सोमवार, 26 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 319 | Very Poor 09:26 IST

मुंबईत साडेसहा वर्षांत आपत्कालीन दुर्घटनांमध्ये ७२० जणांचा मृत्यू, २,४०८ जखमी; आरटीआयमधून आकडेवारी उघड

सन २०२० ते सप्टेंबर २०२६ या काळात मुंबईत घडलेल्या आपत्कालीन दुर्घटनांची आकडेवारी मुंबई महानगरपालिकेने माहिती अधिकार कायद्यांतर्गत दिली आहे.

मुंबईत साडेसहा वर्षांत आपत्कालीन दुर्घटनांमध्ये ७२० जणांचा मृत्यू, २,४०८ जखमी; आरटीआयमधून आकडेवारी उघड छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत नागरिकांच्या सुरक्षेचे तीन-तेरा वाजल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. गेल्या साडेसहा वर्षांत, म्हणजेच सन २०२० ते सप्टेंबर २०२६ या काळात, शहरात घडलेल्या वेगवेगळ्या आपत्कालीन दुर्घटनांमध्ये तब्बल ७२० निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला, तर २,४०८ नागरिक जखमी झाले आहेत.

ही धक्कादायक आकडेवारी माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मागवलेल्या माहितीतून उघड झाली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे जनमाहिती अधिकारी सुनील जाधव यांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत ही अधिकृत माहिती दिली. या साडेसहा वर्षांत आग, इमारत कोसळणे, दरडी कोसळणे, उघडे मॅनहोल आणि पाण्यात बुडण्याच्या घटनांमुळे मुंबईकरांच्या जीविताला मोठा धोका निर्माण झाल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.

पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, शहरात घरे, भिंती आणि इमारतींचे भाग कोसळल्याने सर्वाधिक जीवितहानी झाली आहे. या प्रकारात १७९ नागरिकांचा मृत्यू झाला असून ८६४ जण जखमी झाले. आग आणि शॉर्टसर्किटच्या घटनांमध्ये तब्बल १६८ निष्पाप जीवांचा होरपळून मृत्यू झाला असून १,०४८ नागरिक गंभीर जखमी झाले आहेत.

जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीतील सर्वात चिंताजनक बाब म्हणजे समुद्र, नाले, नद्या, विहिरी, खाड्या आणि मॅनहोलमध्ये पडून एकूण ३२८ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये २३७ पुरुष आणि ९१ महिलांचा समावेश आहे.

दुर्घटना घडल्यानंतर केवळ पंचनामे करणे आणि आर्थिक मदत जाहीर करणे यापलीकडे महापालिका प्रशासन ठोस प्रतिबंधात्मक पावले उचलते का, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

या पार्श्वभूमीवर आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी महापालिका आयुक्त आणि मुख्य अग्निशमन अधिकारी यांना पत्र पाठवून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. शहरातील धोकादायक इमारतींचे ऑडिट करावे, उघड्या मॅनहोलवर जाळ्या बसवाव्यात आणि नागरी सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ