दत्ता मेघे इन्स्टिट्यूटचं नाव आता अदानी इन्स्टिट्यूट, यूजीसीची मंजुरी
नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्चचं नामांतर अदानी इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर असं झालं आहे.
नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांत सुरू असलेल्या दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च या संस्थेचं नाव आता बदलणार आहे. या संस्थेला यापुढे 'अदानी इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर' या नावाने ओळखलं जाणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) या नव्या नावाला मंजुरी दिली आहे.
संस्थेचे वाइस चान्सलर डॉ. ललितभूषण वाघमारे आणि चीफ सर्व्हिसेस ऑफिसर रवींद्र मेहेरे यांनी ही माहिती दिली. दत्ता मेघे यांनी 1990 साली या संस्थेची स्थापना केली होती. एका मेडिकल कॉलेजपासून सुरू झालेली ही संस्था आता विस्तार होत होत नागपूर आणि वर्धा इथे कॅम्पस असलेलं बहुविद्याशाखीय विद्यापीठ बनली आहे.
नामांतरानंतर अदानी फाउंडेशन आणि डीएमआयएचईआर यांच्यातील सहकार्याला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यामध्ये परवडणारं आरोग्य शिक्षण आणि दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी सेंटर ऑफ एक्सलन्स उभारण्यावर भर दिला जाणार आहे.
डॉ. वाघमारे यांनी सांगितलं की, दर्जेदार शिक्षण आणि संवेदनशील आरोग्य सेवा देण्याची संस्थेची बांधिलकी पुढेही कायम राहणार आहे. विशेषतः ग्रामीण भागातील आणि आरोग्य सुविधांपासून वंचित असलेल्या समुदायांसाठी काम करण्यावर भर दिला जाईल. त्याचबरोबर संशोधन अधिक भक्कम करणं, आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारणं आणि विद्यार्थी, शिक्षक, संशोधक, रुग्ण तसंच समाजातील विविध घटकांसाठी नव्या संधी निर्माण करणं, यावरही काम केलं जाणार आहे.
चीफ सर्व्हिसेस ऑफिसर रवींद्र मेहेरे यांनी सांगितलं की, आरोग्य शिक्षण आणि आरोग्य सेवा 'नेक्स्ट लेव्हल'पर्यंत नेण्यासाठी प्रीती अदानी यांचंही सहकार्य मिळणार आहे.
त्यांनी पुढे सांगितलं की, दत्ता मेघे डेंटल कॉलेजमध्ये आतापर्यंत 100 प्रवेश झाले आहेत. नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील दोन्ही कॅम्पसमध्ये दरवर्षी सुमारे 100 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. यापैकी सुमारे 55 कोटी रुपयांची अत्याधुनिक मेडिकल उपकरणं खरेदी करण्याची प्रक्रिया आधीच सुरू झाली आहे. संस्थेकडून जागतिक दर्जाची उपकरणं आणि अनुभवी फॅकल्टी उपलब्ध करून देण्यावरही भर दिला जाणार आहे.
दत्ता मेघे संस्था आणि अदानी फाउंडेशन यांच्यात झालेल्या करारानुसार 'झीरो मॅनेजमेंट सिस्टम'च्या माध्यमातून कामकाज केलं जाणार आहे. यामध्ये प्राधान्यक्रमानुसार सर्वात आधी रुग्ण, त्यानंतर विद्यार्थी, कर्मचारी आणि स्थानिक रोजगार यांना महत्त्व दिलं जाईल. संस्थेकडून असंही सांगण्यात आलं की, आतापर्यंत विद्यार्थ्यांना सुमारे 60 कोटी रुपयांची स्कॉलरशिप दिली गेली आहे.
आरोग्य क्षेत्रातील संशोधन अधिक भक्कम करण्यावर अदानी सोशल फाउंडेशनचा विशेष भर राहणार आहे. डॉ. वाघमारे यांच्या मते, नागपूर जिल्ह्यात संशोधनासाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने इथे प्रामुख्याने उपचार सेवांवर लक्ष दिलं जाईल, तर वर्धामध्ये संशोधनासाठी पुरेशी जमीन उपलब्ध असल्याने तिथे आरोग्य क्षेत्रातील संशोधनाचं मोठं केंद्र उभारण्याची योजना आहे.