गुरुवार, 29 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

पिंपरी चिंचवड करंडक: लक्ष्य ॲकॅडमी, मावळ वॉरीयर्स उपांत्यपूर्व फेरीत; कुंदन कुमार सामनावीर

पिंपरी चिंचवड करंडक: लक्ष्य ॲकॅडमी, मावळ वॉरीयर्स उपांत्यपूर्व फेरीत; कुंदन कुमार सामनावीर छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
खेळ PT24 टीम

पिंपरी चिंचवड करंडक टी-२० स्पर्धेत लक्ष्य क्रिकेट ॲकॅडमीने ५२ धावांनी, तर मावळ वॉरीयर्सने १३३ धावांनी विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरी गाठली.

पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनतर्फे 'पिंपरी चिंचवड करंडक' ही आंतरक्लब खुल्या गटाची टी-२० स्पर्धा घेतली जात आहे. या स्पर्धेत लक्ष्य क्रिकेट ॲकॅडमी आणि मावळ वॉरीयर्स या दोन्ही संघांनी जोरदार विजय मिळवला आणि उपांत्यपूर्व फेरीत जागा पक्की केली. स्पर्धा हिंजवडी येथील फोर स्टार क्रिकेट मैदानावर सुरू आहे.

पहिल्या सामन्यात लक्ष्य क्रिकेट ॲकॅडमीने प्राधिकरण जिमखाना संघाला ५२ धावांनी हरवले. या विजयात कुंदन कुमारच्या अष्टपैलू खेळाचा मोठा वाटा होता. म्हणूनच त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

लक्ष्य ॲकॅडमीने आधी फलंदाजी केली आणि २० षटकांत ९ गडी गमावून १५९ धावा केल्या. कुंदन कुमारने ३९ धावा केल्या, अमेय जाधवने २२ आणि जयेश राठोडने १८ धावा जोडल्या. प्राधिकरण जिमखान्याकडून अरूश गुप्ताने भेदक गोलंदाजी करत १३ धावांत पाच गडी बाद केले.

विजयासाठी १६० धावांचे आव्हान समोर असताना प्राधिकरण जिमखान्याचा डाव १९.५ षटकांत १०७ धावांवर संपला. आदित्य भोसलेने ४६ धावांची झुंजार खेळी करून प्रतिकार केला. अंकुर मिश्राने १४ धावा केल्या. पण लक्ष्यच्या प्रितम सूर्यवंशीने २८ धावांत चार गडी बाद करून प्राधिकरणच्या फलंदाजीला खिंडार पाडले. कुंदन कुमारनेही चार धावांत दोन गडी बाद करून संघाच्या विजयाला हातभार लावला.

दुसऱ्या सामन्यात मावळ वॉरीयर्सने पीसीएमसी क्रिकेट ॲकॅडमीचा तब्बल १३३ धावांनी पराभव केला. या विजयामुळे मावळ वॉरीयर्सचेही उपांत्यपूर्व फेरीतील स्थान निश्चित झाले. जशन सिंगची आक्रमक फलंदाजी या विजयाचा पाया ठरली.

प्रथम फलंदाजी करताना मावळ वॉरीयर्सने २० षटकांत ८ गडी गमावून २५७ धावांचा डोंगर उभा केला. जशन सिंगने फक्त ४४ चेंडूंत ७ चौकार आणि ६ षटकारांसह ८२ धावा केल्या. निलेश दिघेने तर केवळ १९ चेंडूंत ६ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ५८ धावा ठोकून धावसंख्येला मोठा वेग दिला. विक्रम भेगाडेने ४२ आणि गणेश धामणकरने २८ धावांची भर घातली.

एवढ्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना पीसीएमसी क्रिकेट ॲकॅडमीचा डाव २० षटकांत ७ बाद १२४ धावांवरच थांबला. अर्जुन साळुंकेने ३६ आणि समर्थ जगतापने २६ धावा केल्या. मावळ वॉरीयर्सकडून चैतन्य कोंडभर आणि युवराज गोळे यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. ८२ धावांच्या आक्रमक खेळीसाठी जशन सिंगला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.

सामन्यांचा संक्षिप्त निकाल असा: लक्ष्य क्रिकेट ॲकॅडमी २० षटकांत ९ बाद १५९ (कुंदन कुमार ३९, अमेय जाधव २२, जयेश राठोड १८; अरूश गुप्ता ५-१३). प्राधिकरण जिमखाना १९.५ षटकांत सर्वबाद १०७ (आदित्य भोसले ४६, अंकुर मिश्रा १४; प्रितम सूर्यवंशी ४-२८, कुंदन कुमार २-४). सामनावीर: कुंदन कुमार.

#पुणे#खेल#PT24#Sports#Pune

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ