सायबेरियातील अँटी-प्लेग संस्थेच्या महिला संशोधकाचा अचानक संशयास्पद मृत्यू
डारया शिपिलोवा यांच्या मृत्यूनंतर रशियातील प्लेग संशोधनाकडे जगाचे लक्ष गेले आहे.
सायबेरियातील प्रमुख अँटी-प्लेग रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये काम करणाऱ्या डारया शिपिलोवा या महिला संशोधकाचा संशयास्पद आणि अचानक मृत्यू झाला आहे. या बातमीने जगभरातले वैज्ञानिक आणि संशोधक चकित झाले असून सगळीकडे आश्चर्य व्यक्त होत आहे.
प्लेग म्हणजेच 'ब्लॅक डेथ' हे नाव ऐकलं तरी अंगावर काटा येतो. चौदाव्या शतकात या भयानक आजाराने जगातील एक तृतीयांश लोकसंख्येचा बळी घेतला होता. पुढे वैज्ञानिक प्रगतीमुळे या आजारावर नियंत्रण मिळवता आलं आणि आज त्याकडे इतिहासातला एक काळा अध्याय म्हणून पाहिलं जातं.
प्लेगसारखा आजार जगातून जवळपास नाहीसा झालेला असताना, रशियाच्या या गुप्त आणि अतिसंवेदनशील संस्थांमध्ये आजही त्यावर संशोधन का सुरू आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. सायबेरिया अतोनात थंडी आणि दुर्गम भागांसाठी ओळखला जातो. हिवाळ्यात तिथलं तापमान ० ते उणे ५० अंश सेल्सिअसपर्यंत खाली जातं. अशा बर्फाळ आणि एकाकी वातावरणात रशिया नेमकं काय लपवत आहे, असाही प्रश्न विचारला जात आहे.
ही घटना म्हणजे फक्त एका संशोधकाचा मृत्यू नाही. निसर्ग आणि प्रयोगशाळा यांच्यातला खेळ किती धोकादायक ठरू शकतो, याची ही जगभरातील वैद्यकीय तज्ज्ञांसाठी एक चेतावणी आहे, असं म्हटलं जात आहे.
सायबेरियाचं नाव काढलं की पांढरी बर्फाची चादर आणि हाडं गोठवणारी थंडी डोळ्यांसमोर येते. तिथलं तापमान बऱ्याचदा उणे असतं. रशियाने याच थंड आणि निर्मनुष्य भागात एक अत्यंत गुप्त आणि उच्च सुरक्षा असलेली संशोधन संस्था उभी केली आहे. जगातील सर्वात धोकादायक आणि जीवघेण्या आजारांवर तिथे संशोधन होतं. या संस्थेचं नाव 'अँटी-प्लेग इन्स्टिट्यूट' आहे.
रशियाचा हा भाग इतका वेगळा पडलेला आहे की, तिथला एखादा खतरनाक व्हायरस किंवा बॅक्टेरिया लीक झालाच, तरी तो लगेच सामान्य लोकसंख्येपर्यंत पोहोचू शकत नाही. सोव्हिएत युद्धाच्या काळापासूनच सायबेरियाकडे जैविक संशोधनाचं (बायोलॉजिकल रिसर्च) केंद्र म्हणून पाहिलं जात आलं आहे.
प्लेग पसरवणारे बॅक्टेरिया काळानुसार स्वतःमध्ये बदल करू शकतात. म्हणूनच आधुनिक वैद्यकीय विज्ञानाने या आजारावर मात केली असली, तरी रशिया त्यावर संशोधन करत आहे. जैविक शस्त्रांची स्पर्धा आणि भविष्यात येऊ शकणाऱ्या अज्ञात साथीच्या रोगांचा धोका, यांचा सामना करण्यासाठी रशियाला आपली तयारी भक्कम ठेवायची आहे.
आता प्रश्न असा की, या व्हायरसची भीती बाळगायला हवी का? ग्लोबल वॉर्मिंगमुळे सायबेरियातला साचलेला गोठलेला बर्फ वितळत आहे. या बर्फाखाली शतकानुशतके गाडले गेलेले जुने बॅक्टेरिया आणि व्हायरस पुन्हा जिवंत होऊ शकतात, असं वैज्ञानिकांचं म्हणणं आहे. त्यामुळे प्राचीन प्लेग किंवा एखादा नवा म्यूटंट व्हायरस पुन्हा वातावरणात आला, तर त्याचा मानवी शरीरावर काय परिणाम होईल, हे समजून घेण्याचा प्रयत्न रशियन वैज्ञानिक करत आहेत. याच पार्श्वभूमीवर सायबेरियातल्या त्या प्रयोगशाळेत संशोधन सुरू होतं, जी आता अपघाताची किंवा हलगर्जीपणाची शिकार ठरली आहे.