MPSC पेपरफुटी: परीक्षा न देता टॉपर झालेल्या दोघांसह मध्यस्थांना पोलिसांकडून अटक
औषध निरीक्षक परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने दोन टॉपर संशयित आणि दोन मध्यस्थांना अटक केली, एकूण आरोपींची संख्या ११ वर पोहोचली.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक पदासाठीच्या परीक्षेत पेपर फुटल्याच्या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. परीक्षा होण्याआधीच प्रश्नपत्रिका मिळवून अंतरिम गुणवत्ता यादीत वरच्या क्रमांकावर आलेल्या दोन संशयित उमेदवारांना आणि या प्रकरणात मध्यस्थाची भूमिका बजावल्याचा आरोप असलेल्या आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. या ताज्या अटकेनंतर या घोटाळ्यातील आरोपींचा एकूण आकडा ११ वर जाऊन पोहोचला आहे.
तपासादरम्यान समोर आलेली माहिती धक्कादायक आहे. अटक करण्यात आलेला आरोपी साजिद संदे याला अंतरिम यादीत १५२.५० गुण मिळाले असून तो तिसऱ्या क्रमांकावर होता, तर विजय किंगर याला १५६ गुण मिळाले होते आणि तो चौथ्या क्रमांकावर होता. यापूर्वीच अटक झालेल्या ऋतुजा पाटील हिलाही १५५ गुण मिळाले होते आणि तिचा सातवा क्रमांक होता, अशी माहिती तपासात पुढे आली आहे.
जास्त गुण मिळवून टॉपर ठरलेले हे संशयित उमेदवार आता गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकले आहेत. गुन्हे शाखेने साजिद संदे याला सांगोला येथून, तर विजय किंगर याला बुलढाणा येथून ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येते. या प्रकरणात मध्यस्थ म्हणून काम केल्याचा आरोप असलेले सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर संदीप खलाटे आणि भारतीय नौदलात सिव्हिल टेक्निशियन म्हणून काम करणारे भैरवनाथ कदम यांनाही नवी मुंबईतून अटक करण्यात आली आहे.
मध्यस्थांमार्फतच हा पेपर फोडण्यात आला होता, असे तपासात याआधीच समोर आले होते. MPSC चे अवर सचिव अभिजीत लेंडवे यांनी मध्यस्थांच्या माध्यमातून पेपर फोडल्याचे निष्पन्न झाले होते. त्यांच्यासह विश्वेश्वर नकाते, गोपाळ मराठे, प्रवीण पाटील आणि इतर काही मध्यस्थांनाही याआधीच अटक झाली असून हे सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
नेहमी सर्वसाधारण कामगिरी करणारे काही विद्यार्थी यावेळी अचानक अव्वल आल्याने संशयाला बळ मिळाले. २२ जुलै रोजी जाहीर झालेल्या ४८८ जणांच्या अंतरिम गुणवत्ता यादीत बहुतांश विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त १२१ पर्यंतच गुण मिळाले होते. मात्र त्यापेक्षा जास्त गुण मिळवून अव्वल आलेले आणि इतर परीक्षांमध्ये मात्र सर्वसाधारण कामगिरी असलेले विद्यार्थी संशयाच्या घेऱ्यात आले, आणि आताच्या कारवाईने त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
MPSC तर्फे २२ मार्च २०२६ रोजी सहा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली होती. या प्रकरणी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले असून आणखी काही उमेदवारांचा या पेपरफुटी प्रकरणात सहभाग असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.