दीपोत्सव विशेष सर्व वाचकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

रविवार, 8 नोव्हेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

लोहारी सावंगात महिलांची मागणी: शेतमालाला भाव द्या, वन्य प्राण्यांपासून पीक वाचवा

लोहारी सावंगात महिलांची मागणी: शेतमालाला भाव द्या, वन्य प्राण्यांपासून पीक वाचवा छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
राजकारण PT24 टीम

दिवाळीच्या दिवशी लोहारी सावंगा गावात आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे महिलांनी हमीभावाची मागणी केली. फडणवीस यांनी जलजीवन मिशन, तार कुंपण आणि बोअरवेलबाबत घोषणा केल्या.

शेतमालाला योग्य भाव मिळाला आणि शेतीतल्या उत्पादनाला वन्य प्राण्यांपासून संरक्षण मिळालं, तर आम्हाला लाडकी बहीण योजनाही नको आणि दुष्काळासाठीची अग्रीम मदतही नको, आम्ही स्वतः सक्षम होऊन जाऊ, असं लोहारी सावंगा (Lohari Sawanga) गावातल्या महिलांनी सांगितलं. दिवाळीच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गावात आले होते, तेव्हा महिलांनी त्यांच्यासमोर ही मागणी मांडली.

दिवाळीच्या दिवशी लोहारी सावंगा गावाने मुख्यमंत्र्यांचा पाहुणचार केला. गावकऱ्यांच्या प्रेमाला प्रतिसाद देत मुख्यमंत्र्यांनी गावातली अनेक रखडलेली शासकीय विकासकामं गतिमान करण्याचं आश्वासन दिलं.

मुख्यमंत्री गावात असतानाच प्रशासनाकडून गावातल्या दहा शेतकऱ्यांना सिंचन विहिरी मंजूर करण्यात आल्या. गावातल्या साठवण तलावासाठी 2 कोटी 43 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, हे काम लवकरच सुरू करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री आपल्या गावात आल्याचा खूप आनंद झाला, अशी भावना गावातल्या महिला शेतकऱ्यांनी व्यक्त केली. सरकारने फक्त शेतकऱ्यांना सक्षम करावं आणि त्यासाठी हमीभाव द्यावा, तसं झालं तर इतर कुठल्याही मोफत लाभाच्या योजनांची आम्हाला गरज उरणार नाही, अशी प्रतिक्रिया महिलांनी दिली.

जलजीवन मिशनच्या अनेक कामांसाठी पैसे आलेले नाहीत, असं फडणवीस यांनी सांगितलं. मात्र मंजूर झालेल्या कामांपैकी जिथे 75 टक्क्यांपेक्षा जास्त काम झालं आहे, त्या कामांना तातडीने प्राधान्य देऊन त्या भागांना लगेच पाणी उपलब्ध करून देण्याचं ठरवलं आहे, असं ते म्हणाले. पुढच्या म्हणजे दुसऱ्या टप्प्यात 50 टक्क्यांपेक्षा जास्त काम झालेली जलजीवन मिशनची कामं हाती घेऊ, असंही त्यांनी सांगितलं.

शेतांना तार कुंपण लावून जंगली प्राण्यांपासून पिकं वाचवणं आवश्यक आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. अनेक शेतकऱ्यांनी ही समस्या सांगितली असून, त्याबद्दल आपण ठोस काम करू, असं त्यांनी सांगितलं. राज्यातल्या ज्या गावांमध्ये तलावांत किंवा इतर पाणीस्रोतांत पाणी कमी झालं आहे, तिथे खोलीकरण करून गाळ काढायला सुरुवात केली पाहिजे, असं ते म्हणाले. त्यासाठी खोलीकरणाचे आणि वाहतुकीचे पैसे सरकार देत आहे, असंही त्यांनी सांगितलं. दुष्काळाच्या काळात जी ग्रामपंचायत पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना मदत करेल, त्या ग्रामपंचायतींना आम्ही मदत करू, असा शब्द फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिला.

यावेळी एका वृद्ध शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांशी बोलताना नरखेड आणि काटोल तालुक्यातल्या शेतीला वन्य प्राण्यांचा, खास करून रोही आणि डुकरांचा, प्रचंड त्रास असल्याचं सांगितलं. हे दोन्ही प्राणी मोठ्या संख्येने पिल्लांना जन्म देतात आणि विष दिलं तरी ते मरत नाहीत, असं या शेतकऱ्याने म्हटलं. त्यांना मारून टाका, अशी थेट मागणी त्यांनी केली.

गावातल्या महिला सरपंच म्हणाल्या की, आमच्या गावात दोन वेगवेगळ्या पक्षांचे नेते आहेत. ते दोघंही वेगवेगळी कामं सांगतात आणि त्यामुळे कोणतंच काम नीट होत नाही. या दोन्ही नेत्यांना आवरा, अशी मागणी त्यांनी केली. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, दोन्ही नेत्यांमध्ये आम्ही एक पूल बांधून देऊ.

राज्यात पाणीटंचाई असल्यामुळे बोअरवेल खोदण्यावर घातलेली बंदी फक्त शेतीतल्या बोअरसाठी 15 डिसेंबरपर्यंत उठवत आहोत, अशी महत्त्वाची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

#नागपूर#सियासत#PT24#Politics#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ