पुण्यात कैनसपोर्ट संस्थेकडून कर्करुग्णांना मोफत उपचार, घरी सेवा आणि कलेतून मदतीचा हात
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
कर्करोग आणि इतर गंभीर आजारांच्या रुग्णांना उपचारांपासून समुपदेशनापर्यंत सेवा विनामूल्य देणारी कैनसपोर्ट संस्था पुण्यात २०२५ पासून काम करत आहे.
बाजारात एखादी वस्तू आवडली की किंमत विचारायची, पैसे द्यायचे आणि वस्तू घेऊन जायची, असा नेहमीचा व्यवहार असतो. पण पुण्यातल्या एका प्रदर्शनातल्या स्टॉलवर मात्र वेगळं चित्र दिसलं. तिथल्या रंगवलेल्या पणत्या, हस्तकलेच्या वस्तू आणि सजावटीच्या साहित्यावर किंमतच लावलेली नाही. वस्तू जितकी आवडेल, तितके पैसे ग्राहकाने स्वतःच्या इच्छेने द्यायचे आणि वस्तू घेऊन जायची.
या सगळ्या वस्तू कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांनी बनवल्या आहेत. त्यांच्या कलेला दाद मिळावी, त्यांचा आत्मविश्वास वाढावा आणि त्यातून मदतीसाठी निधी उभा राहावा, हा 'कैनसपोर्ट' संस्थेच्या या उपक्रमामागचा हेतू आहे. कर्करोगासह इतर गंभीर आजार असलेल्या रुग्णांना उपचारांपासून समुपदेशनापर्यंत अनेक सेवा ही संस्था विनामूल्य देते.
कैनसपोर्ट ही ना-नफा संस्था १९९६ मध्ये सुरू झाली. फक्त आजारावर उपचार करणं एवढ्यापुरतं तिचं काम मर्यादित नाही. गंभीर आजाराला तोंड देणाऱ्या रुग्णांना वेदनामुक्त जगण्यासाठी मदत करणं आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही मानसिक, भावनिक व सामाजिक आधार देणं, यावर संस्थेचा भर आहे. या कामाची दखल घेऊन जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) संस्थेला 'सार्वजनिक आरोग्य चॅम्पियन पुरस्कार' देऊन गौरवलं आहे. दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, पंजाब, महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश आणि झारखंड या सात राज्यांत संस्थेचं काम चालतं. पुण्यात संस्था २०२५ पासून सेवा देत आहे.
पुण्यात सध्या १३ पथकं रुग्णांपर्यंत पोहोचतात. या कामात पाच डॉक्टर, १३ परिचारिका आणि १४ समुपदेशक आहेत. दोन बाह्यरुग्ण विभागांतूनही रुग्णांना सुविधा मिळतात. वेदना आणि इतर शारीरिक त्रासांवर डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार, औषधं आणि परिचारिकांची सेवा, तसंच मानसिक व भावनिक अडचणींसाठी समुपदेशन, हे सगळं मोफत केलं जातं. गरजेच्या तपासण्या, सरकारी आर्थिक योजनांची माहिती आणि उपचारांबाबत मार्गदर्शनही संस्था देते.
रुग्णाला रुग्णालयात येणं शक्य नसेल, तर डॉक्टर, परिचारिका, समुपदेशक आणि फिजिओथेरपिस्ट यांचं प्रशिक्षित पथक घरी जाऊन काळजी घेतं. बाह्यरुग्ण सेवा, दिवसभराची देखभाल, रुग्णालयांतलं समुपदेशन आणि मोबाइल पॅलिएटिव्ह केअर क्लिनिक यांतूनही मदत दिली जाते. रुग्णाची घरी काळजी कशी घ्यायची आणि औषधं कशी द्यायची, याचं प्रशिक्षण कुटुंबीयांना दिलं जातं. गरजू रुग्णांना पौष्टिक आहार आणि प्रथिनयुक्त पूरक आहार दिला जातो. काळजीवाहूंना शिवणकाम, हातगाडी यांसारखे छोटे उद्योग सुरू करण्यासाठीही मदत केली जाते.
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अंबिका राजवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचं काम चालतं. रुग्णांनी बनवलेल्या वस्तूंच्या विक्रीतून येणारे पैसे आणि देणग्या यांमधून या सेवेला आर्थिक बळ मिळतं. रुग्णांच्या हातातून फक्त सुंदर वस्तू तयार होत नाहीत, तर त्यांच्या स्वतःच्या आणि इतरांच्या आयुष्यातही आशा निर्माण होते, अशी भावना संस्थेच्या प्रतिनिधी रेश्मा जाधव (समुपदेशक) आणि प्रिया भाले (परिचारिका) यांनी व्यक्त केली.
मदतीसाठी संपर्क: साथ साथ राष्ट्रीय पॅलिएटिव्ह केअर हेल्पलाइन १८००२०२७७७७ आणि दूरध्वनी सहाय्य ९२६६६८२१८२.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.