वर्धा जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ६०० शाळा सीसीटीव्हीच्या निगराणीखाली
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी वर्धा जिल्ह्यातील सर्व ६०० जिल्हा परिषद शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून ही यंत्रणा १०० टक्के सुरू असल्याचे सांगण्यात आले.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
बदलापूर येथील एका नामांकित शाळेत दोन चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाला होता. त्या घटनेनंतर राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्याच पार्श्वभूमीवर वर्धा जिल्ह्यातही जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये कॅमेरे बसवण्याच्या कामाला वेग आला.
वर्धा जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या एकूण ६०० शाळा आहेत. या सगळ्याच शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवून झाले आहेत. ही यंत्रणा १०० टक्के सुरू असल्याचेही सांगण्यात आले. म्हणजेच जिल्ह्यातील जिल्हा परिषदेची एकही शाळा या सोयीपासून वंचित राहिलेली नाही.
या कामासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी देण्यात आला. २०२४-२५ या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील ४०० जिल्हा परिषद शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्यासाठी १ कोटी ६५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला. त्यानंतर २०२५-२६ मध्ये आणखी ५०० शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्यासाठी २ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला.
निधी मिळाल्यानंतर हे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले. शाळेच्या परिसरातील विद्यार्थ्यांची सुरक्षितता, शाळेत येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांवर नजर आणि काही अनुचित प्रकार घडू नयेत, हा त्यामागचा उद्देश आहे.
शाळेच्या प्रवेशद्वारासह परिसरातील महत्त्वाच्या जागी कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्यामुळे शाळेच्या आवारात काय हालचाली सुरू आहेत, यावर शिक्षक आणि प्रशासनाला लक्ष ठेवता येत आहे. जिल्ह्यातील ६०० शाळांमध्ये ही सोय झाल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमध्येही कॅमेरे बसवल्यामुळे तिथली सुरक्षा व्यवस्था तंत्रज्ञानाच्या मदतीने मजबूत झाली आहे. सीसीटीव्हीमुळे विद्यार्थ्यांसोबतच शिक्षक आणि पालकांनाही सुरक्षित वाटू लागले आहे.
पूर्वी काही समाजकंटक शाळेच्या आवारातच दारू आणि इतर अमली पदार्थांचे सेवन करत होते. आता जिल्हा परिषदेच्या शंभर टक्के शाळांच्या आवारात सीसीटीव्ही बसल्याने या समाजकंटकांच्या मनमानीला बऱ्यापैकी आळा बसला आहे.
याबाबत बोलताना वर्धा येथील शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सीमा पाटील म्हणाल्या, "जिल्हा परिषदेच्या ६०० शाळा आहेत. या सर्व शाळांत शासनाच्या मार्गदर्शक सूचनांना केंद्र स्थानी ठेवून सीसीटीव्ही बसविण्यात आले आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून शाळांमध्ये सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासोबतच शाळा परिसरातील अनुचित प्रकारांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे."