फुफ्फुसांचा कर्करोग आणि हवेचे प्रदूषण: PM2.5 सूक्ष्म कणांचा धोका वाढतोय
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
दीर्घकाळ प्रदूषित हवेच्या संपर्कात राहिल्याने फुफ्फुसांच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो, असे कर्करोगतज्ज्ञ डॉ. निखिल एम. शिरसी यांनी सांगितले.
आपण घेतलेला प्रत्येक श्वास आपल्या आरोग्यावर परिणाम करतो. फुफ्फुसांच्या कर्करोगाचा विषय निघाला की आधी धूम्रपान आठवते. पण वाढत्या वैज्ञानिक पुराव्यांनुसार आणखी एक मोठा जोखीम घटक समोर येत आहे, तो म्हणजे दीर्घकाळ प्रदूषित हवेच्या संपर्कात राहणे. याचा परिणाम धूम्रपान करणाऱ्यांवर आणि न करणाऱ्यांवरही होऊ शकतो. याबाबत M|O|C कॅन्सर केअरचे कर्करोगतज्ज्ञ डॉ. निखिल एम. शिरसी यांनी माहिती दिली आहे.
भारतात गाड्यांचा धूर, बांधकामांची धूळ, कारखान्यांमधून निघणारे उत्सर्जन आणि हंगामी धुरके यांचा फटका लाखो लोकांना बसतो. प्रदूषित हवेमुळे फक्त खोकला किंवा श्वास घेताना त्रास होतो असे नाही. अनेक वर्षे अशा हवेत राहिल्यास कर्करोग होण्यालाही हातभार लागू शकतो.
या सगळ्यात सर्वाधिक चिंता PM2.5 बद्दल आहे. हे २.५ मायक्रोमीटर किंवा त्यापेक्षा कमी व्यासाचे अतिसूक्ष्म कण असतात. श्वासावाटे ते फुफ्फुसांच्या आतल्या भागापर्यंत पोहोचू शकतात आणि त्यांच्यासोबत हानिकारक रसायनेही शरीरात जाऊ शकतात. त्यामुळे दीर्घकाळ जळजळ, पेशींवर ऑक्सिडेटिव्ह ताण आणि पेशींचे नुकसान अशा प्रक्रिया घडू शकतात. अनेक वर्षांत या प्रक्रियांमुळे कर्करोग वाढण्यास अनुकूल स्थिती तयार होऊ शकते.
जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अंतर्गत काम करणाऱ्या इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर (IARC) या संस्थेने २०१३ मध्ये बाहेरील वातावरणातील वायुप्रदूषण आणि त्यातील सूक्ष्म कण यांचा समावेश गट १ मधील कर्करोगकारक घटकांमध्ये (Group 1 carcinogens) केला. म्हणजे या घटकांमुळे माणसाला कर्करोग होऊ शकतो, याला पुरेसे वैज्ञानिक पुरावे आहेत. या प्रदूषणाशी सर्वात ठोसपणे जोडलेला कर्करोग म्हणजे फुफ्फुसांचा कर्करोग.
२०२१ मध्ये Environmental Health Perspectives या वैज्ञानिक नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या पद्धतशीर आढाव्यात आणि मेटा-विश्लेषणात सूक्ष्म कणांच्या दीर्घकालीन संपर्कावरील ४७ अभ्यासांचे विश्लेषण करण्यात आले. त्यानुसार PM2.5 च्या दीर्घकालीन संपर्कात प्रति घनमीटर हवेमागे १० मायक्रोग्रॅमने वाढ झाली, तर फुफ्फुसांच्या कर्करोगाचा धोका १६ टक्क्यांनी वाढल्याचे आढळले.
ही १६ टक्के वाढ सापेक्ष जोखमीतील आहे. म्हणजे एखाद्याला फुफ्फुसांचा कर्करोग होण्याची एकूण शक्यता १६ टक्के-बिंदूंनी वाढते, असे नाही. तसेच प्रदूषणाच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला कर्करोग होईलच असेही नाही. हा धोका प्रदूषणाची तीव्रता, किती काळ संपर्क राहिला, धूम्रपानाचा इतिहास, कामाच्या जागेवरील हानिकारक घटक आणि व्यक्तीची शारीरिक संवेदनशीलता अशा अनेक गोष्टींवर अवलंबून असतो. धूम्रपान हा प्रमुख जोखीम घटक असला, तरी धूम्रपान न करणाऱ्यांनाही या आजाराचा धोका असू शकतो.
वर्दळीच्या रस्त्यांजवळ, औद्योगिक भागात किंवा बांधकामांच्या परिसरात राहणाऱ्यांना प्रदूषणाचा संपर्क जास्त येऊ शकतो. वाहतूक नियंत्रणाचे काम करणारे कर्मचारी आणि घराबाहेर काम करणारे कामगार यांनाही धोका असू शकतो. घरातील तंबाखूचा धूर, स्वयंपाकासाठी घन इंधनाचा वापर आणि अपुरी हवा खेळती असणे यामुळेही प्रदूषणाचा एकूण भार वाढू शकतो.
संपर्क कमी करण्यासाठी काही उपाय करता येतात. आपल्या परिसरातील हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक (AQI) नियमित तपासावा. प्रदूषणाची पातळी गंभीर असताना बाहेर तीव्र व्यायाम टाळावा. तंबाखूच्या धुरापासून दूर राहावे. बाहेरची हवा अनुकूल असताना घरात योग्य हवा खेळती ठेवावी. गरज असेल तेव्हा व्यवस्थित बसणारा N95 मास्क वापरावा. मात्र हे वैयक्तिक उपाय व्यापक वायुप्रदूषणाचे सर्व धोके पूर्णपणे दूर करू शकत नाहीत.
'आपण कोणती हवा श्वासावाटे शरीरात घेतो, हे नेहमीच आपल्या नियंत्रणात नसते. मात्र, स्वच्छ हवा ही कर्करोगाच्या प्रतिबंधातील एक महत्त्वाची बाब आहे, हे आपण ओळखले पाहिजे,' असे डॉक्टरांनी स्पष्ट मत मांडले.
प्रत्येक रुग्णात फुफ्फुसांचा कर्करोग एकाच कारणाने होतो असे नाही, आणि प्रदूषणाच्या संपर्कात आल्याने कर्करोग होईलच असेही नाही. तरीही लोकसंख्येच्या पातळीवर दीर्घकालीन वायुप्रदूषणाचा संपर्क कमी केला, तर अनेक आजार टाळता येतील आणि कधीही धूम्रपान न केलेल्यांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यास मदत होऊ शकते.
त्यासाठी स्वच्छ वाहतूक व्यवस्था, कारखान्यांमधील उत्सर्जनावर कठोर नियंत्रण, बांधकामाच्या ठिकाणी धुळीचे व्यवस्थापन आणि हवेच्या गुणवत्तेचे सातत्याने निरीक्षण यांना सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने प्राधान्य देणे आवश्यक आहे. फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या बाबतीत प्रतिबंधाची सुरुवात लक्षणे दिसण्याच्या खूप आधीच होते, आणि त्यात स्वच्छ हवेची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.