फक्त १० मिनिटांत होणारा खमंग टोमॅटो फ्राय, जेवणाला मिळेल चटपटीत तडका
रोज सकाळी भाजी काय करायची हा प्रश्न पडतोच, त्यावर सोपा आणि झटपट उपाय म्हणजे टोमॅटो फ्राय.
रोज सकाळी भाजी काय करायची हा प्रश्न प्रत्येक बाईच्या डोक्यात असतोच. घरातल्या एकाला एखादी भाजी आवडत नाही, तर दुसऱ्याला त्यातच काहीतरी चटपटीत हवं असतं. अशा वेळी झटपट होणारा टोमॅटो फ्राय हा एकदम उत्तम पर्याय ठरतो. हा पदार्थ करायला अगदी सोपा आहे आणि फक्त १० मिनिटांत तयार होतो.
बाजारातून यासाठी कोणतंही महागडं साहित्य आणायची गरज नाही. घरात नेहमी असणारे टोमॅटो, जिरे, कढीपत्ता आणि रोजचे मसाले वापरून हा पदार्थ बनतो. जे नवीन स्वयंपाक शिकत आहेत, त्यांनाही ही रेसिपी सहज जमेल. पोळी, भाकरी किंवा वरण-भातासोबतही टोमॅटो फ्राय छान लागतो.
यासाठी दोन मध्यम आकाराचे टोमॅटो लागतात, ते जास्त पिकलेले नसून थोडे कडकच घ्यावेत. सोबत थोडा कढीपत्ता, अर्धा चमचा जिरे, एक चमचा मिरची पावडर, पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ आणि दोन चमचे तेल इतकंच साहित्य पुरेसं आहे.
सर्वप्रथम टोमॅटो स्वच्छ धुऊन त्याचे गोल काप करावेत. काप ना खूप पातळ ना खूप जाड, मध्यम जाडीचे करावेत, म्हणजे ते व्यवस्थित तळले जातात. गॅसवर तवा ठेवून तो चांगला गरम होऊ द्यावा, पण गॅसची आच बारीकच ठेवावी, कारण मोठ्या आचेवर मसाला करपण्याची शक्यता असते.
तवा गरम झाल्यावर त्यावर थोडं तेल टाकावं. तेलात जिरे टाकून ते तडतडले की त्यात कढीपत्ता, हळद, मिरची पावडर आणि मीठ घालावं. हे मिश्रण चमच्याने हलकं हलवून घ्यावं, मसाला करपणार नाही याची काळजी घ्यावी, नाहीतर तो कडवट लागतो.
मसाला तयार झाल्यावर त्यावर टोमॅटोचे काप एकेक करून ठेवावेत. एक काप दुसऱ्यावर ठेवू नये, सगळे सुटे सुटे ठेवावेत, म्हणजे ते सगळ्या बाजूने नीट तळले जातील. बारीक आचेवर टोमॅटो शिजू द्यावेत. दोन-तीन मिनिटांत टोमॅटोला रंग यायला लागतो. कडेला खरपूसपणा दिसला की हळुवारपणे उलटून घ्यावं आणि दुसरी बाजूही तशीच शिजू द्यावी. दोन्ही बाजूने लालसर आणि थोडे कुरकुरीत झाले की टोमॅटो फ्राय तयार झाला असं समजावं आणि गॅस बंद करावा.
गरमागरम टोमॅटो फ्राय पोळीसोबत खायला मस्त लागतो, भाकरीसोबतही चांगला लागतो. काही जण तो भात-वरणासोबतही खातात. तोंडी लावण्यासाठीही हा एकदम बेस्ट पर्याय आहे. वरून थोडी कोथिंबीर किंवा चाट मसाला टाकला तरी चव आणखी वाढते. यासाठी वेगळा खर्च करायची गरज नाही, कारण घरात टोमॅटो आणि मसाले नेहमीच असतात. आवडीनुसार तिखट कमी-जास्त करता येतं, लहान मुलांसाठी करताना मिरची पावडर थोडी कमी टाकावी.