पुण्यात 'आदि अनंत'मधील 'दिगंबरा दिगंबरा' गाण्याचे अनावरण; अशोक सराफ यांची तबल्यावर साथ
पॅनोरमा स्टुडिओज प्रस्तुत 'आदि अनंत' या मराठी चित्रपटातील गाण्याचा संगीत अनावरण सोहळा पुण्यात रंगला; राहुल देशपांडे यांनी गाणे सादर केले.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
पॅनोरमा स्टुडिओज प्रस्तुत आगामी मराठी चित्रपट 'आदि अनंत'मधील 'दिगंबरा दिगंबरा' हे गाणे आता प्रेक्षकांसमोर आले आहे. या गाण्याच्या निमित्ताने पुण्यात चित्रपटाचा संगीत अनावरण सोहळा आयोजित करण्यात आला होता आणि तो उत्साहात पार पडला.
गायक राहुल देशपांडे यांनी हे गाणे सुरेल आवाजात सादर केले. त्यांच्या सादरीकरणाला पद्मश्री अशोक सराफ यांनी तबल्यावर साथ देत ठेका धरला. संगीत मैफलीबरोबरच कलाकारांशी मनमोकळ्या गप्पाही यावेळी रंगल्या. नागरिकांसाठी हा कार्यक्रम विनामूल्य ठेवण्यात आला होता आणि संगीतप्रेमींनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
सोहळ्याला पद्मश्री अशोक सराफ, छायाचित्रकार व दिग्दर्शक महेश लिमये, संकर्षण कऱ्हाडे, सखी गोखले, निर्माते मुरलीधर छतवानी, समीर हंपी, अनिकेत मराठे, रविंद्र औटी आदी मान्यवर उपस्थित होते.
'दिगंबरा दिगंबरा' या गाण्याला अविनाश-विश्वजीत यांनी संगीत दिले असून गीतलेखन गुरु ठाकूर यांनी केले आहे. राहुल देशपांडे यांच्या आवाजामुळे गाण्यात आर्तता आली आहे. महेश लिमये दिग्दर्शित 'आदि अनंत' हा चित्रपट नात्यांमधील प्रेम, जिव्हाळा आणि सहवासाचे महत्त्व सांगणारा आहे.
चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरमधून अशोक सराफ आणि संकर्षण कऱ्हाडे यांच्यातील जिव्हाळ्याचे नाते समोर आले होते. या दोघांबरोबरच सखी गोखले, वैदेही परशुरामी, योगेश शिरसाट, कविता लाड, आरव अहीर, श्रीरंग गोडबोले आणि गुरु ठाकूर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांत दिसणार आहेत. कथेतून उलगडणाऱ्या नात्यांच्या भावविश्वाला संगीताची साथ लाभली आहे.
संगीतकार अविनाश-विश्वजीत म्हणतात, 'आदि अनंत'च्या संगीतावर काम करताना चित्रपटातील नात्यांमधल्या वेगवेगळ्या भावना सुरांतून मांडण्याचा प्रयत्न केला. 'दिगंबरा दिगंबरा' या गाण्यातूनही संगीत आणि शब्द यांचा सुंदर मेळ साधता आला.
दिग्दर्शक महेश लिमये म्हणतात, हा चित्रपट माझ्या खूप जवळचा आहे. 'आदि अनंत'मधील नाती आपल्या रोजच्या आयुष्याचा भाग आहेत. कधी एखादा संवाद, कधी एखादी छोटी कृती, तर कधी फक्त सोबत असणेही नात्याची खोली सांगून जाते. हीच सहजता आणि आपलेपणा चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपटातील संगीतही या भावविश्वाचा महत्त्वाचा भाग आहे. संगीत अनावरण सोहळ्यात चित्रपटाचा विचार उपस्थितांपर्यंत पोहोचवता आला, याचा आनंद आहे.
पॅनोरमा स्टुडिओज प्रस्तुत 'आदि अनंत'ची निर्मिती कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, मुरलीधर छतवानी, समीर हंपी, महेश लिमये आणि अनिकेत मराठे यांनी केली आहे. रविंद्र औटी आणि दर्शन शाह सहनिर्माते आहेत. चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद संकर्षण कऱ्हाडे यांचे आहेत, तर छायाचित्रण आणि दिग्दर्शनाची जबाबदारी महेश लिमये यांनी सांभाळली आहे.
हा चित्रपट येत्या 12 नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'दिगंबरा दिगंबरा' हे गाणे पॅनोरमा म्युझिकवर उपलब्ध आहे.