राजुरा शहरातील बेशिस्त दुचाकीस्वारांमुळे नागरिक त्रस्त; दुर्घटना घडल्यावरच प्रशासन जागे होणार का?
राजुरा शहरात अल्पवयीन मुलांकडून भरधाव वेग, ट्रिपल सीट आणि स्टंटबाजी वाढल्याने अपघाताची भीती आहे. ठाणेदार नितीन चिंचोलकर यांनी विशेष मोहीम राबवण्याचे सांगितले आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा शहरातील रस्त्यांवर काही अल्पवयीन दुचाकीस्वार बेदरकारपणे गाडी चालवत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. भरधाव वेगाने दुचाकी चालवणे, ट्रिपल सीट बसणे, कर्णकर्कश हॉर्न वाजवणे आणि रस्त्यावर स्टंटबाजी करणे असे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे एखादा अपघात होईल, अशी भीती नागरिक बोलून दाखवत आहेत.
विशेषतः शिवाजी शाळा ते बसस्थानक या मार्गावर शाळा आणि कॉलेज सुटल्यानंतर अशा प्रकारांचा त्रास होतो, असे नागरिकांचे म्हणणे आहे. या रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या सगळ्यांनाच त्याचा फटका बसत आहे.
वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून काही विद्यार्थी दुचाकी वेगाने पळवतात. त्यामुळे पायी चालणाऱ्यांना आणि इतर वाहनचालकांना धोका निर्माण होत आहे. ट्रिपल सीट बसल्यावर गाडीवरील नियंत्रण सुटू शकते, हे माहीत असूनही काही जण निष्काळजीपणे गाडी चालवताना दिसतात. अशाच एका प्रकारात एका तरुणाच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत होऊन फ्रॅक्चर झाल्याची माहिती समोर आली आहे.
वाहतुकीचे नियम मोडले जात असल्याची आणखी एक बाब लोकांच्या नजरेत येत आहे. काही दुचाकींवर अधिकृत नंबरप्लेट लावण्याऐवजी फोटो किंवा चित्र लावलेले दिसते. गाडीची ओळख स्पष्ट होण्यासाठी नंबरप्लेट महत्त्वाची असते. तरीही अशा प्रकारांकडे दुर्लक्ष का केले जात आहे, असा सवाल नागरिक विचारत आहेत.
अल्पवयीन मुलांच्या हातात दुचाकी देणाऱ्या पालकांनीही या परिस्थितीची गंभीर दखल घेण्याची गरज आहे. नुसते वाहतुकीचे नियम सांगून भागणार नाही, तर त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होणेही आवश्यक आहे. परवाना नसताना गाडी चालवणारे, ट्रिपल सीट जाणारे, नियमबाह्य नंबरप्लेट लावणारे आणि स्टंटबाजी करणारे यांच्याविरोधात नियमित तपासणी आणि कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
शहरात एखादी गंभीर दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का, असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत. संभाव्य अपघात टाळण्यासाठी पोलीस आणि वाहतूक विभागाने तातडीने विशेष मोहीम राबवून बेशिस्त वाहनचालकांना आळा घालावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
याबाबत राजुरा येथील ठाणेदार नितीन चिंचोलकर म्हणाले, "शहरातील स्टंटबाजी रोखण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार असून, स्टंटबाजी करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. नागरिकांनी अशा प्रकारांची माहिती पोलिसांना द्यावी. तसेच, पालकांनी अल्पवयीन मुलांच्या हातात वाहने देऊ नयेत."