बुधवार, 14 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
22:01 IST

सह्याद्री साखर कारखान्याचा ५३ वा गळीत हंगाम सुरू; सर्व सभासदांच्या उसाचे गाळप होणार

यशवंतनगर येथे हंगामाचा शुभारंभ झाला. कितीही संकटे आली तरी सह्याद्री आव्हाने पेलण्यासाठी सज्ज आहे, असे चेअरमन बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

सह्याद्री साखर कारखान्याचा ५३ वा गळीत हंगाम सुरू; सर्व सभासदांच्या उसाचे गाळप होणार छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

यशवंतनगर (ता. कराड) येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या ५३ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ झाला. कारखान्याचे व्हाईस चेअरमन कांतीलाल भोसले-पाटील आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. संध्यारजनी कांतीलाल भोसले-पाटील यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला.

या प्रसंगी बोलताना माजी सहकार व पणन मंत्री आणि कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब पाटील यांनी सांगितले की, सह्याद्रीकडून उसाचा दर कमी दिला जात नाही. सभासद हीच कारखान्याची ताकद आहे. सर्व सभासदांच्या उसाचे गाळप केले जाणार आहे. कितीही संकटे आली तरी सह्याद्री आव्हाने पेलण्यासाठी सज्ज आहे, असे ते म्हणाले.

कार्यक्रमाला माजी सभापती देवराज पाटील, शहाजी क्षीरसागर, अजितराव पाटील चिखलीकर, माजी सभापती मानसिंगराव जगदाळे, सौ. संगीता साळुंखे, तानाजीराव साळुंखे, रवींद्र पवार, सुहास बोराटे, शंकरराव खापे, उद्धवराव बोराटे, प्रणव ताटे, प्रशांत यादव, दाजी पवार, प्रताप चव्हाण आदी उपस्थित होते.

दुष्काळाचा मुद्दा मांडताना बाळासाहेब पाटील म्हणाले की, सहकारावर दुष्काळाचे संकट आहे आणि अभूतपूर्व स्थिती आहे. कराड उत्तरचा भाग दुष्काळाच्या छायेत आहे. धरणाच्या पाण्याचे नियोजन होत नाही. मार्च-एप्रिलला पाणी द्यावे लागणार आहे. भविष्यात मोठ्या अडचणी आहेत, असे त्यांनी सांगितले.

सह्याद्रीचा सभासद हा कारखान्याचा घटक आहे, असे सांगून त्यांनी ऊस गळिताच्या बाबतीत सर्वांना समान न्याय मिळेल, यात भेदभाव केला जाणार नाही, असे स्पष्ट केले. शेतकऱ्यांचा पाण्यावर हक्क आहे, मात्र यात राजकारण जास्त आहे, असे ते म्हणाले. लिफ्टने पाणी देणे हे शासनाचे कर्तव्य आहे, तर सह्याद्री कारखान्यात राजकारण नाही, असेही त्यांनी सांगितले.

कांतीलाल भोसले-पाटील यांनी सांगितले की, सह्याद्री कारखान्यामुळे आपल्याला वैभव प्राप्त झाले. सह्याद्री हा जीवाप्राणाचा विषय ठरला आहे. ५३ वर्षांत कारखाना समृद्धीला आला असून, साडेबारा हजार मॅट्रिक टन क्षमतेचा हा कारखाना सर्वांच्या चिकाटीने चालणार आहे. कारखान्याचा लौकिक टिकवा, असे आवाहनही त्यांनी केले.

शहाजी क्षीरसागर आणि मानसिंगराव जगदाळे यांनी मार्गदर्शन केले. त्यात सह्याद्रीने सभासदांना न्याय दिला, कारखान्याचे नियोजन चांगले आहे, असे मुद्दे मांडण्यात आले. खाजगी कारखान्यांचे आव्हान आहे आणि खाजगीत न्याय मिळत नाही, सभासदांचा सह्याद्रीवर विश्वास आहे आणि हा विश्वास सर्वसाधारण सभेत दिसला, असेही सांगण्यात आले. कारखाना दूरदृष्टीतून उभारला असून त्याचे विस्तारीकरण झाले आहे. राजकारण न आणता कारखाना चालतो, असे सांगत ऊस घालीन तर सह्याद्रीलाच घालीन हा पॅटर्न राबवा, असे आवाहन करण्यात आले.

देवराज पाटील यांच्या म्हणण्यानुसार, ऊस घालीन तर सह्याद्रीलाच हे स्लोगन ठरावे. बाळासाहेब पाटील या कर्तृत्ववान व्यक्तीच्या हातात सह्याद्री कारखाना आहे. कारखान्याचे कार्यकारी संचालक, अधिकारी आणि कामगार चांगले काम करतात. संकटाच्या काळात बाळासाहेब पाटील यांच्या मागे रहा, असे आवाहन करण्यात आले.

कार्यकारी संचालक विश्वजीत शिंदे यांनी प्रास्ताविक केले. दादासाहेब पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर राहुल निकम यांनी आभार मानले.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ