आठ विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर प्रशासन कामाला; आळंदीतील 'विनर्स अकॅडमी'ला थेट सील
दिवेआगर दुर्घटनेनंतर आळंदी नगरपरिषदेने शहरातील कोचिंग क्लासेस आणि इतर आस्थापनांची तपासणी सुरू केली असून 'विनर्स अकॅडमी'ची इमारत पोलीस बंदोबस्तात सील करण्यात आली.
दिवेआगर येथे सहलीसाठी गेलेल्या आळंदीतील आठ विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या भीषण दुर्घटनेनंतर आता स्थानिक प्रशासन कामाला लागले आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर आळंदी नगरपरिषदेने शहरातील अनधिकृत कोचिंग क्लासेस आणि इतर आस्थापनांची तपासणी सुरू केली आहे.
या कारवाईत दिवेआगर दुर्घटनेतील विद्यार्थ्यांशी संबंधित असलेल्या 'विनर्स अकॅडमी'वर थेट सील ठोकण्यात आले आहे. नगरपरिषदेच्या विशेष पथकाने अकॅडमीच्या इमारतीची पाहणी केली. तेव्हा अकॅडमीकडे व्यवसाय परवाना आणि ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) दोन्हीही नसल्याचे समोर आले.
नगरपरिषदेच्या माहितीनुसार, श्री. नारायण हरिभाऊ दस यांच्या मालकीच्या मालमत्ता क्रमांक जुना ११३७ (नवीन LAN00001729) या इमारतीत 'विनर्स अकॅडमी' नावाने कोचिंग क्लासेस सुरू होते. नगरपरिषदेच्या अभिलेखांची तपासणी केली, तेव्हा अकॅडमीने व्यवसाय परवाना किंवा आवश्यक ना-हरकत प्रमाणपत्र घेतलेले नव्हते, असे आढळले. म्हणजेच या क्लासचा कारभार आवश्यक परवानग्यांशिवाय सुरू होता, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
या प्रकाराची माहिती मिळताच आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार कर विभाग प्रमुख सीमा चारवे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने ही कारवाई केली. पोलीस बंदोबस्तात विनर्स अकॅडमीच्या इमारतीला टाळे ठोकून ती सील करण्यात आली.
फक्त एकाच क्लासवर कारवाई करून नगरपरिषद थांबलेली नाही. दिवेआगर दुर्घटनेनंतर शहरातील कोचिंग क्लासेस तसेच इतर आस्थापनांच्या परवानग्या तपासण्याची मोहीमच हाती घेण्यात आली आहे. सर्व शिक्षण संस्था आणि कोचिंग क्लासेसनी आवश्यक व्यवसाय परवाने, ना-हरकत प्रमाणपत्रे आणि इतर कायदेशीर परवानग्या घेऊनच कारभार करावा, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
नियमांचे पालन न करणाऱ्या आस्थापनांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही नगरपरिषदेने दिला आहे. दिवेआगर समुद्रकिनारी झालेल्या दुर्घटनेत आळंदीतील आठ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण शहरावर शोककळा पसरली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या कारवाईमुळे अनधिकृतपणे सुरू असलेल्या शैक्षणिक आस्थापनांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.