शिवाजी पार्क परिसरात पोलिसांचा बंदोबस्त, आंदोलकांची धरपकड; संदीप देशपांडेंचा गंभीर आरोप
ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून दिल्लीतील आंदोलनाचे पडसाद मुंबईत उमटले असून दादरच्या शिवाजी पार्क परिसरात पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टी (CJP) आणि काही विद्यार्थी संघटनांनी दिल्लीत जोरदार आंदोलन सुरू केले आहे. त्याचे पडसाद कालपासूनच मुंबईतही दिसत आहेत. दिल्ली आणि मुंबईत पोलिसांकडून आंदोलकांना ताब्यात घेण्याची कारवाई सुरू असून, त्यामुळे आंदोलकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
काल CJP चे अनेक पदाधिकारी, राजकीय नेते आणि इतर आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. आजही तसाच प्रकार सुरू असल्याचे दिसते. यावरून राजकीय आणि सामाजिक वर्तुळात संताप व्यक्त होत आहे आणि चर्चेला उधाण आले आहे.
दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरात आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. परिसराकडे जाणाऱ्या मार्गांवर बॅरिकेडिंग करण्यात आले आहे. अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचाही समावेश आहे. आंदोलनस्थळी पोहोचण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना ताब्यात घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी आणि CJP समर्थकांवरील कारवाईच्या निषेधार्थ मुंबईत आंदोलनाची हाक देण्यात आली होती. त्यामुळे शिवाजी पार्क परिसरात पोलिसांनी सुरक्षाव्यवस्था वाढवली. महत्त्वाच्या मार्गांवर बॅरिकेडिंग असून परिसरात येणाऱ्या नागरिकांची चौकशी केली जात असल्याचे वृत्त आहे.
काही नागरिकांनी आपण आंदोलक नाही, कामावरून घरी जात होतो किंवा परिसरात फिरायला आलो होतो, असे सांगितले. तरीही पोलिसांनी आपल्याला ताब्यात घेतले, असा दावा काही तरुणांनी केला आहे.
या कारवाईवरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या दाव्यानुसार, शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने स्थानिकांची बैठक घेतली होती. या बैठकीत आंदोलकांना अडवण्यास आणि त्यांना विरोध करण्यास सांगण्यात आले, असा आरोप देशपांडे यांनी केला.
आंदोलकांच्या अंगावर जाण्यास सांगून त्याबदल्यात संरक्षण देण्याचे आश्वासन देण्यात आले, असाही दावा त्यांनी केला. या आरोपांचे पुरावे आपल्याकडे असल्याचे देशपांडे यांनी म्हटले आहे. मुंबईत संघर्ष घडवून आणण्याचा प्रयत्न होता का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
CJP ने दिल्लीत केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्यासह काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त आधी समोर आले होते. त्यानंतर मुंबईतही आंदोलनाची घोषणा करण्यात आली.
शिवाजी पार्क परिसरातील बंदोबस्त, आंदोलकांना ताब्यात घेण्याची कारवाई आणि संदीप देशपांडे यांनी केलेले आरोप यामुळे या प्रकरणाला राजकीय वळण मिळाले आहे. पोलिसांनी ही कारवाई नेमक्या कोणत्या कारणांमुळे केली आणि देशपांडे यांच्या आरोपांबाबत प्रशासन काय भूमिका घेते, याकडे आता लक्ष लागले आहे.