सोमवार, 26 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 319 | Very Poor 06:54 IST

नैना क्षेत्रातून 15 लाख रोजगार; 'तिसरी मुंबई'ला वेग, फडणवीस यांची घोषणा

नवी मुंबई विमानतळाच्या परिसरातील नैना क्षेत्रात 15 लाख नवे रोजगार उभे करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. त्यातले 5 लाख रोजगार उच्च वेतनाचे असतील.

नैना क्षेत्रातून 15 लाख रोजगार; 'तिसरी मुंबई'ला वेग, फडणवीस यांची घोषणा छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रभाव क्षेत्राचा नियोजनबद्ध विकास करत महाराष्ट्र सरकारने 'तिसरी मुंबई' उभारण्याच्या कामाला आणखी वेग दिला आहे. नैना (NAINA) क्षेत्रातून सुमारे 15 लाख नवे रोजगार निर्माण करण्याचे मोठे उद्दिष्ट राज्य सरकारने ठेवले आहे. त्यातले 5 लाख रोजगार उच्च वेतनाचे असणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली.

या विकासातून जे काही संधी तयार होतील, त्यात स्थानिक भूमिपुत्र आणि शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले. त्यांना विकासाचे खरे भागीदार बनवले जाईल, असेही ते म्हणाले.

पनवेल तालुक्यातील शिरढोण येथे झालेल्या कार्यक्रमात नैना परिसरातील विकासकामांचे भूमिपूजन झाले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला पूर्वेकडून जोडणाऱ्या एसबीआर-9, बीआर-4, बीआर-5 आणि उरण बायपास पूल या प्रकल्पांचे लोकार्पणही मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्याच वेळी भूधारकांना मालमत्ता पत्रकांचे वाटपही त्यांच्या हस्ते करण्यात आले.

फडणवीस म्हणाले की, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा फक्त विमानतळ नाही, तर संपूर्ण परिसराच्या आर्थिक विकासाला चालना देणारा महत्त्वाचा घटक आहे. या परिसराचा नियोजनबद्ध आणि कालबद्ध विकास व्हावा म्हणून एकात्मिक विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. नगररचना योजनांच्या माध्यमातून हा विकास होत असून, त्यातून रोजगारनिर्मितीला जास्त चालना मिळत आहे.

नैना प्रकल्प नवी मुंबई विमानतळ परिसरातील गावांच्या 225.59 चौरस किलोमीटर क्षेत्रात राबवला जात आहे. जमीनधारकांचा सहभाग, ग्रामस्थांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार आणि सक्षम पायाभूत सुविधा यांतून आधुनिक शहर उभे करण्याचा प्रयत्न आहे.

भूधारकांच्या हातात जमिनीची कागदपत्रे दिल्यानंतरच भूमिपूजन करायचे, असा निर्णय आधी घेण्यात आला होता. त्यानुसार गावनिहाय मोजणी, भूखंडांची ओळख, मालकी नोंदी आणि आवश्यक कागदपत्रांची प्रक्रिया पुढे नेली जात आहे. भूधारकांचे प्रश्न सुटेपर्यंत राज्य सरकार त्यांच्या पाठीशी राहील, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.

नैना क्षेत्राचा विकास म्हणजे फक्त रस्ते, इमारती आणि वसाहती उभारणे नाही, तर रोजगार, पाणीपुरवठा आणि इतर मूलभूत सुविधा देणेही महत्त्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले. एज्युसिटी, मेडिसिटी, स्पोर्ट्स सिटी, एरोसिटी आणि नॉलेज सिटी अशा संकल्पनांतून या क्षेत्रात वेगवेगळ्या आर्थिक आणि सामाजिक संधी तयार होतील. मुंबई, नवी मुंबई, रायगड, ठाणे आणि पालघर परिसराच्या विकासाला नैना क्षेत्रामुळे नवी दिशा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्रात मुंबई महानगर प्रदेशासह पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर अशी अनेक विकासकेंद्रे उभी राहत आहेत. त्याच धर्तीवर ठाणे, नवी मुंबई, रायगड आणि पालघर हा परिसर पुढच्या काळात राज्याच्या आर्थिक विकासाचे महत्त्वाचे इंजिन ठरेल, असे फडणवीस म्हणाले. हा विकास भूमिपुत्रांना सोबत घेऊन आणि त्यांच्या हिताचे संरक्षण करूनच केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नैना क्षेत्राचा विकास वेगाने करण्याचे आणि भूमिपुत्रांना विकासाचे भागीदार बनवण्याचे सांगितले. अनेक वर्षे रखडलेले प्रश्न मार्गी लावून विकासाला गती देण्याच्या दृष्टीने आजचा दिवस ऐतिहासिक आहे, असे ते म्हणाले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि अटल सेतूमुळे पनवेल, उरण, नवी मुंबई आणि रायगड परिसराच्या विकासाला नवी दिशा मिळाली असून हा परिसर महाराष्ट्राचे नवे ग्रोथ इंजिन म्हणून पुढे येत आहे, असेही त्यांनी सांगितले. विमानतळाला जोडणाऱ्या प्रकल्पांमुळे मुंबई-पुणे महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्गांशी जोडणी अधिक मजबूत होणार आहे.

शिंदे यांनी सांगितले की, जमीनधारकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत विकास शुल्क आणि बेटरमेंट चार्ज शून्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फ्रीहोल्डसंदर्भातील कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. मालमत्ता पत्रके दिल्यामुळे भूखंडांवरील मालकी हक्कांची अधिकृत नोंद होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ज्यांनी जमिनी देऊन या विकासाचा पाया रचला, त्यांना त्याचा योग्य लाभ मिळालाच पाहिजे, आणि स्थानिक शेतकरी व भूमिपुत्रांना भागीदार बनवणे हीच शासनाची भूमिका आहे, असेही ते म्हणाले.

उरण बायपास पूल सिडकोने नवी मुंबईतील द्रोणागिरी परिसरात हॉटेल आनंदी ते उरण शहरादरम्यान बांधला आहे. उरण शहरातील वाहतूक कोंडी कमी करून प्रवासाचा वेळ वाचवणे हा त्याचा उद्देश आहे. यासाठी 50.26 कोटी रुपये खर्च आला असून पूल 11 मीटर रुंद आहे. प्रकल्पाची एकूण लांबी 941 मीटर आहे; त्यात 640 मीटरचा पूल, 153 मीटरचा पोहोच रस्ता आणि 148 मीटरचा जोडरस्ता आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंना 1.75 मीटर रुंदीचे पदपथ आहेत, तर वाहनांसाठी 7.5 मीटर रुंदीचा मार्ग आहे.

एसबीआर-9, बीआर-4 आणि बीआर-5 हे तीन पूल सिडकोने 953 कोटी रुपये खर्चून हाती घेतले आहेत. विमानतळाशी पूर्वेकडून जलद आणि अखंड संपर्क मिळावा हा त्यांचा हेतू आहे. पनवेल खाडी ओलांडणाऱ्या या पुलांमुळे पुणे, पनवेल, ठाणे आणि कल्याण भागांतून राष्ट्रीय महामार्ग ४बी मार्गे विमानतळ, उलवे किनारी मार्ग, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल) आणि अमरा मार्ग यांच्याशी पूर्वेकडून थेट संपर्क साधता येईल.

या पुलांची एकूण लांबी मध्यवर्ती गोलाकार वाहतूक बेटासह 2 हजार 593 मीटर असून रुंदी 60 मीटर आहे. दोन्ही दिशांना प्रत्येकी चार मार्गिकांचा मुख्य रस्ता आणि प्रत्येकी दोन मार्गिकांचे सेवा रस्ते आहेत. 100 मीटर व्यासाचे गोलाकार वाहतूक बेटही उभारले आहे. विमानतळाच्या पूर्व आणि पश्चिम बाजूंना बांधलेल्या क्लोव्हरलीफ इंटरचेंजमुळे सिग्नलविरहित आणि अखंड वाहतूक शक्य होईल.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ