांचा जीवघेणा वेग आणि त्यांची वाहतूक यावर ठोस नियंत्रण का आणले जात नाही, असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी केला.

आंबी, मंगरूळ-नवलाख उंब्रे, आंबळे, शिरे-शेटेवाडी आणि कदमवाडी या भागात मोठ्या संख्येने स्टोन क्रशर आणि रेडिमिक्स काँक्रीट (आरएमसी) प्रकल्प सुरू आहेत. या प्रकल्पांमधून खडी आणि बांधकाम साहित्य वाहून नेणारी शेकडो अवजड वाहने रात्रंदिवस फिरत असतात. त्यामुळे अपघाताचा धोका खूप वाढला आहे. शिवाय धुळीमुळे लोकांच्या आरोग्याचा आणि प्रदूषणाचा प्रश्नही बिकट झाला आहे.

या सगळ्याला कंटाळलेल्या ग्रामस्थांनी शांतराम कदम, देवा गायकवाड, निवृत्ती शेटे आणि नामदेव भसे यांच्या नेतृत्वाखाली तळेगाव एमआयडीसी रस्त्यावर रास्ता रोको सुरू केला. परिसरातील २३ स्टोन क्रशर आणि ६ आरएमसी प्लांट कायमचे बंद करावेत, अशी ठाम मागणी आंदोलकांनी केली.

आंदोलन आक्रमक झाले आणि परिस्थिती गंभीर होती, हे ओळखून सहाय्यक पोलीस आयुक्त विठ्ठल कुबडे यांनी घटनास्थळावरूनच आपल्या मोबाईलवरून जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याशी थेट संपर्क साधला.

जिल्हाधिकारी डुडी यांनी व्हिडिओ कॉलवरून आंदोलक ग्रामस्थांशी थेट संवाद साधला. आंबी, मंगरूळ-नवलाख उंब्रे, आंबळे, शिरे-शेटेवाडी आणि आसपासचे २३ स्टोन क्रशर तसेच ६ आरएमसी प्लांट बंद ठेवण्याबाबत संबंधित मालकांना सूचना दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. येत्या दोन दिवसांत याबाबतचे अधिकृत लेखी आदेश काढले जातील आणि ग्रामस्थांची स्वतंत्र बैठक घेऊन त्यांच्या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढला जाईल, असे आश्वासन नायब तहसीलदार गणेश तळेकर यांनी दिले.

या घटनेनंतर तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील यांनी सांगितले की, अपघाताला कारणीभूत ठरलेल्या आणि नियम मोडणाऱ्या ४ अवजड वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. यापुढे महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनाचे संयुक्त पथक या मार्गावरील बेकायदा अवजड वाहतुकीवर सातत्याने कडक कारवाई करेल, असेही त्यांनी सांगितले.

#पुणे#PT24#Pune

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ