बुधवार, 21 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
00:49 IST

रात्रपाळी आणि कॅन्सर: IARC चा 'ग्रुप 2A' दर्जा, पण अभ्यासांचे निष्कर्ष एकसारखे नाहीत

दीर्घकाळ नाईट शिफ्टमध्ये काम करणाऱ्यांच्या कॅन्सरच्या धोक्याचा संबंध थेट नसला तरी अप्रत्यक्ष आहे, असे वैद्यकीय संशोधनानुसार सांगितले जाते. फोर्टिस मेमोरियल रिसर्च इन्स्टिट्यूटचे डॉ. वेदांत काबरा यांनी याबाबत माहिती दिली.

रात्रपाळी आणि कॅन्सर: IARC चा 'ग्रुप 2A' दर्जा, पण अभ्यासांचे निष्कर्ष एकसारखे नाहीत छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

वैद्यकीय संशोधनानुसार, अनेक वर्षे नाईट शिफ्टमध्ये (रात्रपाळी) काम करणाऱ्यांना कर्करोगाचा (कॅन्सर) धोका वाढण्याशी थेट संबंध नसला, तरी अप्रत्यक्ष संबंध नक्कीच आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अंतर्गत येणाऱ्या इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर (IARC) ने नाईट शिफ्टमधील कामाचा समावेश 'Group 2A' या श्रेणीत केला आहे. Probably Carcinogenic to humans, म्हणजे मानवासाठी कर्करोगजन्य असण्याची शक्यता, असा या श्रेणीचा अर्थ दिला आहे.

रुग्णालये, कॉल सेंटर आणि इतर अनेक क्षेत्रांत रात्रपाळी करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे. रात्री जागायचे आणि दिवसा झोपायचे, हे अनेकांच्या रोजच्या जगण्याचाच भाग झाला आहे. अशा वेळी अनेक वर्षे रात्रपाळी केल्याने तब्येतीवर परिणाम होतो का आणि त्यामुळे कॅन्सरचा धोका वाढू शकतो का, असे प्रश्न अनेकांना पडतात.

या विषयावर वैद्यकीय क्षेत्रात अनेक वर्षांपासून संशोधन सुरू आहे. रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्यांच्या झोपेवर, शरीरातील हार्मोन्सवर आणि नैसर्गिक जैविक चक्रावर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे काही आजारांचा धोका वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते. मात्र नाईट शिफ्ट आणि कॅन्सर यांच्यातील संबंधाबाबत सर्व संशोधनांचे निष्कर्ष एकसारखे नाहीत. फोर्टिस मेमोरियल रिसर्च इन्स्टिट्यूटच्या सर्जिकल ऑन्कोलॉजी विभागाचे प्रिन्सिपल डायरेक्टर डॉ. वेदांत काबरा यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

या माहितीनुसार, दीर्घकाळ रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करणे हे काही प्रकारच्या कॅन्सरच्या संभाव्य धोक्यांपैकी एक मानले जाते. पण याबाबत झालेल्या मोठ्या वैद्यकीय अभ्यासांमधून एकसारखे निष्कर्ष समोर आलेले नाहीत. दीर्घकाळ रात्रपाळी केल्याने कॅन्सरचा धोका वाढू शकतो, मात्र नाईट शिफ्ट केली म्हणजे कॅन्सर होतोच, असा निश्चित निष्कर्ष काढता येत नाही.

IARC ने रात्रीच्या शिफ्टमधील कामाला 'ग्रुप 2A' म्हणजे संभाव्य कर्करोगजन्य श्रेणीत ठेवले आहे. म्हणजेच यामुळे कॅन्सर होण्याचा धोका असू शकतो, असे यात मांडले आहे. यामागची कारणे म्हणून दोन गोष्टी सांगितल्या आहेत. पहिली म्हणजे रात्री जागून काम केल्याने आणि दिवसा झोपल्याने शरीराची नैसर्गिक जैविक घडी बिघडते. दुसरी म्हणजे मेलाटोनिन हार्मोनची कमतरता. रात्री अंधारात मेलाटोनिन नावाचा हार्मोन तयार होतो, जो शरीराचे कर्करोगापासून संरक्षण करण्यास मदत करतो. रात्री कृत्रिम प्रकाशात काम केल्यास या हार्मोनची निर्मिती कमी होते.

कोणत्या कॅन्सरचा धोका जास्त, याबद्दलही माहिती देण्यात आली आहे. दीर्घकाळ, म्हणजे उदाहरणार्थ २० वर्षे किंवा त्याहून जास्त काळ, किंवा नियमितपणे नाईट शिफ्ट करणाऱ्या महिलांमध्ये स्तनाचा कॅन्सर तसेच त्वचेचा आणि गॅस्ट्रोइंटेस्टाइनल (पचनसंस्थेसंबंधी) कॅन्सरचा धोका वाढल्याचे काही अभ्यासांमध्ये आढळले आहे.

कॅन्सरशिवायही रात्रीच्या शिफ्टमुळे अपुरी झोप आणि स्लीप डिसऑर्डर, मधुमेह, हृदयविकार आणि प्रतिकारशक्ती कमी होणे अशा आजारांचा धोका वाढू शकतो, असे या माहितीत नमूद आहे. त्यात रात्रीच्या शिफ्टनंतर किंवा रोज ७ ते ८ तास पुरेशी आणि गाढ झोप घेणे, सकस व पौष्टिक आहार घेणे आणि आरोग्याची नियमित तपासणी करणे, अशा गोष्टींचाही उल्लेख आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ