बुधवार, 14 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
19:55 IST

प्राप्ती रेडकर म्हणते, स्वतःसाठी ठामपणे उभं राहणं हीच खरी स्त्रीशक्ती

नवरात्रीच्या निमित्ताने अभिनेत्री प्राप्ती रेडकरने स्वसंरक्षण, स्वाभिमान आणि आत्मविश्वासाचा संदेश दिला आहे.

प्राप्ती रेडकर म्हणते, स्वतःसाठी ठामपणे उभं राहणं हीच खरी स्त्रीशक्ती छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

झी मराठीवरील 'सावळ्याची जणू सावली' या मालिकेत सावलीची भूमिका करणारी अभिनेत्री प्राप्ती रेडकर हिने नवरात्रीच्या निमित्ताने स्त्रीशक्तीचा आपल्या पद्धतीने अर्थ सांगितला आहे. स्वतःचा स्वाभिमान जपणं आणि स्वतःसाठी योग्य भूमिका घेणं म्हणजे स्त्रीशक्ती, असं ती म्हणते.

नवरात्रात देवीच्या विविध रूपांची पूजा होते आणि तिच्यातील धैर्य, आत्मविश्वास व अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद अधोरेखित केली जाते. पण खरी स्त्रीशक्ती फक्त देवीच्या आराधनेपुरती नाही, तर स्वतःच्या हक्कांसाठी खंबीरपणे उभं राहण्यात आणि स्वाभिमानाने जगण्यातही आहे, असा तिचा दृष्टिकोन आहे.

एखादी गोष्ट पटत नसेल तर त्याविरोधात आवाज उठवणं आणि स्वतःच्या निर्णयांवर ठाम राहणं महत्त्वाचं आहे, असं प्राप्तीचं मत आहे. आजच्या काळात प्रत्येक स्त्रीला स्वसंरक्षणाची माहिती हवी, असं ती सांगते. प्रत्येक मुलीने कराटे किंवा मार्शल आर्ट शिकायलाच हवं असं नाही, पण संकटाच्या वेळी स्वतःचं संरक्षण कसं करायचं हे प्रत्येक महिलेला माहीत असायला हवं, असं तिचं म्हणणं आहे.

प्रत्येक महिला आणि मुलीने स्वतःची काळजी घ्यावी आणि कोणत्याही परिस्थितीत खचून जाऊ नये, असा संदेश तिने दिला आहे. स्वतःसोबत काही चुकीचं घडत असेल तर त्याचा विरोध करा आणि हिंमतीने लढा, असं ती म्हणते. आयुष्यात काय करायचं, कसं जगायचं आणि कोणते निर्णय घ्यायचे हे ठरवण्याचा अधिकार प्रत्येक स्त्रीला आहे. म्हणून आपल्या आयुष्याचे निर्णय दुसऱ्यांना घेऊ देऊ नका, स्वतःच्या आयुष्याची नायिका बना आणि आत्मविश्वासाने जगा, असं आवाहन तिने केलं आहे.

प्राप्ती २०२२ पासून मार्शल आर्ट शिकत आहे. सध्या मालिकेच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्यामुळे तिचा सराव थांबला आहे. तरीही मार्शल आर्ट शिकण्यापूर्वी आणि नंतर स्वतःमध्ये मोठा बदल जाणवल्याचं ती सांगते. पूर्वी कोणी जाणूनबुजून चुकीचं वागलं किंवा धाक दाखवण्याचा प्रयत्न केला, तर तिला अस्वस्थ वाटायचं आणि समोरच्याला विरोध करण्याचा आत्मविश्वास तिच्यात नव्हता. आता स्वतःसाठी उभं राहण्याची हिंमत आणि आत्मविश्वास वाढला आहे, असं ती सांगते.

या अनुभवाचा एक प्रसंगही तिने सांगितला. मालाड स्टेशनवर एका मुलाने मुद्दाम चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. सुरुवातीला तो कोण होता हे तिच्या लक्षात आलं नाही, पण काही वेळाने तो त्याच हेतूने पुन्हा तिच्या दिशेने येताना दिसला. तेव्हा प्राप्तीने त्याची कॉलर पकडून त्याला जोरदार विरोध केला. त्यानंतर तो माफी मागू लागला आणि तिथून पळून गेला.

त्या क्षणी स्वतःमधील ताकदीची आणि अन्यायाविरोधात उभं राहण्याच्या क्षमतेची जाणीव झाली, असं ती म्हणते. म्हणूनच प्रत्येक मुलीला आणि स्त्रीला किमान स्वतःचं संरक्षण करण्याइतकी माहिती असावी, असं तिचं म्हणणं आहे.

प्राप्तीसाठी नवरात्र म्हणजे फक्त देवीची आराधना नाही, तर आनंदाने आणि उत्साहाने सण साजरा करण्याची संधीही आहे. तिच्या नानींच्या घराजवळ सार्वजनिक नवरात्रोत्सव साजरा होतो. तिथे लहान मुलांचे खेळ, महिला आणि पुरुषांसाठी विविध स्पर्धा, गरबा, फॅन्सी ड्रेस गरबा आणि पाककला स्पर्धा असे अनेक कार्यक्रम होतात. मित्रमंडळींसोबत त्यात सहभागी होताना नवरात्रीचे दिवस कसे जातात ते कळतही नाही, असं ती सांगते.

विविध नवरात्र मंडळांकडून आमंत्रणं आली की ती आवर्जून देवीच्या दर्शनालाही जाते. नऊ दिवसांत दर्शनातून मिळणारी सकारात्मक ऊर्जा आणि उत्सवातला उत्साह तिला विशेष भावतो.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ