सोमवार, 19 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
11:46 IST

बोरघाटात वंदे भारत स्लीपरची वेग चाचणी यशस्वी, मुंबई-बंगळुरू मार्गावर लवकरच सेवा सुरू होण्याची शक्यता

मुंबई-बंगळुरू मार्गावरील वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेसची बोरघाटातील वेग चाचणी यशस्वी झाली असून घाटात ही गाडी ताशी ६० किलोमीटर वेगाने धावली.

बोरघाटात वंदे भारत स्लीपरची वेग चाचणी यशस्वी, मुंबई-बंगळुरू मार्गावर लवकरच सेवा सुरू होण्याची शक्यता छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

मुंबई-बंगळुरू मार्गावर धावणाऱ्या बहुप्रतीक्षित वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेसची बोरघाटात घेण्यात आलेली वेग चाचणी यशस्वी झाली आहे. घाटातील तीव्र चढ-उतार लक्षात घेता या टप्प्यात ही एक्स्प्रेस ताशी ६० किलोमीटर वेगाने धावली. चाचणी पूर्ण झाल्यानंतर या गाडीचा रेक वाडीबंदर येथे दाखल झाला.

या गाडीची सेवा मुंबई-बंगळुरू मार्गावर लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. या प्रस्तावित सेवेमुळे मुंबई, पुणे आणि बंगळुरू या प्रमुख शहरांदरम्यानचा रेल्वे प्रवास अधिक आरामदायी होईल, अशी अपेक्षा आहे.

बोरघाटातील भौगोलिक परिस्थितीमुळे या टप्प्यात गाडीचा वेग मर्यादित ठेवण्यात येणार आहे. घाटातून बाहेर पडल्यानंतर लोणावळा आणि कर्जतच्या पुढील मार्गावर ताशी ११० किलोमीटर वेगाने गाडी धावण्याचे नियोजन असल्याची माहिती देण्यात आली आहे.

या एक्स्प्रेसमध्ये एकूण १६ वातानुकूलित डबे असतील. त्यात एसी थ्री टियरचे ११ डबे, एसी टू टियरचे चार डबे आणि एसी प्रथम श्रेणीचा एक डबा असेल. गाडीची एकूण प्रवासी क्षमता ८२३ इतकी आहे. एसी थ्री टियरच्या ११ डब्यांमध्ये ६११ बर्थ, एसी टू टियरच्या चार डब्यांमध्ये १८८ बर्थ आणि एसी प्रथम श्रेणीच्या एका डब्यात २४ बर्थ असतील.

प्रस्तावित वेळापत्रकानुसार बंगळुरू ते मुंबई या प्रवासासाठी गाडी क्रमांक २७६५२ असेल. ही गाडी केएसआर बंगळुरू येथून रात्री १० वाजता सुटेल. धर्मावरम येथे रात्री १२.५० वाजता, वाडी येथे पहाटे ५.०५ वाजता आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुपारी १.३० वाजता ती पोहोचेल.

परतीच्या म्हणजेच मुंबई ते बंगळुरू प्रवासासाठी गाडी क्रमांक २७६५१ असेल. ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री १०.३० वाजता सुटेल. वाडी येथे सकाळी ७.२५ वाजता, धर्मावरम येथे सकाळी ११.४५ वाजता आणि बंगळुरू येथे दुपारी २.५० वाजता ती पोहोचेल, असे प्रस्तावित वेळापत्रकात म्हटले आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ