मुख्यमंत्री फडणवीस यांचा लोहारी सावंगात शेतकरी रामभाऊ बालपांडे यांच्या घरी मुक्काम
दुष्काळी परिस्थितीत शक्य तिथे विंधन विहिरींना परवानगी देऊ, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. दिवाळीनिमित्त ते नागपूर जिल्ह्यातील लोहारी सावंगा येथे शेतकऱ्याच्या घरी राहिले.
नागपूर जिल्ह्यातील लोहारी सावंगा या गावात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्याच्या घरी मुक्काम करून दिवाळी साजरी केली. गावातील शेतकरी रामभाऊ बालपांडे यांच्या घरी ते राहिले. शेतकऱ्यांपुढे कोणते संकट आहे आणि त्यावर मात कशी करता येईल, याबद्दल त्यांनी बालपांडे यांच्याशी संवाद साधला.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शक्य आहे तिथे विंधन विहिरी घेण्यास परवानगी दिली जाईल, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली. चिंताग्रस्त शेतकऱ्यांना धीर देताना ते बोलत होते. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी आपण उभे आहोत, अशा परिस्थितीत त्यांना भेटण्यासाठीच गावात आलो आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. शेतात कोणती पिके घेतली जातात आणि दुष्काळामुळे किती नुकसान झाले, यावरही त्यांनी चर्चा केली.
हवामान बदलामुळे काही जिल्ह्यांत अतिवृष्टी झाली, त्यानंतर पाऊसच पडला नाही आणि अजूनही पाऊस नसल्याने शेतातील पिकांची हानी झाली आहे, असे त्यांनी सांगितले. या दोन्ही प्रसंगांत शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना मदत दिली जात आहे, असेही ते म्हणाले.
काटोल आणि नरखेड परिसरात संत्र्यासह मोसंबीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. मात्र बांगलादेशाने निर्बंध घातल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागत आहे. यासाठी मिहान येथे मोठा प्रकल्प सुरू होत असून, या फळांवर प्रक्रिया करण्याची संधी शेतकऱ्यांना मिळणार आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. शेतकरी अडचणीत येणार नाही, याची खबरदारी घेतली जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.
रब्बीचे पीक वाचवण्यासाठी काय करता येईल, यावरही शेतकऱ्यांसोबत चर्चा झाली. शेताच्या संरक्षणासाठी कुंपण घालण्याची योजना राबवली जात असून, शेतकऱ्यांनी तिचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
मुख्यमंत्र्यांनी बालपांडे कुटुंबाची माहिती घेतली. शेतातील नुकसान झाल्यामुळे निश्चित मदत देण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
रामभाऊ बालपांडे यांनी आपली भावना व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी होऊन दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री आमच्या घरी आले, मुक्काम केला आणि आमच्या घरच्या चटणी भाकरीचा आस्वादही घेतला, याचा आम्हाला अभिमान वाटला, असे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या धीरामुळे संकटावर मात करण्याची हिंमत मिळाली, असेही बालपांडे यांनी सांगितले.


कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.