नेटफ्लिक्स ६ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, २०२२ नंतरची सर्वात मोठी कपात
प्रॉडक्ट, टेक्नॉलॉजी, लीगल आणि एचआर विभागांवर सर्वाधिक परिणाम होणार असून कंपनीचा व्यवसाय मजबूत असल्याचे दोन्ही को-सीईओंनी सांगितले आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
नेटफ्लिक्स आपल्या ६ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणार आहे. २०२२ नंतरचा हा कंपनीतील कर्मचारी कपातीचा सर्वात मोठा टप्पा आहे. आयटी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जात आहे. गेल्या काही काळापासून अनेक कंपन्यांमध्ये कर्मचारी कपातीची लाट दिसत असून, आता त्यात नेटफ्लिक्सचेही नाव जोडले गेले आहे.
कंपनीच्या म्हणण्यानुसार या कपातीचा सर्वाधिक परिणाम प्रॉडक्ट, टेक्नॉलॉजी, लीगल आणि एचआर या विभागांवर होईल. गेल्या वर्षाच्या अखेरीस नेटफ्लिक्समध्ये अंदाजे १६,००० कर्मचारी होते.
कंपनीचे को-सीईओ टेड सारँडोस आणि ग्रेग पीटर्स यांनी ईमेलद्वारे कर्मचाऱ्यांना या निर्णयाची माहिती दिली. कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय कंपनीसाठी सोपा नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. या बदलाच्या काळात कामावरून कमी होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी कंपनी उभी राहील, असेही त्यांनी सांगितले.
दोन्ही अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की नेटफ्लिक्सचा व्यवसाय मजबूत आहे आणि कंपनी या वर्षासाठीची आपली उद्दिष्टे गाठण्याच्या दिशेने काम करत आहे. व्यवसायाच्या वाढीला आणि सेवांमधील सुधारणेला मदत होईल, अशा क्षेत्रांमध्ये कंपनी यापुढेही गुंतवणूक करत राहील, असे त्यांनी नमूद केले.
नेटफ्लिक्सचा प्रेक्षकवर्ग मोठा असला तरी कंपनीसमोर मोठी स्पर्धा आहे. यूट्यूब आणि टिकटॉकसारख्या प्लॅटफॉर्मकडून तीव्र स्पर्धेचा सामना करावा लागत आहे. या प्लॅटफॉर्मवर बराचसा कंटेंट विनामूल्य उपलब्ध आहे. त्यामुळे प्रेक्षक थेट तिकडे ओढले जातात आणि त्यांचा बराचसा वेळ तिथेच जातो. परिणामी नेटफ्लिक्सला आपल्या स्वतःच्या प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना टिकवून ठेवणे आव्हानात्मक झाले आहे.
कंपनीला आता केवळ सबस्क्रिप्शनच्या कमाईवर अवलंबून राहायचे नाही. त्यासाठी तिची वेगळी स्ट्रॅटेजी आहे. जाहिरात, लाइव्ह प्रोग्रामिंग आणि गेमिंग यांसारख्या क्षेत्रांमध्येही आपला व्यवसाय वाढवण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे आणि त्यासाठी प्रयत्नही सुरू आहेत.
नेटफ्लिक्सने यापूर्वी २०२२ मध्येही कर्मचारी कपात केली होती. त्या वेळच्या निर्णयात अंदाजे ४५० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले होते. तेव्हापासूनची ही सर्वात मोठी कपात आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे जागतिक तंत्रज्ञान आणि मनोरंजन क्षेत्रातील रोजगाराच्या चिंतेत वाढ होऊ शकते. कर्मचारी कपातीची झळ इतर क्षेत्रांनाही बसते आहे का, अशी चिंता प्रत्येक वर्गातील कर्मचाऱ्यांना लागून राहिली आहे.