पंतप्रधानांचा बारामती दौरा लांबला, हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचे उद्घाटन पुन्हा रखडले
३ नोव्हेंबरचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा पुढे गेल्याने पुणे मेट्रोला प्रवाशांशिवाय आणखी काही दिवस फेऱ्या माराव्या लागणार आहेत.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
पुण्यातील लाखो आयटी कर्मचारी हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रोची वाट पाहत आहेत. या २३ किलोमीटरच्या मार्गावर गेल्या तीन महिन्यांहून जास्त काळ फक्त रिकाम्या डब्यांच्या चाचण्या (ट्रायल रन) सुरू आहेत. आता या मेट्रोला आणखी काही दिवस प्रवाशांशिवायच फेऱ्या माराव्या लागणार आहेत.
येत्या ३ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बारामती दौरा ठरला होता. तो अचानक पुढे ढकलण्यात आला आहे. त्यामुळे या मोठ्या मेट्रो प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी पुन्हा एकदा नव्या मुहूर्ताची वाट पाहावी लागणार आहे. 'सीएमआरएस'ची मंजुरी मिळूनही शंभरहून अधिक दिवस गाड्या रिकाम्या चालवण्याची वेळ पुणे मेट्रोवर आली आहे.
हिंजवडी-शिवाजीनगर मार्गावरील एकूण १७ स्थानकांसाठी 'मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांची' (CMRS) अधिकृत परवानगी आधीच मिळालेली आहे. उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते व्हावे यासाठी जोरदार हालचाली सुरू होत्या. दिवाळीच्या सुट्ट्यांनंतर आयटी कर्मचाऱ्यांना या वेगवान प्रवासाचा थेट फायदा घेता यावा, असा त्यामागचा हेतू होता. पण ऐन वेळी पंतप्रधानांचा दौरा रद्द झाल्याने नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात उद्घाटन करण्याची प्रशासनाची मुदत पुन्हा एकदा हुकली आहे.
मूळ नियोजनानुसार ही मेट्रो गेल्या वर्षी मार्च महिन्यात सुरू व्हायची होती, पण काम सतत रखडत गेले. मार्च २०२६ च्या अंतिम मुदतीतही सेवा सुरू होऊ शकली नाही. त्यामुळे खुद्द मुख्यमंत्री कार्यालयाला हस्तक्षेप करावा लागला. जुलैपर्यंत पहिला १२ किलोमीटरचा टप्पा सुरू करा, असे कडक आदेश देण्यात आले. त्यानंतर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि पुणे आयटी सिटी मेट्रो यांनी वेगाने काम करून पहिल्या टप्प्यातील १२ स्थानकांचे काम पूर्ण केले.
सुरुवातीच्या तपासणीनंतर 'सीएमआरएस'ने पहिल्या १२ स्थानकांपर्यंत मेट्रो चालवायला मंजुरी दिली होती. मात्र फक्त १२ स्थानकांपर्यंत न चालवता ती थेट जिल्हा न्यायालयापर्यंत नेली तर प्रवाशांना जास्त सोयीचे होईल, असा विचार झाला. त्यामुळे आणखी ५ स्थानकांचे काम पूर्ण करण्यात आले आणि त्यांच्याही परवानग्या मिळवण्यात आल्या. सगळ्या परवानग्या हातात असतानाच विधान परिषद निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेमुळे उद्घाटनाचा मुहूर्त हुकला.
राज्य सरकारने ही मेट्रो प्रवाशांच्या सेवेत आणण्यासाठी यंत्रणेला धारेवर धरले होते आणि सतत पाठपुरावा केला होता. आता सगळ्या परवानग्या मिळाल्यानंतर लगेच सेवा सुरू करण्याऐवजी फक्त व्हीआयपी उद्घाटनाच्या हट्टापायी टाळाटाळ होत असल्याचा सूर उमटत आहे.
तज्ज्ञांच्या मते, एखादे छोटे स्थानक बाजूला ठेवून बाकीच्या पूर्ण मार्गावर प्रत्यक्ष प्रवासी सेवा लगेच सुरू करणे गरजेचे होते. औपचारिक उद्घाटनाचे सोपस्कार पंतप्रधानांना वेळ मिळाल्यावर नंतरही करता आले असते. पण आता मेट्रो सेवा पूर्ण तयार असूनही पुणेकरांना आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.