अमेरिकेत X ची पिछेहाट, यूट्यूब आणि फेसबुकचा दबदबा कायम
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
एका ताज्या अहवालानुसार अमेरिकेत X वापरणाऱ्या प्रौढांचे प्रमाण २०२५ मधील जवळपास २१ टक्क्यांवरून २०२६ मध्ये १८ टक्क्यांवर आले आहे.
अमेरिकेच्या सोशल मीडिया बाजारात सध्या मोठा बदल दिसत आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांच्या मालकीचे 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) हे प्लॅटफॉर्म अमेरिकन लोकांना फारसे आवडत नसल्याचे एका ताज्या अहवालातून दिसते. अहवालानुसार X ची लोकप्रियता झपाट्याने घसरत आहे आणि युजर्समध्ये मोठी निराशा आहे.
आकडेवारी पाहिली तर २०२५ मध्ये जवळपास २१ टक्के अमेरिकन प्रौढ X वापरत होते. २०२६ मध्ये हे प्रमाण थेट १८ टक्क्यांवर आले आहे. मस्क यांनी हे प्लॅटफॉर्म विकत घेतल्यापासून त्याची कार्यप्रणाली, धोरणे आणि अल्गोरिदम यांत अनेक मोठे बदल झाले आहेत. त्यामुळे अनेक जुने युजर्स आणि जाणकार या प्लॅटफॉर्मपासून दूर गेल्याचे दिसते.
दुसरीकडे गुगलचे यूट्यूब, मेटाचे फेसबुक आणि इन्स्टाग्राम हे अमेरिकन लोकांच्या रोजच्या आयुष्याचा भागच बनले आहेत. अहवालानुसार तब्बल ८४ टक्के अमेरिकन प्रौढ यूट्यूब वापरतात. मोठ्या प्रमाणातील व्हिडिओ, तसेच शैक्षणिक, मनोरंजनाचे आणि माहितीपूर्ण व्हिडिओ उपलब्ध असणे हे त्यामागचे मुख्य कारण सांगितले जाते. घरबसल्या मनोरंजन आणि ज्ञान मिळवण्यासाठी लोक यूट्यूबलाच पहिली पसंती देतात.
यूट्यूबच्या खालोखाल मार्क झुकेरबर्ग यांचे फेसबुक ७० टक्के अमेरिकन लोकांच्या मोबाईलवर सक्रिय आहे. मित्रमंडळी आणि नातेवाईकांशी संपर्कात राहणे, जुन्या ओळखी ताज्या करणे, फोटो आणि व्हिडिओ शेअर करणे आणि वेगवेगळ्या कम्युनिटी ग्रुपमध्ये सहभागी होणे यासाठी फेसबुक आजही विश्वासाचे माध्यम मानले जाते. तरुणांमध्ये इन्स्टाग्राम आणि टिकटॉकची क्रेझही वाढली आहे. अमेरिकेत ५१ टक्के प्रौढ इन्स्टाग्राम वापरतात, तर ३७ टक्के लोकांच्या फोनमध्ये टिकटॉक आहे.
एका सर्वेक्षणानुसार शिक्षणाची पातळी आणि सोशल मीडियाची निवड यांचा संबंध आहे. ज्यांचे शिक्षण फक्त हायस्कूलपर्यंत झाले आहे, त्यांच्यात यूट्यूब (७७%), फेसबुक (६७%) आणि टिकटॉक (४३%) सर्वाधिक वापरले जातात. शिक्षणाची पातळी जशी वाढते, तशी आवडनिवड आणि प्लॅटफॉर्मची निवड बदलत जाते.
उच्चशिक्षित आणि कॉलेज पदवीधरांमध्ये लिंक्डइनचा वापर ५१ टक्के आहे, तर हायस्कूलपर्यंत शिकलेल्यांमध्ये तो फक्त १३ टक्के आहे. यावरून सुशिक्षित वर्ग करिअर आणि व्यावसायिक नेटवर्किंगसाठी लिंक्डइनला प्राधान्य देतो, असे दिसते. रेडिट हे १२ टक्क्यांवरून पदवीधरांमध्ये ३६ टक्क्यांपर्यंत पोहोचते. याउलट कमी शिकलेल्यांत टिकटॉकचा वापर ४३ टक्के आहे, तर कॉलेज पदवीधरांमध्ये तो केवळ २८ टक्के आहे.
व्हॉट्सॲपची स्थिती भारतात आणि अमेरिकेत वेगळी आहे. भारतात चहाच्या छोट्या टपरीपासून मोठ्या कंपन्यांपर्यंत सगळेच व्हॉट्सॲप वापरतात. ग्राहकांशी संवाद, डिजिटल पेमेंट आणि कुटुंबाचे ग्रुप यामुळे त्याची भारतात मोठी क्रेझ आहे. अमेरिकेत मात्र केवळ ३३ टक्के लोक व्हॉट्सॲप वापरतात. तिथले लोक टेक्स्ट मेसेजसाठी आयफोनचे iMessage किंवा इतर मेसेजिंग ॲप्स पसंत करतात. २०२३ ते २०२६ दरम्यान अमेरिकेत व्हॉट्सॲपचा वापर १८ ते २१ टक्क्यांच्या आसपास राहिला आहे. ट्रुथ सोशलसारखे राजकीय प्लॅटफॉर्म फक्त ३ ते ४ टक्के लोक वापरतात.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.