दिवेआगर समुद्रात बुडून आळंदीतील क्लासच्या 8 जणांचा मृत्यू, 44 जणांचा ग्रुप सहलीला आला होता
रायगड जिल्ह्यातील दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर पुण्यातील आळंदी येथून आलेल्या खासगी कोचिंग क्लासमधील 8 पर्यटक खोल पाण्यात बुडाले आणि उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर एक अत्यंत मन हेलावून टाकणारी आणि मोठी दुर्घटना घडली आहे. पुण्यातील आळंदी येथून सहलीसाठी आलेल्या एका खासगी कोचिंग क्लासमधील 8 पर्यटक समुद्राच्या खोल पाण्यात बुडाले आणि उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे आळंदी, पुणे आणि संपूर्ण कोकणात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
प्राथमिक माहितीनुसार, आळंदी परिसरातील या खासगी कोचिंग क्लासचे विद्यार्थी आणि तरुण सहलीसाठी दिवेआगर येथे आले होते. या क्लासमधील 42 विद्यार्थी आणि 2 शिक्षक, म्हणजे एकूण 44 जणांचा ग्रुप रायगड जिल्ह्यातील दिवेआगार येथे सहलीसाठी आला होता. याच दरम्यान ही दुर्घटना घडल्याचे वृत्त आहे.
सगळे जण समुद्रकिनारी मनसोक्त आनंद घेत होते. किनाऱ्यावरील निसर्गाचा आस्वाद घेत असताना काही तरुण समुद्राच्या पाण्यात उतरले. पण समुद्राच्या पाण्याचा आणि लाटांच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने ते नकळत खोल पाण्यात ओढले गेले. पाण्याचा लोट तीव्र असल्यामुळे त्यांना बाहेर पडणे कठीण झाले आणि ते पाण्यात बुडू लागले.
विद्यार्थी पाण्यात बुडत असल्याचे लक्षात येताच किनाऱ्यावर एकच तारांबळ उडाली. 'महाकाली वॉटर स्पोर्ट्स'च्या सतर्क कर्मचाऱ्यांनी आणि स्थानिक नागरिकांनी कोणतीही वेळ न घालवता तातडीने समुद्रात उडी घेतली. या कर्मचाऱ्यांनी आणि स्थानिकांनी खूप मेहनत घेऊन आठही जणांना पाण्याबाहेर काढले.
त्यानंतर सर्व जखमींना तातडीने उपचारासाठी बोर्ली पंचतन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच किंवा उपचारादरम्यान या आठही जणांचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
एकाच दुर्घटनेत आठ तरुण पर्यटकांचा मृत्यू झाल्याने दिवेआगर परिसरात शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासन आणि महसूल अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे.
या दुर्घटनेमुळे कोकणातील समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्रशासनाकडून वारंवार सूचना देऊनही पर्यटकांकडून अनेकदा दुर्लक्ष होते. या पार्श्वभूमीवर आता पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने पर्यटकांना समुद्रात उतरताना अत्यंत खबरदारी बाळगण्याचे आणि नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.