सोमवार, 26 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 319 | Very Poor 09:37 IST

शीव, विद्याविहार आणि गोरेगाव-मुलुंड जोड मार्गावरील तीन उड्डाणपूल गुरुवारी खुले होणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 22 ऑक्टोबर 2026 रोजी दुपारी 1 वाजता व्हर्च्युअल पद्धतीने तीन उड्डाणपुलांचे लोकार्पण करणार आहेत.

शीव, विद्याविहार आणि गोरेगाव-मुलुंड जोड मार्गावरील तीन उड्डाणपूल गुरुवारी खुले होणार छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

मुंबईतील वाहतूक अधिक वेगवान आणि सुलभ व्हावी म्हणून एकाच दिवशी तीन महत्त्वाचे उड्डाणपूल लोकांसाठी खुले केले जाणार आहेत. शीव, विद्याविहार आणि गोरेगाव-मुलुंड जोड मार्गावरील (GMLR) या पुलांमुळे लाखो मुंबईकरांचा प्रवास सोपा होणार आहे.

शीव रेल्वे स्थानकाजवळचा रेल्वे उड्डाणपूल, विद्याविहार रेल्वे स्थानकाजवळचा रेल्वे उड्डाणपूल आणि गोरेगाव-मुलुंड जोड मार्गावरील उड्डाणपूल यांचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होईल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार प्रमुख उपस्थितीत असतील. गुरुवार, 22 ऑक्टोबर 2026 रोजी दुपारी 1 वाजता हा कार्यक्रम व्हर्च्युअल पद्धतीने होणार आहे. हे पूल बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत उभारण्यात आले आहेत.

शीव स्थानकाजवळच्या पुलाचा संबंध मुंबई शहरी वाहतूक प्रकल्पाशी (MUTP - 2) आहे. या प्रकल्पांतर्गत मध्य रेल्वेमार्फत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते कुर्ला दरम्यान 5 वी व 6वी अशा दोन अतिरिक्त मार्गिका टाकायच्या आहेत. त्यासाठी जागा मोकळी करायची होती आणि 112 वर्षे जुना पूल असुरक्षित ठरवण्यात आला होता, म्हणून त्याची पुनर्बांधणी करावी लागली. जुन्या पुलाचे रुळांमधील खांब नवीन मार्गिका टाकण्यात अडथळा ठरत होते. नवीन पूल अंतर्वाही (through span) पद्धतीचा असल्याने जास्तीची जागा मिळेल आणि लोकल तसेच लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांची वाहतूक अधिक वेगवान होईल.

रेल्वे हद्दीतील मुख्य पुलाचे काम रेल्वे विभागाने केले. महानगरपालिका हद्दीतील पोहोच मार्गाचे नूतनीकरण आणि मजबूतीकरण महानगरपालिकेच्या पूल विभागाने रेल्वेच्या समन्वयाने केले. रुळांवरील पुलासाठी 496 टन वजनाचे, 54.5 मीटर लांब आणि 26 मीटर रुंद असे दोन 'सेमी - थ्रू स्टील गर्डर' वापरले आहेत. पश्चिमेकडे लाल बहादूर शास्त्री मार्गाखालील नवीन पादचारी भुयारी मार्ग 20 फेब्रुवारी 2026 रोजी खुला झाला. संत रोहिदास मार्गाखालील जुना भुयारी मार्ग हलवून पुन्हा बांधण्यात आला आणि तो 14 जुलै 2026 रोजी खुला करण्यात आला.

पोहोच रस्ते तीन दिशांना भराव करून बांधले आहेत. धारावीच्या दिशेने लांबी 110 मीटर आणि रुंदी 27 मीटर, कुर्ल्याच्या दिशेने लांबी 97 मीटर आणि रुंदी 29 मीटर, तर डॉ. आंबेडकर मार्गाच्या दिशेने लांबी 65 मीटर आणि रुंदी 27 मीटर आहे. हा पूल धारावी, वांद्रे, वांद्रे कुर्ला संकुल, कुर्ला तसेच पूर्वेकडील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग आणि पूर्व द्रुतगती मार्ग यांना जोडणारा पूर्व-पश्चिम दुवा आहे. काम फेब्रुवारी 2027 मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते, पण उपयोगिता वाहिन्या, जलवाहिन्या, बाधित वृक्ष आणि सार्वजनिक स्वच्छतागृहांचे स्थानांतर अशा अडचणी असूनही ते चार महिने आधी पूर्ण झाले. सगळा खर्च रेल्वे विभागाच्या निधीतून झाला आहे.

विद्याविहारचा उड्डाणपूल बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'एन' विभागाच्या हद्दीत, घाटकोपर परिसरात आहे. तो पूर्वेकडील रामचंद्र चेंबूरकर मार्ग आणि पश्चिमेकडील लालबहादूर शास्त्री मार्ग यांना जोडतो आणि महानगरपालिकेच्या पूल विभागाने बांधला आहे. यामुळे प्रवासाचा वेळ 30 मिनिटांवरून 10 मिनिटांपर्यंत कमी होणार आहे आणि घाटकोपर स्थानकाजवळच्या उड्डाणपुलावरील वाहतूकही कमी होईल. दोन मार्गिकांचा हा पूल एकूण 600 मीटर लांब असून त्याची रुंदी 15.50 ते 17.50 मीटर आहे.

बांधकाम दोन टप्प्यांत झाले. पहिल्या टप्प्यात रेल्वे हद्दीतील सेवांची पुनर्स्थापना आणि रुळांवर 99.34 मीटर लांब व 24.50 मीटर रुंद दोन तुळ्या बसवण्याचे काम 31 मे 2024 रोजी पूर्ण झाले. दुसऱ्या टप्प्यात पूर्व आणि पश्चिमेकडचे 500 मीटर लांब सेवा रस्ते, सोमय्या नाल्याचे विस्तारीकरण आणि मध्य रेल्वेच्या सेवा सुविधांचे स्थलांतर 30 सप्टेंबर 2026 पर्यंत पूर्ण झाले. एकूण 650 मीटरच्या या प्रकल्पात रुळांवर 100 मीटरचा पूल, पूर्वेला 220 मीटर आणि पश्चिमेला 330 मीटर पोहोच मार्ग आहे. पुलावरून स्थानकाच्या पदपथांवर जाण्यासाठी जोडमार्ग दिला आहे, तसेच तिकीट खिडकी कक्ष, स्थानक मास्तर कार्यालय आणि जिना यांचीही पुनर्बांधणी झाली आहे.

गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्प बृहन्मुंबई महानगरपालिका राबवत आहे. पूर्व द्रुतगती महामार्ग पश्चिम द्रुतगती महामार्गाशी जोडून पूर्व आणि पश्चिम उपनगरांतील वाहतूक सुरळीत करणे हा त्याचा उद्देश आहे. गोरेगाव पूर्वेला रत्नागिरी हॉटेलजवळच्या जंक्शनवर 1.26 किलोमीटर लांबीचा 3x3 मार्गिकेचा उड्डाणपूल उभारला आहे. जनरल अरुणकुमार वैदय मार्ग ते दादासाहेब फाळके चित्रनगरी मार्गावरील संतोष नगरपर्यंतचे बांधकाम पूर्ण झाले आहे. यामुळे जनरल अरुणकुमार वैदय मार्ग, दिंडोशी न्यायालय, हॉटेल रत्नागिरी जंक्शन, वालभट नदी चौक आणि आसपासची कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल.

या पुलाची अधिरचना पूर्वनिर्मित बॉक्स आकाराच्या काँक्रीट सेगमेन्टची आहे. पी 7 ते पी 11 या आधारस्तंभांदरम्यान वक्राकार पोलादी स्पॅनची संरचना केली आहे. भूस्तर स्थितीनुसार पाइल फाउंडेशन आणि उघड्या प्रकारचे पाया बांधकाम (Open Foundations) करण्यात आले असून उताराचे पोहोच मार्गही आहेत. सुमारे 12.20 किलोमीटर लांबीच्या संपूर्ण प्रकल्पामुळे पश्चिम आणि पूर्व उपनगरांदरम्यानचा प्रवास 75 मिनिटांवरून 25 मिनिटांवर येईल. इंधनाची बचत होईल आणि मुंबईच्या वायू गुणवत्ता निर्देशांकातही (AQI) सुधारणा होईल.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ