बुधवार, 14 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
20:31 IST

सुदान-इजिप्त सीमेजवळ सोन्याच्या खाणीवर हवाई हल्ला, ७२ कामगारांचा मृत्यू

मानवाधिकार संस्थांच्या माहितीनुसार सुदानच्या सीमेजवळील बेकायदेशीर सोन्याच्या खाणीवर झालेल्या हवाई हल्ल्यात ७२ कामगार ठार झाले.

सुदान-इजिप्त सीमेजवळ सोन्याच्या खाणीवर हवाई हल्ला, ७२ कामगारांचा मृत्यू छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

सुदान आणि इजिप्तच्या सीमावर्ती भागातून एक हृदयद्रावक बातमी आली आहे. दोन्ही देशांच्या वादग्रस्त सीमेजवळ असलेल्या एका बेकायदेशीर सोन्याच्या खाणीवर हवाई हल्ला झाला. या हल्ल्यात ७२ कामगारांचा जागीच मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.

मानवाधिकार कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्ल्याच्या वेळी या निर्जन भागात हजारो मजूर सोन्याच्या शोधात काम करत होते. अचानक झालेल्या बॉम्बहल्ल्यामुळे सगळीकडे प्रचंड घबराट पसरली आणि कामगारांनी जीव वाचवण्यासाठी दिसेल त्या दिशेने धाव घेतली.

'इमर्जन्सी लॉयर्स' नावाच्या मानवाधिकार संस्थेने प्रसारमाध्यमांशी बोलताना दावा केला आहे की, हा हल्ला इजिप्तच्या हवाई दलाने (Egyptian Air Force) केला. मात्र या संस्थेने आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ कोणताही अधिकृत पुरावा सादर केलेला नाही. हल्ल्यामागे नेमके कोण होते, याची अद्याप कोणतीही स्वतंत्र आंतरराष्ट्रीय पडताळणी झालेली नाही. इजिप्त सरकारने किंवा तेथील लष्कराने या घटनेवर अजून कोणतेही अधिकृत निवेदन जारी केलेले नाही.

या हल्ल्यातून वाचलेल्या दोन कामगारांनी 'एजन्सी फ्रान्स-प्रेस' (AFP) शी बोलताना त्या प्रसंगाचे वर्णन केले. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, एका लढाऊ विमानाने खाणीच्या परिसरावर सलग पाच वेळा बॉम्ब टाकले. विमानाचा मोठा आवाज आणि एकामागून एक झालेल्या स्फोटांनी सगळा परिसर हादरून गेला. आणखी हल्ले होतील या भीतीने घाबरलेले कामगार जवळच्या डोंगराळ भागात पळून गेले आणि तिथे तासनतास लपून राहिले.

दुसऱ्या प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, स्फोट होताच खाणीतील हजारो कामगार जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळाले. काही जण अल-अन्सारी गोल्ड मार्केटच्या दिशेने धावले, तर काही वाळवंटाच्या दिशेने गेले. पळताना त्यांना रस्त्याच्या कडेला आणि वाळूत अनेक कामगारांचे मृतदेह पडलेले दिसले. खाणीच्या मोठ्या ढिगाऱ्याखाली आणखी अनेक मजूर गाडले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे स्थानिक संघटनांच्या मते, प्रत्यक्ष मृतांचा आकडा ७२ पेक्षा कितीतरी जास्त असण्याची शक्यता आहे.

सुदान-इजिप्त सीमेवर सोन्याच्या खाणीवर हल्ला होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी जून महिन्यातही इजिप्तच्या सीमेजवळील 'जबल अल-उकायदात' या परवाना नसलेल्या सोन्याच्या खाणीवर असाच हवाई हल्ला झाला होता. त्यात २३ कामगारांचा मृत्यू झाला होता. त्या वेळीही या हल्ल्यासाठी इजिप्तलाच जबाबदार धरण्यात आले होते.

जूनमधील घटनेनंतर इजिप्तच्या लष्कराने स्पष्टीकरण देताना म्हटले होते की, त्यांनी आपल्या सीमेत अवैध सोन्याच्या खाणकामाविरोधात विशेष मोहीम उघडली आहे. मात्र खाणीवरील थेट बॉम्बहल्ल्याचा त्यांनी कोणताही उल्लेख केला नव्हता. या सलग दुसऱ्या मोठ्या घटनेमुळे सीमावर्ती भागातील सोन्याच्या खाणींमध्ये तुटपुंज्या उत्पन्नासाठी जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या गरीब कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा समोर आला आहे.

सुदान आणि इजिप्त या दोन आफ्रिकन देशांमध्ये 'हलाईब त्रिकोन' (Halaib Triangle) या भूभागावरून दीर्घकाळ वाद सुरू आहे. हा प्रदेश सोने आणि इतर मौल्यवान खनिज संपत्तीने समृद्ध असल्याने दोन्ही देश त्यावर दावा करतात. इजिप्त हा सुदानी लष्कराचे प्रमुख अब्देल फताह बुरहान यांचा जवळचा मित्र देश मानला जातो.

दुसरीकडे, सुदान गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ अंतर्गत यादवीत होरपळत आहे. सुदानी सैन्य आणि मोहम्मद हमदान डग्लो यांच्या नेतृत्वाखालील 'रॅपिड सपोर्ट फोर्सेस' (RSF) या निमलष्करी दलात सुरू असलेल्या संघर्षात आतापर्यंत २ लाखांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ