पॅरिसमधल्या नोकरीच्या ऑफर सोडून बंगळुरूच्या पृथ्वीराज यांची मशरूम शेती, महिन्याला 4 लाख कमाई
फ्रान्समध्ये शिक्षण घेतल्यानंतर मोठ्या पॅकेजच्या ऑफर्स नाकारून पृथ्वीराज भारतात परतले आणि मशरूम शेतीतून आज महिन्याला 4 लाख रुपये कमावत आहेत.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
बंगळुरूचे मूळ रहिवासी असलेले पृथ्वीराज शिक्षणासाठी पॅरिसमध्ये गेले होते. तिथे त्यांना नोकरीच्या मोठ्या ऑफर्स आल्या, पण त्यांनी त्या स्वीकारल्या नाहीत. शिक्षण पूर्ण झाल्यावर ते भारतात परतले आणि स्वतःचा व्यवसाय सुरू केला. आज त्यांना या व्यवसायातून महिन्याला 4 लाख रुपयांची कमाई होते.
पृथ्वीराज यांनी फ्रान्समधल्या SKEMA बिझनेस स्कूलमधून इंटरनॅशनल बिझनेसमध्ये मास्टर्स डिग्री पूर्ण केली. डिग्री हातात आल्यावर त्यांच्याकडे मोठ्या पॅकेजच्या अनेक जॉब ऑफर्स आल्या. परदेशातली इतकी मोठी संधी सोडून भारतात यायचा निर्णय सोपा नव्हता, तरीही त्यांनी तो घेतला.
भारतात आल्यावर त्यांनी कुटुंबाच्या पोल्ट्री शेडचं रूपांतर मशरूमच्या शेतीत केलं. बंगळुरूजवळच्या देवनहल्लीतल्या त्यांच्या गावात पूर्वी त्यांची स्वतःची पोल्ट्री होती. काही कारणांमुळे आणि वाईट काळामुळे हा व्यवसाय 2019 मध्ये बंद पडला होता. आता त्यांनी पुन्हा उभारी घ्यायचं ठरवलं आणि मशरूम शेतीचा विचार केला.
सुरुवात त्यांनी अगदी लहान पातळीवर केली. व्यवसाय म्हणून थेट मोठी गुंतवणूक आणि मोठा प्लॅन करण्याऐवजी त्यांनी 10 पिशव्यांपासून सुरुवात केली. या शेतीसाठी त्यांनी बटन मशरूमऐवजी ऑयस्टर मशरूम निवडले. या मशरूमचं उत्पादन घेणं फार सोपं असतं आणि त्याची प्रक्रियाही बरीच सहज असते, ही त्याची खासियत आहे.
फॅन्सीपणा न आणता आणि मोठं भांडवल न गुंतवता त्यांनी सहज आणि सोपा पर्याय निवडला. जानेवारी 2025 मध्ये 180 रुपयांचं 2 किलो स्पॉन आणि फुकट मिळणारं धान्य घेऊन फक्त 10 बॅगपासून त्यांनी सुरुवात केली. हा एक प्रायोगिक प्रोजेक्ट होता. तयार झालेले मशरूम त्यांनी मित्र आणि नातेवाईकांना वाटले, त्यांच्याकडून प्रतिक्रिया घेतल्या आणि त्यानुसार बदल केले. त्रुटी लक्षात घेऊन सुधारणा केल्यानंतर 6 मार्च 2025 पासून त्यांनी कमर्शियल उत्पादन सुरू केलं.
25 बॅगपासून सुरू झालेला हा व्यवसाय आता 4000 बॅगच्या सेटअपपर्यंत पोहोचला आहे. यात वेगवेगळे टप्पे आहेत. प्रत्येक टप्प्याकडे विशेष लक्ष देत, चुकांतून शिकत त्यांनी सुधारणा केल्या. आता ते दर दिवशी 45 किलो उत्पादन घेतात, म्हणजे महिन्याला 1350 किलो मशरूमचं उत्पादन होतं. 320 किलो दराने प्रति महिना 4 लाख रुपयांची कमाई होते.
त्यांच्या उत्पादनाला मागणीही तितकीच वाढली आहे. स्थानिक बाजार, सुपरमार्केट आणि झेप्टोसारख्या क्विक डिलिव्हरी कंपन्यांकडून मोठी मागणी येते.
पृथ्वीराज फक्त मशरूम शेतीपुरते थांबले नाहीत. या उद्योगातून निर्माण होणाऱ्या अवशेषांचा त्यांनी चांगला वापर केला आणि त्यातून वर्मीकंपोस्टिंगची सुरुवात केली. इतकंच नाही, तर ही कला इतरांना शिकवायला आणि प्रशिक्षण द्यायलाही त्यांनी सुरुवात केली. फ्रान्समधल्या गडगंज पगाराच्या विळख्यात न अडकता भारतात परतून त्यांनी स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं.