दीपोत्सव विशेष सर्व वाचकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

रविवार, 8 नोव्हेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

रडणाऱ्या महिलेला मदत करताना कोतोली फाट्याजवळ तरुणाचा भरधाव टेम्पोच्या धडकेत मृत्यू

रडणाऱ्या महिलेला मदत करताना कोतोली फाट्याजवळ तरुणाचा भरधाव टेम्पोच्या धडकेत मृत्यू छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
क्राइम PT24 टीम

कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर आसुर्ले येथील रमेश थोरात यांचा टेम्पोच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. पळून गेलेल्या चालकाला महामार्ग पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील कोतोली फाट्याजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या राहून ओक्साबोक्सी रडणाऱ्या एका महिलेला धीर देण्यासाठी थांबलेल्या तरुणाचा भरधाव टेम्पोच्या धडकेत मृत्यू झाला. रमेश भीमराव थोरात (वय ४१, रा. आसुर्ले, ता. पन्हाळा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. दुसऱ्याच्या दुःखात धावून जाण्याची माणुसकी दाखवणेच त्यांच्या जिवावर बेतले, अशी हळहळ सगळीकडे व्यक्त होत आहे.

नेर्ली-तामगाव येथील एक कुटुंब शनिवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास चारचाकी गाडीने गणपतीपुळ्याला निघाले होते. कोतोली फाट्याजवळ आल्यावर गाडीतील एका मुलाची तब्येत अचानक बिघडली. त्यामुळे त्यांनी गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली आणि मुलाला उपचारासाठी कर्ले येथील दवाखान्यात नेले. त्या वेळी गाडीत एक महिला रडत होती.

त्याच वेळी रमेश थोरात नेहमीप्रमाणे पहाटे फिरायला गेले होते. ते त्या ठिकाणी आले, तेव्हा गाडीत एक महिला रडत असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी लगेच तिची विचारपूस केली. रस्त्यावर अपघात होऊ नये म्हणून ती चारचाकी रस्त्याच्या अगदी कडेला घेण्यासाठी त्यांनी मदतही केली.

मात्र, थोरात चारचाकीतून खाली उतरत असतानाच कोल्हापूरहून पन्हाळ्याच्या दिशेने भरधाव वेगाने निघालेल्या एका टेम्पोने त्यांना जोरदार धडक दिली. ही घटना कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर कोतोली फाट्याजवळच घडली. ही धडक इतकी भीषण होती की ते सुमारे ५० फूट लांब उडून रस्त्यावर आदळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघातानंतर टेम्पोचालक निखिल बंडू तराळ (रा. मौजे वडगाव) घटनास्थळावरून पळून गेला. मात्र वाघबीळ घाटातील नलवडे बंगल्याजवळ त्याचा टेम्पो अनियंत्रित होऊन उलटला. याची माहिती मिळताच महामार्ग पोलीस तातडीने धावले आणि पळून जाणाऱ्या चालकाला त्यांनी ताब्यात घेतले. या प्रकरणी करवीर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

रमेश थोरात यांच्या पश्चात पत्नी, आई, बहीण आणि तीन मुले असा परिवार आहे. ते कुटुंबातील एकमेव कमावते पुरुष होते. घरातला एकमेव कर्ता पुरुष अचानक गेल्याने त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. थोरात हे आसुर्ले, ता. पन्हाळा येथील रहिवासी होते. मदतीसाठी धावलेल्या निष्पाप माणसाच्या मृत्यूमुळे आसुर्ले परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

#नागपूर#जुर्म#PT24#Crime#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ