सायबेरियात तपकिरी अस्वलांचा धुमाकूळ, सप्टेंबरमध्ये 7 बळी; पर्यावरण मंत्रालयावर गुन्हा
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
क्रास्नोयार्स्क परिसरात अस्वलांच्या हल्ल्यांमुळे घबराट पसरली आहे. गेल्या वर्षभरात 22 जणांचा मृत्यू झाल्यानंतर शिकाऱ्यांना परवाने देण्यात आले आहेत.
रशियातील सायबेरिया प्रदेशातून सध्या चिंता वाढवणारी बातमी येत आहे. जंगलातून बाहेर पडलेली मोठी तपकिरी अस्वले (Brown Bears) थेट माणसांच्या वस्त्यांवर हल्ले करू लागली आहेत. अस्वलांची संख्या वाढली आहे आणि ती हिंस्त्र झाली आहेत, त्यामुळे संपूर्ण परिसरात घबराट आहे. गेल्या वर्षभरात या हल्ल्यांमध्ये तब्बल 22 जणांचा मृत्यू झाला असून अनेक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत.
स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, क्रास्नोयार्स्क (Krasnoyarsk) हा भाग या संकटाचा मुख्य केंद्रबिंदू ठरला आहे. एकट्या या भागात 27,000 पेक्षा जास्त अस्वले असल्याचे सांगितले जाते. सप्टेंबर महिन्यात या प्रांतात काही दिवसांच्या अंतराने 7 जणांना अस्वलांनी फाडून मारले. आता ही अस्वले फक्त जंगलाच्या कडेला राहत नाहीत. सार्वजनिक उद्याने, मुख्य रस्ते आणि लोकांच्या अंगणातही ती मोकळेपणाने फिरताना दिसत आहेत. त्यामुळे लोकांनी स्वतःला घरात कोंडून घेतले आहे.
सरकारी आकडेवारी पाहिली तर गेल्या तीन दशकांत रशियात तपकिरी अस्वलांची संख्या जवळपास दुप्पट झाली आहे आणि ती 3,08,000 च्या पुढे गेली आहे. यामागे हवामान बदल (Global Climate Change) हे मुख्य कारण मानले जात आहे. गेल्या काही वर्षांत सायबेरियातला हिवाळा आधीपेक्षा लहान आणि सौम्य झाला आहे, त्यामुळे अस्वलांच्या गाढ झोपेचा (Hibernation) काळ कमी झाला आहे.
पर्यावरण तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, यंदा वसंत ऋतू खूप लवकर आला आणि कोरडा राहिला. त्यामुळे जंगलातील बेरी फळांसह इतर नैसर्गिक अन्नाचा मोठा तुटवडा झाला. भुकेने व्याकुळ झालेल्या अस्वलांना अन्नाच्या शोधात शेकडो किलोमीटर भटकावे लागले आणि त्यांचा रस्ता वस्त्यांकडे वळला. वस्त्यांबाहेर उघड्यावर टाकल्या जाणाऱ्या अन्नाच्या कचऱ्यामुळेही ती माणसांच्या भागात येत आहेत.
क्रास्नोयार्स्क आणि आसपासच्या गावांतले जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. पालकांनी लहान मुलांना बाहेर खेळायला पाठवणे बंद केले आहे. म्हातारे असोत की तरुण, कोणीही एकटे बाहेर पडण्याची हिंमत करत नाही. अनेक जण स्वतःच्या संरक्षणासाठी शस्त्रे किंवा रायफल्स घेऊनच बाहेर पडतात. "आम्ही आमच्याच घरात ओलीस (Hostages) असल्यासारखे वाटत आहे," अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
बागांमध्ये अस्वले निवांत बसलेली किंवा घरांबाहेरच्या कचराकुंड्या उचकटताना दिसणे आता रोजचेच झाले आहे. नागरिकांचा प्रशासनावर राग आहे आणि वन्यजीव खात्याने वेळेवर योग्य पावले उचलली नाहीत, असा आरोप केला जात आहे. वाढत्या जनक्षोभानंतर तपास अधिकाऱ्यांनी स्थानिक पर्यावरण मंत्रालयाविरुद्ध निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे.
अस्वलांच्या वाढत्या आक्रमकतेमुळे रशियन सरकारने कठोर पाऊल उचलले आहे. निसर्गाचा समतोल आणि माणसांची सुरक्षितता धोक्यात आल्याचे पाहून सरकारने नियंत्रित शिकार मोहिमेला (Culling Process) मंजुरी दिली आहे. ज्या भागात अस्वलांचा धोका सर्वात जास्त आहे, तिथे शिकाऱ्यांना बोलावण्यात आले असून त्यांना विशेष परवाने दिले जात आहेत.
तज्ज्ञांच्या मते, वन्यजीवांचे संरक्षण महत्त्वाचे आहे, पण माणसांचा जीव धोक्यात असताना प्रशासनाला असे टोकाचे निर्णय घ्यावे लागतात. शिकाऱ्यांच्या मदतीने धोकादायक अस्वलांची संख्या कमी करण्याचे प्रयत्न सध्या युद्धपातळीवर सुरू आहेत, म्हणजे सायबेरियातील लोकांना पुन्हा सुरक्षित आयुष्य जगता येईल.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.