बुधवार, 28 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 105 | Moderate 01:01 IST

सयाजी शिंदे यांचा मुलगा सिद्धार्थ वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत 'विष्णूबाळा'तून मराठी सिनेसृष्टीत

मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीत नाव कमावलेले अभिनेते सयाजी शिंदे यांचा मुलगा सिद्धार्थ शिंदे 'विष्णूबाळा' या आगामी चित्रपटातून पदार्पण करत आहे. बाप आणि लेक पहिल्यांदाच मराठी रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत.

सयाजी शिंदे यांचा मुलगा सिद्धार्थ वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत 'विष्णूबाळा'तून मराठी सिनेसृष्टीत छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

सध्या रुपेरी पडद्यावर कलाकारांची पुढची पिढी मुख्य भूमिकांत दिसू लागली आहे. राजकारण असो किंवा मनोरंजन क्षेत्र, बाप आणि मुलगा एकत्र असणं आता नवं राहिलेलं नाही. चित्रपटसृष्टीत तर बाप-लेक एकत्र झळकण्याची परंपराच आहे. आता या यादीत आणखी एका खास जोडीची भर पडणार आहे.

मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीत नाव कमावलेले अभिनेते सयाजी शिंदे यांचा मुलगा सिद्धार्थ सयाजी शिंदे आता मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. 'विष्णूबाळा' या आगामी मराठी चित्रपटातून बाप आणि लेकाची ही जोडी मराठी रुपेरी पडद्यावर पहिल्यांदा एकत्र काम करणार आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत सिद्धार्थ अभिनयाचा 'श्रीगणेशा' करणार आहे.

या चित्रपटात सिद्धार्थ एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसेल. आपल्या सुरुवातीबद्दल तो म्हणतो, 'महाविद्यालयीन काळापासून मला या क्षेत्राची ओढ वाटू लागली. या क्षेत्रात काम करण्यासाठी मी अभिनयाचे रितसर प्रशिक्षणही घेतले. सुरुवात करायची तर मराठी चित्रपटातून, हे मी ठरवलं होतं. या चित्रपटाच्या निमित्ताने माझ्या पदार्पणाचा आणि वडिलांसोबत काम करण्याचा दुग्धशर्करा योग जुळून आला आहे.'

या चित्रपटाच्या निमित्ताने रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन करायला मिळतंय, हे आपल्या दोघांसाठी आनंदाचं आहे, असं बाप आणि लेक दोघंही सांगतात. या बाप-लेकाच्या जोडीला एकत्र पाहणं प्रेक्षकांसाठी नक्कीच पर्वणी ठरेल.

'विष्णूबाळा' या चित्रपटाची निर्मिती शिव समर्थ फिल्म प्रोडक्शन आणि सिनेम्यटिक सफारी फिल्म प्रोडक्शन या बॅनरखाली होत आहे. लेखन अरविंद जगताप यांनी केलं आहे. 'रावरंभा' या ऐतिहासिक चित्रपटातून यश मिळवलेले दिग्दर्शक अनुप जगदाळे या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत. निर्मिती शिव समर्थ फिल्म प्रोडक्शनची असून सचिन क्षीरसागर सहनिर्माते आहेत, तर आदित्य गायकवाड कार्यकारी निर्माते आहेत.

हा चित्रपट सत्यघटनेवर आधारलेला आहे. रक्तरंजित संघर्षाचा नायक असलेल्या विष्णूबाळाची मध्यवर्ती भूमिका सयाजी शिंदे साकारणार आहेत. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील कलावंतांची मांदियाळी या भव्य चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

प्रदर्शनाच्या बाबतीतही हा चित्रपट मोठा पल्ला गाठणार आहे. मराठीसोबतच तो हिंदी, तेलुगू आणि तामिळ या भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या प्रेक्षकांपर्यंत हा चित्रपट पोहोचणार आहे.

#नागपूर#PT24#Nagpur

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ