वेसावे मलजल प्रक्रिया केंद्राचे काम ३१ मार्चपर्यंत पूर्ण करा, नाहीतर दंडात्मक कारवाई; महापालिकेचा इशारा
वेसावे येथे उभारल्या जात असलेल्या मलजल प्रक्रिया केंद्राचे काम ३१ मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश बृहन्मुंबई महापालिकेने दिले आहेत. मुदतीत काम न झाल्यास कंत्राटदारावर कठोर दंडात्मक कारवाई होईल, असा इशारा अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिला.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
मुंबईच्या किनारपट्टीवरील पाण्याचा दर्जा सुधारावा आणि पर्यावरणाचे संवर्धन व्हावे, यासाठी वेसावे येथे मलजल प्रक्रिया केंद्र उभारले जात आहे. या केंद्राचे काम ३१ मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश बृहन्मुंबई महापालिकेने दिले आहेत.
ठरलेल्या मुदतीत काम पूर्ण झाले नाही, तर संबंधित कंत्राटदारावर कठोर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा अतिरिक्त पालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिला आहे. कामाचा वेग वाढवण्यासाठी त्यांनी मनुष्यबळ वाढवण्याचे आणि तीन सत्रांमध्ये काम करण्याचे आदेशही दिले आहेत.
बांगर यांनी नुकतीच प्रकल्पस्थळाला भेट दिली. तिथे स्थापत्य, यांत्रिकी आणि विद्युत अभियांत्रिकी कामांची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. प्रकल्पाची सुमारे ८० टक्के भौतिक प्रगती झाली आहे. मलजलावर द्वितीय स्तरीय प्रक्रिया करण्यासाठी लागणारी 'द्रव प्रक्रिया व्यवस्था' ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यानंतर संपूर्ण प्रकल्प ३१ मार्च २०२७ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.
हे केंद्र वेसावे येथील खारक्षेत्रात उभे राहत असून त्याची क्षमता दररोज सुमारे १८० दशलक्ष लिटर इतकी आहे. सांडपाण्यातील घातक प्रदूषके नष्ट करण्यासाठी इथे आधुनिक 'सिक्वेन्शियल बॅच रिअॅक्टर' तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. प्रकल्पातील संरचनेची कामे पूर्ण झाली आहेत. या पाहणीत प्रक्रिया टाक्या, इनलेट-आउटलेट व्यवस्था, पंप हाऊस, स्लज युनिट, पाइपलाइन, एरेशन ब्लोअर्स आणि स्क्रीनिंग यंत्रणा यांच्या कामांचाही आढावा घेण्यात आला.
सध्या प्रकल्पस्थळी दररोज सुमारे ३४० मनुष्यबळ कार्यरत आहे. ते ३१ ऑक्टोबरपर्यंत ५०० पर्यंत वाढवावे, असे निर्देश बांगर यांनी दिले. प्रकल्प पूर्ण होईपर्यंत हे अतिरिक्त मनुष्यबळ कायम ठेवून तीन सत्रांमध्ये चोवीस तास काम सुरू ठेवावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
काम वेगाने करत असताना गुणवत्ता, सुरक्षितता आणि कार्यक्षमतेशी तडजोड खपवून घेतली जाणार नाही, अशी सक्त ताकीदही त्यांनी दिली. पाहणी दौऱ्यावेळी प्रमुख अभियंता (मुंबई मलनिःसारण प्रकल्प) राजेंद्र परब यांच्यासह पालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या प्रकल्पाचा वेसावे, अंधेरी पूर्व व पश्चिम, जुहू आणि विलेपार्ले भागातील नागरिकांना मोठा लाभ मिळणार आहे. प्रक्रिया केलेले पाणी समुद्रात सोडले जाणार असल्याने वेसावेसह पश्चिम उपनगरांतील किनारपट्टीच्या पाण्याच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा होईल.