पीएम किसानचा 24 वा हप्ता 30 ऑक्टोबरला, दिवाळीआधी शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपये
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 24 व्या हप्त्याची तारीख अखेर ठरली आहे. राज्यातील आणि देशातील लाखो शेतकरी या हप्त्याची मोठ्या आतुरतेने वाट बघत होते. आता 30 ऑक्टोबर 2026 रोजी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट प्रत्येकी 2,000 रुपये जमा केले जाणार आहेत.
दिवाळीच्या आधीच ही रक्कम हातात येणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. सरकारकडून मिळालेले एक मोठे गिफ्ट म्हणून याकडे पाहिले जात आहे.
हप्ता कधी मिळणार, ही माहिती योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जाहीर करण्यात आली आहे. कृषी मंत्रालयानेही त्यावर अधिकृत शिक्कामोर्तब केले आहे. पीएम किसानच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर टाकलेल्या पोस्टमध्ये स्पष्ट म्हटले आहे की, सर्व शेतकऱ्यांनी तारीख लक्षात ठेवावी, कारण 30 ऑक्टोबर 2026 रोजी पीएम-किसानचा 24 वा हप्ता दिला जाईल. त्यामुळे देशातील अन्नदात्यांना सतत आर्थिक मदत मिळेल आणि ते अधिक सक्षम होतील. त्या दिवशी सर्व पात्र शेतकऱ्यांना आपल्या खात्यात थेट 2,000 रुपये जमा झालेले दिसतील.
सणाच्या तोंडावर मिळणारी ही रक्कम शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची आहे. पण ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी (e-KYC) पूर्ण झालेली नाही, त्यांचे पैसे अडकण्याची शक्यता आहे. म्हणूनच तुम्ही पात्र शेतकरी असाल आणि येणारा हप्ता खात्यात जमा होणार की नाही हे जाणून घ्यायचे असेल, तर आपले ताजे स्टेटस नक्की तपासा.
त्यासाठी पीएम किसान योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर, म्हणजे pmkisan.gov.in वर, जावे लागेल. तिथल्या 'फार्मर सेक्शन'मध्ये जाऊन नोंदणी क्रमांक टाकायचा आहे. मग नोंदणीकृत मोबाइल नंबरवर आलेला ओटीपी (OTP) टाकला की पुढच्या नव्या पानावर हप्त्याची सविस्तर माहिती आणि ई-केवायसीचे स्टेटस सहज दिसेल. ई-केवायसी झाली नसेल, तर ती सोप्या पद्धतीने पूर्ण करता येते.
मोबाईल ॲपवरून ई-केवायसी करायची असेल, तर आधी गूगल प्ले स्टोअरवरून अधिकृत 'PM-KISAN' मोबाईल ॲप आणि 'Aadhaar Face RD' ॲप डाउनलोड करावे. ॲप उघडून पीएम-किसान योजनेत नोंदवलेल्या मोबाईल नंबरने लॉग-इन करावे. नंतर लाभार्थी स्थिती (Beneficiary Status) दाखवणाऱ्या पानावर जावे. ई-केवायसी स्टेटसमध्ये 'नाही' (No) असे दिसले, तर 'eKYC' या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर आधार तपशील टाकून चेहऱ्याच्या स्कॅनिंगसाठी संमती द्यावी.
30 ऑक्टोबरला हप्ता दिला जाणार असल्याचे जाहीर झाले असले, तरी नोंदणी केलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला पैसे मिळतीलच असे नाही. योजनेच्या पात्रतेच्या अटी पूर्ण असणे आणि आवश्यक पडताळणी झालेली असणे गरजेचे आहे. काही लाभार्थ्यांच्या नोंदींची पडताळणी बाकी असेल, तर त्यांचे पैसे तात्पुरते थांबवले जाऊ शकतात. म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत न थांबता शेतकऱ्यांनी अधिकृत संकेतस्थळावर आताच आपली स्थिती तपासावी. ई-केवायसी अपूर्ण असेल तर ती पूर्ण करावी आणि बँक खात्याचे तपशीलही बरोबर असल्याची खात्री करून घ्यावी.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.