नागपूर विभागातील 1397 शिक्षकांच्या नियुक्त्यांची फेरपडताळणी होणार, 2012 नंतरच्या नेमणुका संशयाच्या भोवऱ्यात
शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात समोर आलेल्या संशयानंतर एकट्या नागपूर विभागातील 1397 शिक्षकांच्या नियुक्त्यांची फेरपडताळणी पुढच्या आठवड्यात सुरू होणार आहे.
शिक्षक नियुक्ती घोटाळ्याबाबत एक नवी आणि महत्त्वाची माहिती समोर आली आहे. एकट्या नागपूर विभागातील 1397 शिक्षकांच्या नियुक्त्यांची फेरपडताळणी केली जाणार आहे. ही फेरपडताळणी पुढच्या आठवड्यात सुरू होणार असल्याची माहिती आहे.
शालार्थ आयडी घोटाळ्याच्या चौकशीचा तपास सुरू असताना काही शिक्षकांच्या नेमणुकांबद्दल शालेय शिक्षण विभागाला संशय आला होता. त्या तपासात 2012 नंतर अनेक शिक्षकांच्या नियुक्त्या नियमबाह्य पद्धतीने झाल्याचे शिक्षण विभागाच्या लक्षात आले होते. म्हणूनच आता या 1397 शिक्षकांना वैयक्तिक सुनावणीसाठी बोलावले जाईल. त्यांची कागदपत्रे आणि त्यांच्या निवडीची प्रक्रिया तपासली जाईल.
ही पडताळणी न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार होणार आहे. या प्रकरणात जे शिक्षक दोषी आढळतील, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे नागपूर विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शिवलिंग पटवे यांनी सांगितले. म्हणजेच फक्त कागदपत्रे तपासून हे काम थांबणार नाही, तर दोषी आढळलेल्यांवर पुढची कारवाईही होणार आहे.
शालार्थ आयडी प्रकरणानंतर 2012 पासून पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांत झालेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांचीही चौकशी सुरू आहे. या नियुक्त्यांना दिलेल्या वैयक्तिक मान्यतांचे प्रस्ताव तपासण्यासाठी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संचालकांच्या नेतृत्वाखालील समित्यांनी नागपुरात दोन दिवस तळ ठोकला. त्यांनी सुमारे एक हजार प्रकरणांची तपासणी केली, अशी माहिती समोर आली आहे.
शालार्थ आयडी प्रकरणामुळे शिक्षक भरती प्रक्रियेतल्या अनेक अनियमितता उघड झाल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर उपसंचालकांसह काही शिक्षणाधिकाऱ्यांवर कारवाई झाली. त्यानंतर शिक्षणाधिकाऱ्यांनी आपल्या अधिकारांचा वापर करून विविध शाळांतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिलेल्या वैयक्तिक मान्यतांची तपासणी करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
या तपासणीत नियुक्त शिक्षकांकडे आवश्यक शैक्षणिक पात्रता होती का, हे पाहिले गेले. नियुक्तीची प्रक्रिया नियमानुसार झाली होती का, याचीही माहिती घेतली गेली. उमेदवारांनी दिलेली शैक्षणिक आणि इतर प्रमाणपत्रे खरी आहेत का, तसेच संबंधित कर्मचाऱ्यांची सध्याची सेवा स्थिती काय आहे, हेही तपासले गेले. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता झाली होती का, याची पडताळणीही करण्यात आली.
ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.