आदिनाथ कोठारे दोन मोठ्या हिंदी चित्रपटांत, 'रामायण' आणि 'नयी नवेली'मध्ये भूमिका
राष्ट्रीय पुरस्कार विजेता आदिनाथ कोठारे नितेश तिवारी आणि बालाजी मोहन यांच्या चित्रपटांतून बॉलिवूडमध्ये दिसणार आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता आदिनाथ कोठारे आता बॉलिवूडमध्ये मोठी झेप घेण्याच्या तयारीत आहे. मराठी मनोरंजनविश्वात आपल्या अभिनयाची छाप उमटवल्यानंतर तो आता दोन मोठ्या हिंदी चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
विशेष म्हणजे, हे दोन्ही चित्रपट वेगवेगळ्या शैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या दिग्दर्शकांनी केले आहेत. त्यामुळे आदिनाथचा पुढचा बॉलिवूड प्रवास कसा असेल, याकडे चित्रपटप्रेमींचे लक्ष लागले आहे.
नितेश तिवारी दिग्दर्शित बहुप्रतीक्षित 'रामायण' या भव्य चित्रपटात आदिनाथ दिसणार आहे. 'दंगल'सारखा गाजलेला चित्रपट देणाऱ्या नितेश तिवारी यांच्या दिग्दर्शनाखाली काम करण्याची संधी त्याला मिळाली आहे. हा चित्रपट ५ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
याशिवाय बालाजी मोहन दिग्दर्शित 'नयी नवेली' या चित्रपटातही आदिनाथ महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. हा चित्रपट वेगळ्या संकल्पनेवर आधारित आहे आणि त्यातून तो प्रेक्षकांसमोर एका नव्या अंदाजात येणार आहे. हा चित्रपट १६ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
नितेश तिवारी आणि बालाजी मोहन या दोघांचीही काम करण्याची शैली वेगळी आहे. त्यामुळे या दोन चित्रपटांमधला अनुभव आदिनाथसाठी खास ठरला आहे. याबद्दल बोलताना त्याने दोन्ही दिग्दर्शकांच्या कामाच्या पद्धतीचे कौतुक केले.
"बालाजी मोहन आणि नितेश तिवारी या दोन दिग्गज दिग्दर्शकांबरोबर काम करणं हा माझ्यासाठी एका मोठ्या मास्टरक्लाससारखा अनुभव होता. बालाजी सर फँटसी, कॉमेडी, अॅक्शन आणि मोठ्या कलाकारांच्या फळीला अत्यंत शांतपणे आणि सहजतेने एका सूत्रात बांधतात. सेटवरचा त्यांचा संयम थक्क करणारा असतो.
तर दुसरीकडे, नितेश सरांचं व्हिजन अथांग आणि भव्य आहे. महाकाय कॅनव्हासवर काम करतानाही ते भावनिक बारकावे आणि अचूक नियोजन कधीही सुटू देत नाहीत. एवढ्या मोठ्या स्केलचा चित्रपट साकारताना स्वतःची दृष्टी पूर्णपणे स्पष्ट ठेवणं आणि कलाकाराला विश्वास देणं, ही या दोन्ही दिग्दर्शकांची सर्वात मोठी ताकद आहे," असं आदिनाथ कोठारेने सांगितलं.
राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलेल्या आदिनाथ कोठारेने मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता 'रामायण' आणि 'नयी नवेली'सारख्या मोठ्या हिंदी चित्रपटांमधल्या त्याच्या भूमिका त्याच्या कारकिर्दीतला महत्त्वाचा टप्पा ठरू शकतात.
दोन वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांमुळे आदिनाथच्या अभिनयातली विविधता पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. त्यामुळे या दोन्ही चित्रपटांच्या प्रदर्शनाकडे त्याच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे.