पेंटागॉनचे लेफ्टनंट जनरल ब्रेट सिल्व्हिया पदावरून बडतर्फ, गुप्त माहिती पत्रकारांना दिल्याचा आरोप
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
पॉलीग्राफ चाचण्यांत अपयशी ठरल्याचे पेंटागॉनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले असून प्रकरण न्याय विभागाकडे सोपवण्यात आले आहे.
अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयात, म्हणजे पेंटागॉनमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. अमेरिकन लष्कराचे लेफ्टनंट जनरल ब्रेट सिल्व्हिया (Lt. Gen. Brett Sylvia) यांना पदावरून तडकाफडकी काढण्यात आले आहे. ते जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफचे धोरण प्रमुख होते. इरान संघर्ष, रशिया-युक्रेन युद्ध आणि पेंटागॉनच्या अत्यंत गुप्त लष्करी मोहिमांची माहिती पत्रकारांना दिल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
पेंटागॉनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, सुरक्षा यंत्रणांच्या सखोल तपासात आणि लागोपाठ तीन ते चार पॉलीग्राफ चाचण्यांमध्ये (लाय डिटेक्टर टेस्ट) सिल्व्हिया पूर्णपणे अपयशी ठरले. राष्ट्रीय सुरक्षेला मोठा धोका निर्माण करणाऱ्या या प्रकारामुळे अमेरिकेच्या लष्करी आणि राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ आहे.
संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी सिल्व्हिया यांना जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफमधील रणनीती, नियोजन आणि धोरण प्रमुख (J5) या पदावरून काढले. हे पद थेट राष्ट्राध्यक्षांना आणि जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफच्या अध्यक्षांना लष्करी धोरणांबाबत सल्ला देते. पेंटागॉनचे प्रवक्ते शॉन पार्नेल यांनी सोशल मीडियावर सांगितले की, देशाची अत्यंत संवेदनशील आणि गोपनीय माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी ही कठोर कारवाई करण्यात आली आहे.
सिल्व्हिया यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची शिफारस करण्यात आली असून प्रकरण न्याय विभागाकडे (Department of Justice) देण्यात आले आहे. एका उच्चपदस्थ लष्करी अधिकाऱ्यावर नेहमीप्रमाणे लष्करी न्यायालयात (Court-Martial) न चालवता दिवाणी न्यायालयात (Civil Court) खटला का चालवला जात आहे, याचे पूर्ण स्पष्टीकरण पेंटागॉनने अजून दिलेले नाही. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, सिल्व्हिया यांना खूप मोठ्या कायदेशीर अडचणींना सामोरे जावे लागेल आणि प्रशासन गुप्त माहिती लीक करणाऱ्या सर्वांवर कठोर कारवाई करत आहे.
तपासातून मिळालेल्या माहितीनुसार, सिल्व्हिया यांनी पेंटागॉनच्या जनसंपर्क विभागाला काहीही न कळवता दोन वेगवेगळ्या वृत्तसंस्थांच्या पत्रकारांशी गुप्तपणे संपर्क ठेवला होता. एका पुस्तकाच्या लेखनासाठी आणि गोपनीय बातम्यांसाठी त्यांनी या पत्रकारांना माहिती दिल्याचा संशय आहे. त्यासाठी त्यांनी सिग्नल (Signal) या एन्क्रिप्टेड मेसेजिंग ॲपचा वापर केला आणि वॉशिंग्टनजवळील एका हॉटेलात प्रत्यक्ष भेटीही घेतल्या होत्या.
तपास अधिकाऱ्यांनी मेसेजबद्दल विचारले, तेव्हा त्यांनी काही महत्त्वाचे मेसेज थ्रेड्स हटवल्याचे दिसून आले. ते चुकून डिलीट झाले, असा दावा सिल्व्हिया यांनी केला. पण पॉलीग्राफ चाचण्यांत त्यांच्या उत्तरांमध्ये मोठी विसंगती आढळली. तपास अहवालात असेही नमूद आहे की, तपासाचा फास आवळल्यावर सिल्व्हिया यांनी कॅमेऱ्यासमोर स्वतःहून चुकीची माहिती शेअर केल्याची कबुली दिली.
सिल्व्हिया हे लष्करातील आदरणीय नाव मानले जात होते. मे २०२५ पर्यंत ते केंटकीतील फोर्ट कॅम्पबेल येथे १०१ व्या एअरबोर्न डिव्हिजनचे कमांडर होते. ३२ वर्षांच्या सेवेत त्यांना युद्धभूमीतील शौर्याबद्दल ६ ब्राँझ स्टार मेडल आणि युद्धात जखमी झाल्याबद्दल पर्पल हार्ट पुरस्कार मिळाला होता. सुरुवातीला संयुक्त कर्मचाऱ्यांनी (Joint Staff) त्यांच्या ३२ वर्षांच्या सेवेबद्दल आभार मानणारे पत्र जारी केले होते. मात्र गुरुवारी तपास अहवालातील खुलासे समोर आल्यानंतर ते निवेदन मागे घेण्यात आले. पेंटागॉनने आपल्या अधिकृत वेबसाईटवरून त्यांचे चरित्र आणि फोटोही तातडीने काढून टाकले.
हेगसेथ यांच्या कार्यकाळात गोपनीय माहिती लीक झाल्यावरून अधिकाऱ्यांवर झालेली ही पहिलीच कारवाई नाही. यापूर्वी तीन अधिकाऱ्यांना पॉलीग्राफ चाचणीत संशय आल्यानंतर नोकरीवरून काढण्यात आले होते. आता पेंटागॉनने पत्रकारांवर कडक निर्बंध घातले आहेत. पेंटागॉनच्या आवारात पत्रकारांसोबत नेहमी लष्करी अधिकारी असणे बंधनकारक आहे. तसेच प्रेस ऑफिसचा काही भाग गोपनीय क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला असून तेथे पत्रकारांना प्रवेशबंदी आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.