सिंदेवाहीत वाघाची दहशत, आठवडाभरात तिघांचा बळी; बंदोबस्त करण्याची गावकऱ्यांची मागणी
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात एका आठवड्यात वाघाच्या हल्ल्यांत तिघांचा मृत्यू झाला. वनविभागाच्या भूमिकेबद्दल गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात वाघाच्या हल्ल्यांनी गावकरी हादरून गेले आहेत. अवघ्या एका आठवड्यात वाघाने तीन जणांचा जीव घेतला असून, त्यामुळे शेतात जाणाऱ्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गेल्या काही दिवसांपासून या तालुक्यात माणूस आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे.
सिंदेवाही वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या नवरगाव उपवन क्षेत्रातील धुमणखेडा येथे शुक्रवारी रामाजी मेश्राम (७५, रा. धुमणखेडा) यांच्यावर वाघाने हल्ला केला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. आठवडाभरातली ही तिसरी घटना असून, या तालुक्यात निष्पाप नागरिकाचा बळी जाण्याची ही तिसरी वेळ असल्याने संपूर्ण परिसरात मोठी दहशत पसरली आहे. वनविभागाच्या भूमिकेबद्दल लोकांमध्ये तीव्र संताप आहे.
याआधीची पहिली घटना २४ ऑक्टोबरला सायंकाळच्या सुमारास घडली. पळसगाव (जाट) येथील नानाजी नारायण कामडी (५५) शेतात काम करत असताना दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने त्यांच्यावर भीषण हल्ला केला आणि त्यांना ठार केले. त्या घटनेला २४ तासही उलटले नव्हते, तोच २५ ऑक्टोबरला दुपारी भेंडाळा शेतशिवारात तीळ कापत असलेल्या अंगणवाडी सेविका प्रेमीला पुंडलिक महाडोरे (५६, रा. भेंडाळा) यांच्यावर वाघाने झडप घातली. त्यांचाही जागीच मृत्यू झाला.
म्हणजे या आठवडाभरात दोन पुरुष आणि एका महिलेला वाघाने आपले भक्ष्य केले. त्यामुळे शेतकरी, शेतमजूर आणि गावकऱ्यांमध्ये भीतीचे सावट आहे. सध्या शेतात धानकापणी आणि इतर मशागतीची कामे सुरू आहेत. शेतकऱ्यांना रोज शेतात जावे लागते, पण वारंवार होणाऱ्या जीवघेण्या हल्ल्यांमुळे तिथे जाणेच धोक्याचे झाले आहे. परिसरात वाघाचा वावर वाढल्याने लोकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
या नरभक्षक वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा, त्याला पकडण्यासाठी पिंजरा लावावा आणि मृतांच्या कुटुंबांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी जोरदार मागणी संतप्त गावकरी करत आहेत.
नवरगाव शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोडणे यांनीही याबाबत मागण्या मांडल्या आहेत. नवरगाव परिसरातील लोकांच्या जीविताचे रक्षण करण्यासाठी वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा, पिंजरे लावावेत, नियमित गस्त वाढवावी, आवश्यक ठिकाणी कॅमेरे लावावेत आणि वाघाला सुरक्षितपणे पकडण्यासाठी तातडीने विशेष पथक तैनात करावे, असे ते म्हणाले. ४८ तासांच्या आत वाघाचा बंदोबस्त करून नागरिकांना सुरक्षिततेची हमी द्यावी, अन्यथा नागरिकांना सोबत घेऊन वनविभागाच्या कार्यालयाला घेराव घालण्यात येईल, असाही इशारा त्यांनी दिला आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.