सोमवार, 2 नोव्हेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

बुलढाण्यातील ३ लाख ३६ हजार ८२५ शेतकरी कुटुंबांच्या खात्यांत ६७ कोटी ३६ लाख जमा

बुलढाण्यातील ३ लाख ३६ हजार ८२५ शेतकरी कुटुंबांच्या खात्यांत ६७ कोटी ३६ लाख जमा छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
राजकारण PT24 टीम

पीएम किसानचा २४ वा हप्ता बुलढाणा जिल्ह्यातील पात्र शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यांत थेट जमा झाला. दिवाळीआधी दोन्ही योजनांमधून एकूण ७ हजार रुपयांचा आधार मिळणार असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी सांगितले.

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या २४ व्या हप्त्याचे वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. या अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील ३ लाख ३६ हजार ८२५ पात्र शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यांत ६७ कोटी ३६ लाख रुपयांचा निधी थेट जमा करण्यात आला.

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळत आहे, असे केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी सांगितले.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत बुलढाणा येथील कृषी विज्ञान केंद्रात या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण आयोजित करण्यात आले होते. तिथे डॉ. धनराज उंदीरवाडे, डॉ. प्रमोद वाकळे, संतोष डाबरे, डॉ. सतीश जाधव, अमोल झापे, ओमसिंग राजपूत, अनुजा सावळे आणि अॅड. गायकवाड यांच्यासह जिल्ह्यातील शेतकरी व महिला बचत गटांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

हवामान बदल आणि अल निनोच्या संभाव्य परिणामामुळे शेतीसमोर आव्हाने उभी राहू शकतात. ही आव्हाने पेलण्यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करावा, असे आवाहन कार्यक्रमात करण्यात आले.

कार्यक्रमात काही महिला बचत गट आणि प्रगतिशील शेतकऱ्यांना सन्मानपत्र देऊन प्रातिनिधिक स्वरूपात गौरवण्यात आले. कार्यक्रमाची प्रस्तावना कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ अमोल झापे यांनी केली. विस्तार शिक्षण संचालक डॉ. धनराज उंदीरवाडे आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे यांनी उपस्थितांना शेती क्षेत्रातील विविध योजनांची माहिती दिली.

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव म्हणाले की, दुष्काळसदृश परिस्थिती आणि पिकांचे झालेले नुकसान लक्षात घेऊन राज्य सरकारकडून ५ हजार रुपयांचा अग्रिम लाभ दिला जात आहे. त्यामुळे दोन्ही योजनांमधून पात्र शेतकऱ्यांना दिवाळीआधी एकूण ७ हजार रुपयांचा आर्थिक आधार मिळणार आहे, असेही जाधव यांनी सांगितले.

रब्बी हंगामाच्या नियोजनाबाबतही कार्यक्रमात सांगण्यात आले. पुढच्या काळात पाणीटंचाई होण्याची शक्यता लक्षात घेता उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन करणे गरजेचे आहे, असे सांगण्यात आले. पिण्याच्या पाण्याची गरज आणि जनावरांसाठी चाऱ्याची उपलब्धता लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाचे नियोजन करावे, तसेच हरभरा, ज्वारी आणि चारा पिकांच्या लागवडीला प्राधान्य द्यावे, असेही आवाहन यावेळी करण्यात आले.

#नागपूर#सियासत#PT24#Politics#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ