नवरात्रीच्या उपवासात चटपटीत खायचंय? असा बनवा उपवासाचा बटाटा वडा
राजगिऱ्याच्या पिठाच्या बॅटरमधला हा वडा बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ लागतो; साहित्य आणि कृती इथे आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
नवरात्रीच्या सणाला आता सुरुवात झाली असून हा सण देशभरात आनंदाने साजरा होत आहे. या निमित्ताने देवीच्या ९ रूपांची पूजा केली जाते. देवीची पूजा करत अनेकजण या ९ दिवसांत व्रत-वैकल्य आणि उपवास करतात.
उपवासाचे पदार्थ फार मर्यादित असतात, त्यामुळे तेच तेच पदार्थ खाऊन अनेकांना कंटाळा येतो. उपवासातही काहीतरी टेस्टी आणि चटपटीत खायची इच्छा होत असेल, तर आपलं मन मारण्याची काही गरज नाही. सगळ्यांच्या आवडीचे बटाटे वडे उपवासातही करता येतात. हो, तुम्ही बरोबर ऐकलंत. बटाटा वडा थोड्या अनोख्या पद्धतीने बनवला, तर उपवासाच्या दिवशीही त्याचा आनंद घेता येतो.
हा वडा बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ चवीचा लागतो. तो तुमच्या क्रेव्हिंग्स दूर करायला आणि तोंडाचे चोचले पुरवायला मदत करतो. चला तर मग या भन्नाट रेसिपीसाठी लागणारं साहित्य आणि कृती जाणून घेऊया.
साहित्य : उकडलेले बटाटे २०० ग्रॅम, सैंधव मीठ अर्धा चमचा, काळी मिरी पूड १/४ चमचा, हिरव्या मिरच्या २-३, जिरे १ चमचा आणि कोथिंबीर. वड्याभोवतीच्या पिठासाठी राजगिऱ्याचे पीठ १ कप, काळी मिरी पूड १/४ चमचा, तीळ २ चमचे, हिरव्या मिरच्या २-३ आणि गरजेनुसार पाणी.
कृती : यासाठी सर्वप्रथम बटाटे पाण्याने चांगले धुवून घ्या. ते कुकरमध्ये घालून साधारण ४-५ शिट्ट्या काढा. बटाटे चांगले उकडले की थंड होऊ द्या आणि त्यांची साले वेगळी करा.
नंतर बटाटे चांगले मॅश करा आणि त्यात सैंधव मीठ, काळी मिरी पूड, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, धणे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. सर्व साहित्य चांगलं एकजीव करून मिश्रणाचे गोळे तयार करा.
दुसरीकडे बॅटर तयार करण्यासाठी राजगिऱ्याचं पीठ, सैंधव मीठ, काळी मिरी पूड, पांढरे तीळ आणि बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या एकत्र करा आणि गरजेनुसार पाणी घालून थोडं जाडसर पीठ तयार करा.
आता गॅसवर कढई ठेवून त्यात तेल गरम करायला ठेवा. तेल चांगलं तापलं की बटाट्याचा गोळा बॅटरमध्ये बुडवून हळूवारपणे तेलात सोडा. मध्यम आचेवर वडे चांगले कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.
तुमचे उपवासाचे बटाटे वडे तयार आहेत. शेंगदाण्याच्या चटणीसोबत तुम्ही ते खाण्यासाठी सर्व्ह करू शकता.